[१४]
आश्वलायन ब्राह्मणकुमार
व ब्राह्मणवर्णाची थोरवी


एके समयीं बुद्धगुरू श्रावस्तीमध्यें अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या वेळीं निरनिराळ्या देशांतून पांचशें ब्राह्मण कांहीं कारणास्तव श्रावस्तीला आले होते. त्या ब्राह्मणांमध्यें असा एक प्रश्न उपस्थित झाला, कीं "हा श्रमणगौतम चारहि वर्णांला मोक्ष आहे असें प्रतिपादन करितो. त्याजबरोबर या मुद्यासंबंधानें वाद करण्यास कोण समर्थ आहे?" शेवटीं आश्वलायन कुमाराला बुद्धाशीं वाद करावयाला पुढें करावें, असा बेत ठरला.

आश्वलायन कुमाराचें अध्ययन नुकतेंच पुरें झालें होतें. निघंटु, छंद:शास्त्र इत्यादि वेदांगांसहवर्तमान त्याला चारहि वेद तोंडपाठ येत असत; तथापि बुद्धाशीं वाद करणें कठिण आहे, हें तो जाणून होता. त्याला जेव्हां आपला पुढारी होण्यास त्या ब्राह्मणांनीं विनंति केली, तेव्हां तो त्यांनां म्हणाला "भो, श्रमणगौतम हा धर्मवादी आहे. धर्मवादी लोकांशीं वाद करणें सामान्य कर्म नव्हे. मी जरी वेदांमध्यें पारंगत असलों, तरी गौतमाबरोबर वाद करावयाला समर्थ नाहीं."

बराच वेळ भवति न भवति झाल्यावर ते ब्राह्मण आश्वलायनाला म्हणाले "भो आश्वलायन, तूं परिव्राजकधर्माचा अभ्यास केला आहेस; आणि युद्धावांचून पराजित होणें तुला योग्य नाहीं."

आश्वलायन म्हणाला "गौतमाशीं वाद करणें जरी कठिण काम आहे, तरी तुमच्या आग्रहास्तव मी तुमच्याबरोबर येतों."

नंतर त्या ब्राह्मणसमुदायासह आश्वलायन बुद्धगुरूजवळ गेला; आणि कुशलसमाचारादि विचारून झाल्यावर तो एका बाजूला बसला. नंतर तो बुद्धाला म्हणाला "भो गौतम, ब्राह्मणांचें म्हणणें असें आहे, कीं, 'ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत; ब्राह्मणवर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत; ब्राह्मणांनांच मोक्ष मिळतो, इतरांनां नाहीं; ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून झालेले त्याचे औरस पुत्र होत; अर्थात् तेच ब्रह्मदेवाचे दायाद होत. भो गौतम, या मुद्द्यासंबंधानें आपलें म्हणणें काय आहे?"

बुद्ध म्हणाला "हे आश्वलायन, ब्राह्मणांच्या बायका ऋतुमती होतात, गरोदर होतात, प्रसूत होतात, आणि मुलांनां दूध पाजतात. याप्रमाणें ब्राह्मणांची संतति इतर वर्णांप्रमाणेंच मातेच्या उदरांतून जन्मली असतां, ब्राह्मणांनीं आपण ब्रह्मदेवाच्या मुख्यापासून पूर्ण विश्वास आहे!"

बुद्ध म्हणाला "हे आश्वलायन, यौन, कांबोज व इतर सरहद्दीवरील प्रदेशांत आर्य आणि दास असे दोनच वर्ग असून कधींकधीं आर्याचा दास होतो, आणि दासाचा आर्य होतो; ही गोष्ट तुझ्या ऐकण्यांत आली आहे काय?"

"होय, असें मीं ऐकलें आहे." आश्वलायनानें उत्तर दिलें.

बुद्ध म्हणाला "असें जर आहे, तर ब्रह्मदेवानें ब्राह्मणांनांच उत्पन्न केलें व ते सर्व वर्णांत श्रेष्ठ आहेत, या म्हणण्याला आधार काय?"

आश्वलायन म्हणाला "आपलें म्हणणें कांहीं असो; परंतु ब्राह्मणांची अशी बळकट समजूत आहे, कीं, ब्राह्मणवर्णच काय तो श्रेष्ठ आहे आणि इतर वर्ण हीन आहेत."

बुद्ध म्हणाला "क्षत्रियानें, वैश्यानें किंवा शूद्रानें चोरी केली, व्यभिचार केला, खोटें भाषण केलें, चहाडी केली, वृथा बडबड केली, लोकांच्या धनावर दृष्टि ठेविली, द्वेषबुद्धि वाढविली, नास्तिकपणा अंगीकारिला, तर तोच काय तो नरकाला जाईल; पण ब्राह्मणानें हीं कर्मे केलीं असतां देहत्यागानंतर तो नरकाला जाणार नाहीं, असें तुला वाटतें काय?"

आश्वलायन म्हणाला "भो गौतम, कोणत्याहि वर्णाच्या मनुष्यानें हीं पापें केलीं असतां तो नाकारला जाईल. ब्राह्मण काय अथवा अब्राह्मण काय, सर्वांनां आपल्या पापाचें प्रायश्चित्त भोगावेंच लागणार."

बुद्ध म्हणाला "एकादा ब्राह्मण जर प्राणघातापासून निवृत्त झाला, चौर्यकर्मापासून निवृत्त झाला, व्यभिचारापासून निवृत्त झाला, असत्यभाषणापासून निवृत्त झाला, शिवीगाळीपासून निवृत्त झाला, वृथालापापासून निवृत्त झाला, परधनाच्या लोभापासून निवृत्त झाला, द्वेषापासून निवृत्त झाला आणि नास्तिकत्वापासून निवृत्त झाला, तर तोच काय तो देहावसानानंतर स्वर्गलोकाला जाईल; पण इतर वर्णांचे लोक या पापकर्मांपासून निवृत्त झाले, तर ते स्वर्गलोकाला जाणार नाहींत, असें तुला वाटतें काय?"
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel