यांना छाटून सारखें करणें म्हणजे का समानता ? तो मूर्खपणा होईल. परंतु त्या त्या बोटांच्या वाढीसाठी हृदयांतील रक्त हवें असेल तितकें मिळेल. समानतेच्या महान् तत्वाची टिंगल करूं नका. तसेंच स्वातंत्र्याचें तत्त्व. कितीजणांना त्याचा नीट अर्थ समजला असेल तें देव जाणे ! स्वातंत्र्य म्हणजे संयम. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हें. असंयमी स्वातंत्र्य मारक आहे. संयमी स्वातंत्र्य तारक आहे. तुम्हांला वासनेचें गुलाम होण्याचें स्वातंत्र्य पाहिजे की वासनासंयम करण्याचें स्वातंत्र्य पाहिजे ? शेवटी मनुष्याची पात्रता तो देहभोगांना, इंद्रियसुखांना केवळ स्वत:च्या स्वार्थाला कितपत महत्त्व देतो यावरच आहे. तो वासनांचा दास आहे की स्वामीं आहे, यावर त्याच्या स्वातंत्र्याची किंमत आहे.' त्या दिवशी त्यांनी किती सांगितलें ! तें प्रवचन माझ्या कानांत घुमत आहे. मी थकून गेलों होतों म्हणून माझ्या पायाला त्यांनीं तेल चोळलें ! थोर गुरुमाउली होती ती ! कुठें बरें ते असतील ? कधीं भेटतील ? वत्सले, ह्या नागानंदाला त्यांनी बनविलें. आणि लहानपणीं आईनें बनविलें. या दोन मातांनी माझ्या मडक्याला आकार दिला, माझ्या जीवनाच्या घडयांत रस भरला.' तो कंठ भरून येऊन बोलतां बोलतां थांबला.
'आणि असा हा मंगल घडा मला डोक्यावर घेऊन नाचूं दें. तुमचें जीवन मी पूजीन. तें माझें करीन. तुमचा भरलेला घडा माझ्या जीवनांत ओता. तुमचा रिता होणारच नाहीं. आणि माझें जीवनहि फुलेल.' वत्सला म्हणाली.
'आतां जेवा. कढत कढत भाकरी व दूध घ्या. ऊठ, वत्सला, उठवतें का ?' सुश्रुतेनें प्रेमळपणें विचारिलें.
'होय, उठवतें कीं ! आतां दहा कोस पळतसुध्दां जाईन.' ती म्हणाली.
वत्सला व नागानंद जेवायला बसलीं. दोघांना अपार आनंद होत होता. तो तोंडावर फुलला होता. त्या खोलींत पसरला होता. सुश्रुतेच्या मुखावरहि प्रसन्नतेचे मळे दिसत होते. कोणी बोलत नव्हते. हळूच नागानंद वत्सलेकडे बघे व त्याचा तुकडा खालीं पडे. तिचेंहि तसेंच होई. सुश्रुतेला हंसूं येई.
'कां ग हंसतेस, आजी ? मला नको जा जेवायला मुळीं. तूं आपलीं हंसतेस. मलाच हंसतेस. उठूं मी ?' लडिवाळपणाचा राग आणून वत्सलेनें विचारिलें.
'पोट भरलें आहे म्हणून जेवायला नको असेल.' आजी म्हणाली.
'त्यांचे सुध्दां का भरलें आहे ? ते तर दमूनभागून आलेले. परंतु त्यांचीहि भाकरी सरत नाहीं.' वत्सला म्हणाली.
'अति प्रमानें भूक मरते.' नागानंद म्हणाला.
'अति आनंदानेंहि मरते.' सुश्रुता हंसून म्हणाली.