जनमेजय रागानें जळफळत होता. त्याची सर्वत्र छी:थू: होत होती !तो दांतओठ खात होता. त्यानें आज पुन्हां सारे कैदी बाहेर काढले. दोरीनें बांधून उभे केले. पतीजवळ पत्न्या उभ्या करण्यांत आल्या. कोणाच्याजवळ मुलेंहि होती. एकेक कुटुंब बलिदानार्थ रांगेने उभें करण्यांत आलें. होमकुंडें पेटलीं. तुपाच्या धारा ओतून काष्ठें शिनगांवण्यांत आली. त्या ज्वाळाखाऊं की चावूं करीत होत्या  !  जनमेजयाच्या द्वेषाला खाऊं पाहात होत्या.

'कोठें आहे ती वत्सला ? 'जनमेजय हा राजाच नव्हें. जो प्रजेचें ऐकत नाहीं तो का राजा ? तो लुटारू चोर.' असें हिनें म्हटलें, नाहीं का ? आणा तिला पुढें. तिच्या नव-यालाहि ओढा.' जनमेजय गर्जला.
दोघांना दोरखंडांनी बांधून उभे करण्यांत आलें.

'काय वत्सले,विचार केलास की नाहीं ! या पतीला सोड, माझी क्षमा माग. प्राण नको असतील तर तयार हो. प्राण हवे असतील तर माझी आज्ञा ऐक.' तो म्हणाला.

'जा रे पाप्या ! तुझे तोंडहि पाहावयाची मला इच्छा नाहीं. तुझे अपवित्र शब्द ऐकण्याची इच्छा नाहीं. तुझ्यासारखें पापात्मे ज्या भूमीवर नांदतात ती भूमि सोडून जाण्यासाठी मी उत्सुक आहें. जाऊं दे देवलोकीं, दुस-या लोकीं. पतीला सोडून पत्नी राहूं शकत नाहीं. हें तुला किती सांगायचे ? प्रभा प्रभाकराला सोडीत नाहीं. जोत्स्ना चंद्राला सोडीत नाहीं. हे अविनाभाव संबंध असतात ! नाग पवित्र आहेत. तूं मात्र धर्मभ्रष्ट चांडाळ आहेस. सहस्त्रावधि लोकांचे, स्त्रीपुरुषांचे, मुलाबाळांचे हवन करूं पाहणारा, तूं का मनुष्य ? तूं वृकव्याघ्र आहेस. वृकव्याघ्रहि बरे. ते रक्ताला इतके तहानलेले नसतात. तूं कोण आहेस ? तुझ्या पशुत्वाला, दुष्टत्वाला तुलना नाहीं. मला धर्म शिकवितो आहे ! हा तुझा रक्तलांच्छित धर्म, हा का धर्म ? निरपराधी जीवांचे रक्त सांडणें हा का धर्म ? हा धर्म नाहीं. ही तुझी जहरी लहर आहे. द्वेषाची लहर म्हणजे विषाचा वणवा, विषाची लाट ! तुझ्या राज्यांत एक क्षणभरहि जगण्याची मला इच्छा नाहीं. जेथे सर्वांच्या विकासाला अवसर नाहीं तें राज्य केवळ पापरूप आहे. तुमचे कायदे, तुमच्या संस्था सर्वांच्या विकासाला कितपत साहाय्य करतात यावर तुमच्या राज्याची वा धर्माची प्रतिष्ठा. नकों तुझें राज्य, नको तुझा हा धर्म. मला लौकर जाऊं दे. कुठल्या होमकुंडात उडी घेऊं, बोल. आमचे मांस चुरचुर जळतांना पाहून तुझ्या अंगावर मूठभर मांस चढो. आम्हां हजारोंच्या आगींत जळण्यानें तुझ्या एकटयाचा राग शांत झाला तरीहि पुष्कळ झालें. सूर्याला जन्म देतांना सर्व प्राची दिशा लाल लाल होते. ती रक्तबंबाळ होऊन पडते व बालसूर्य वर येतो. तुझ्या जीवनांत ज्ञानरवि यावा म्हणून आम्ही हजारों लहानमोठीं माणसें आमचें रक्त सांडायला उभीं आहोत. बोल राजा......    "

वत्सला बोलत होती तों तिकडून प्रचंड जयनाद आले. शांतिगर्जना आल्या. आस्तिक भगवानांचा जयजयकार कानीं आला. 'ऐक्याचा विजय असो ! ' असे ध्वनि कानांवर आले. 'ससैन्य इंद्र का आला ? आस्तिकांचा का जयजयकार ? का खरोखरच आस्तिक आलें ! मला ही वार्ता कशी कळली नाहीं ? वक्रतुंडानें कां सांगितली नाहीं ?' जनमेजय अशा विचारांत पडला. होमकुंडे धडधडत होती. राजानें उभें राहून दूर पाहिलें. जणूं राज्यांतील सारी प्रजा येत आहे असें त्याला वाटलें. लाखों स्त्रीपुरुषांचा सागर येत होता. पिवळया शांतिध्वजा दुरून दिसत होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel