मिगार जरी फार संतापला होता, तरी विशाखेच्या अंगाला हात लावण्याची त्याला किंवा त्याच्या नोकरांनां छाती झाली नाही. ती शांतपणे आपल्या सासर्‍याला म्हणाली “आपण माझ्यांवर इतके रागावूं नये. मी काहीं विकत आणलेली दासी नाही. मी आपल्यासारख्याच थोर कुलांत जन्मलेली आहें. प्रथमत: माझा अपराध माझ्या पदरांत घाला, आणि मग मला येथून जावयाला सांगा. माझ्यावर विनाकारण तोहमत येऊं नये म्हणून माझ्या पित्यानें येथें आठ कुलीन गृहस्थांनी माझ्या अपराधाची नीट चौकशी करण्याविषयी सांगून ठेविलें आहें. तेव्हां त्यांच्यासमोर माझा दोष काय आहे, हें मला सांगा. जर माझा अपराध आहे असें ठरलें, तर मी खुषीनें येथून निघून जाईन.”

हें सुनेचे स्पष्ट बोलणें ऐकून मिगाराचा भडकलेला राग जरा दबला गेला. त्यानें त्या आठ कुलीन गृहस्थांनां ताबडतोब बोलावून आणलें, आणि आपल्या सुनेचा गुन्हा त्यांनां सांगून तो म्हणाला “हिला माझ्या घरांतून आजच्या आज घालवून द्या.”

ते गृहस्थ म्हणाले “काय गे विशाखे! आपला सासरा घाणेरडें अन्न खातो असें तूं म्हटलें आहेस काय?”

आणखीहि विशाखेचे कांही बारीकसारीक दोष मिगारानें त्या गृहस्थांनां सांगितले, पण चौकशीअंती ते दोष नसून मिगाराचा केवळ गैरसमज झाला होता असें दिसून आलें. तेव्हां मिगार म्हणाला, “पण इचा बाप जेव्हां येथें आला, तेव्हां आमच्यासमोर त्यानें हिला दहा नियम शिकविले. आम्हांला तर ते निवळ वेडेपणाचे दिसतात. मग हिला त्यांचा अर्थ काय समजला असेल तो असो!”

ते गृहस्थ म्हणाले “काय गे विशाखे! धनंजयश्रेष्ठीनें तुला कोणते नियम शिकविले, व त्यांचा अर्थ काय?”

विशाखा म्हणाली “आंतली आग बाहेर नेऊं नये, हा पहिला नियम माझ्या पित्यानें मला शिकविला. त्याचा अर्थ असा आहे, कीं, घरांत कांही भांडणें वगैरे झालीं, तर त्यांची वार्ता बाहेर पसरूं नये. बाहेरची आग आंत आणूं नये, हा दुसरा नियम. म्हणजे शेजारीपाजारी, सासूसासर्‍यांचे किंवा जावानणदांचे अवगुण बोलत असले, तर तें वर्तमान आणून घरांत सोडूं नये. देणारालाच द्यावें, हा तिसरा नियम; व न देणाराला देऊं नये, हा चवथा नियम. यांचा अर्थ हा कीं, जो कोणी घरांतील वस्तु उसनी दिली असतां परत करतो, त्यालाच ती द्यावी; जो परत देत नाहीं, त्याला देऊं नये. देणारा किंवा न देणारा असला, तरी द्य़ावें, हा पाचवा नियम आपल्या जवळच्या आप्ताला लागू आहे. म्हणजे आपल्या आप्तवर्गात कोणी दरिद्री असला, व उसना घेतलेला जिन्नस परत करण्याचें सामर्थ्य त्याच्या अंगी नसलें, तरी देखील तो त्याला द्यावा. सुखानें बसावें हा सहावा नियम, व सुखानें जेवावें हा सातवा नियम, आणि सुखानें निजावें हा आठवा नियम. यांचा अर्थ असा कीं, वडील माणसें ज्या ठिकाणीं वारंवार येतात त्या ठिकाणी बसूं नये; त्यांचें जेवण होण्यापूर्वी आपण जेवूं नये; नोकरांचाकरांचा समाचार घेऊन मग जेवावे; वडील माणसें निजण्यापूर्वी आपण निजू नये, त्यांची व्यवस्था लावून मग निजावें. अग्नीची पूजा करावी, हा नववा नियम. पतिव्रता स्त्रीला पति अग्नीसारखा पूज्य असावा, व ब्राह्मण जसे अग्नीची परिचर्या करतात,. तशी तिनें आपल्या पतीची शुश्रूषा करावी, हा या नियमाचा अर्थ आहे. गृहदेवतांची पूजा करावी, हा दहावा नियम, म्हणजे सासूसासरे इत्यादि वडील माणसांनां गृहदेवता समजून त्यांची सेवा करावी.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to बुद्धलीला सारसंगह


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत