ती त्या शिलाखंडावर जाऊन बसली. तिकडे सूर्य अस्ताला जात होता. लाल-लाल रंग पसरला होता. वारा गोड सुटला होता, सुगंधी, शीतल असा वारा. कृष्णीचें हृदय फुलून आलें होतें. तोंडावर प्रेम व प्रसन्नता गळयांत फुलांची सुंदर माळ घातली. कृष्णी एकदम चमकून उठली. त्यानें तिला हृदयाशीं धरिलें.
'कृष्णे, तूं माझी देवता.' तो म्हणाला.
'तुम्ही माझे देव.' ती म्हणाली.
दोघें त्या शिलाखंडावर बसलीं होती. वा-यावर कृष्णीचे केस उडत होते. तिचें हृदय प्रेमसिंधूत डुंबत होते.
'आपण दोघें घरी जाऊं व आईचा आशीर्वाद घेऊं. सुरुता आजींचाहि घेऊं.' ती म्हणाली.
'तूंच येथें असस. फुलें झोपडींत टाकीत असस. दारावर तोरणें बांधीत असस. सुश्रुता आजी म्हणाल्या, 'गंधर्व असें करतात.' तो गंधर्व सांपडला. ती अप्सरा सांपडली. कृष्णे, तुला भीति कशी वाटत नसें ? 'त्यानें तिचा विचारिलें.
'प्रेम जीवनांत भरलें म्हणजे भीति जाते. कोणतीहि भावना पराकोटीला गेली कीं दुस-या भावना नष्ट होतात. ' ती म्हणाली.
दोघें गेलीं. हातांत हात घालून गेली. सुश्रुता आजी कृगाजिनावर बसली होती. जपतप करीत होती. तों ही वधूवरें आलीं. तिच्या पायां पडली.
'आजी, ही कृष्णी माझी झोंपडी सजवी. माझ्या झोंपडींत फुलें ठेवी. माझ्या निद्रेत ही माझी प्रेमपूजा करून जाई. मला प्रदक्षिणा घालून जाई. या कार्तिकाला तिनें देवत्व दिलें आहे या मातीच्या ढिपळज्ञला तिनें आपल्या प्रेमाच्या शक्तीनें मोलवान् मोतीं बनविले आहें. खापरीला परिस बनविलें आहे. आजी, आम्हांला आशीर्वाद द्या. आम्हीं सायंकाळी आकाशांत पेटलेल्या देवाच्या घरच्या अग्नीसमक्ष एकमेकांस वरिलें. ' तो म्हणाला.
वृध्देनें कृष्णीला जवळ घेतलें. तिच्या तोंडावरून हात फिरविला. त्यांना तिनें आशीर्वाद दिला. तिनें त्यांना केळीं खावयाला दिलीं. गोड गोड केळीं.
नंतर कृष्णीच्या घरीं उभयंता आलीं. आई वाट पाहत होती.