[१०]
विशाखा मिगारमाता.

श्रावस्तीपासून सात योजनांच्या अंतरावर साकेत नांवाचे एक मोठें शहर वसलें होतें. तें ज्यानें वसविलें, त्या धनंजयश्रेष्ठीची त्या काळच्या नवकोटनारायणांमध्यें गणना होत असे. विशाखा नांवाची त्याला एक अत्यंत सुस्वरूप कन्या होती. ती वयांत आल्यावर श्रावस्ति येथील मिगारश्रेष्ठीच्या पूर्णवर्धन नांवाच्या पुत्राशीं तिचा विवाह ठरला. साकेत व श्रावस्ति या दोन्ही शहरांमध्यें उभय पक्षांकडून हा विवाहसमारंभ मोठ्या थाटानें पार पडला.

विवाहविधि आटोपून धनंजयश्रेष्ठी आपल्या कन्येबरोबर श्रावस्तीला आला, तेव्हां त्याने आपल्या ज्ञातींतील आठ कुलीन गृहस्थांनां बोलावून आणून व्याह्यांसमोर असें सांगितलें, कीं, जर माझ्या मुलीचा कांही दोष दिसून आला, तर त्याची तुम्ही नीट चौकशी करावी.”

धनंजयश्रेष्ठी मुलीला सासरीं ठेवून साकेताला गेल्यावर एके दिवशी मिगारश्रेष्ठीनें निंर्ग्रथ श्रमणांला (नग्न संन्याशाला) आपल्या घरीं मुलाच्या लग्नसमारंभानिमित्त भोजनाला आमंत्रण केलें. (मिगारश्रेष्ठी निर्ग्रथांचा उपासक होता.) त्यांच्यासाठी त्याने पाणी न घालतां दुधाची खीर करविली होती. निंर्ग्रथ येऊन आपापल्या आसनावर बसल्यावर मिगारश्रेष्ठीनें स्वत: आदरातिथ्य करून त्यांचे संतर्पण केलें, व त्यांचें भोजन झाल्यावर आपल्या सुनेला निरोप पाठविला कीं, आपल्या घरीं अर्हन्त आले आहेत, त्यांनां नमस्कार करण्यास यावें.

अर्हन्त हा शब्द कानीं पडतांच विशाखेला फार आनंद झाला. कारण, लहानपणापासून ती बुद्धाची उपासिका होती, व बुद्ध आणि बौद्धभिक्षु यांशिवाय इतरांनां अर्हन्त म्हणतात, हें तिला माहीत नव्हतें. घाईघाईनें पोषाख करून ती अंत:पुरांतून आपला सासरा व त्याचें ते अर्हन्त ज्या दिवाणखान्यांत बसले होते, तेथें गेली. पण त्या नग्न श्रमणांला पाहून ती फारच कंटाळली व आपल्या सासर्‍याला म्हणाली “मला आपण येथें कशाला बोलाविलें? असले नागडे उघडे लोक कधीं अर्हन्त होत असतात काय? अशा निर्लज्जांनां आम्ही अर्हंत म्हणत नसतों!” असे उद्गार काढून विशाखा तेथून चालती झाली.

इकडे त्या श्रमणांला या नववधूनें आपला अपमान केल्याबद्दल अतिशय वाईट वाटलें, व ते एकदम मिगारश्रेष्ठीला म्हणाले, “हे गृहपति ही अवदसा तूं कोठून आणलीस? जणूं काय तुझ्या मुलाला जगामध्यें दुसरी मुलगी मिळालीच नसती!”

मिगार म्हणाला “अजून तिचा पोरस्वभाव आहे. आतां हळुहळू सुधारत जाईल. तिच्या या उद्धट आचरणाबद्दल आपण तिला क्षमा करावी.”

मिगारानें कशीबशी निंर्ग्रथांची समजूत घालून त्यांनां वाटेला लावलें, व स्वत: दुधाच्या खिरीनें भरलेलें ताट घेऊन तो जेवावयाला बसला. विशाखा त्याला पंख्यानें वारा घालीत एका बाजूला उभी राहिली होती. इतक्यांत दरवाज्यांत एक बौद्धभिक्षु येऊन उभा राहिला. मिगार बसलेल्या ठिकाणाहून त्या भिक्षूला पहात होता. तथापि त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष्य करून तो आपल्या भोजनांत गढून गेला होता. तेव्हा विशाखा तेथूनच त्या भिक्षूला म्हणाली “आर्य, माझा सासरा जुनेंपुराणें खात आहें. तुम्ही येथें तिष्ठत न रहातां पुढें व्हा!”

विशाखेचे हे शब्द कानीं पडतांच मिगार अतिशय संतापानें आपल्या नोकरांनां म्हणाला “हा पायस येथून घेऊन जा, व या पोरीला माझ्या घरांतून याच क्षणी हांकून द्या. ही इतकी उन्मत्त झाली आहें, कीं, माझ्यासमोर माझा उपमर्द करण्याला हिला लाज वाटत नाही!”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel