नाग लोक कलावान् आहेत. सृष्टीच्या सान्निध्यांत राहून ते शिकले असतील कला. नाहीं का ? आजी, नागानंदांना सारें येतें. त्यांना फुलें फुलवितां येतात, शेती करतां येते, बांसरी वाजवितां येते, परडया विणतां येतात. ते आले तर त्यांच्याजवळून एक सुंदरशी परडी करून घेईन. फुले आणायला परडी. पण ते येतील का ग, आजी ? कशाला येतील ते आपणांकडे ? काय आहे आपणांजवळ ? ना धन, ना दौलत, ना प्रासाद, ना ऐश्वर्य. ना सहस्त्रावधि गोधन, ना क्रोशावधि कृषि. काय आहे आपणांजवळ ? एक शेत आहे. दुसरें काय आहे ?' वत्सला निराशेनें म्हणाली.
दिवस जात होते. वत्सलेचा आनंद नाहीसा झाला होता. ती खिन्न असे म्लान दिसे. जणूं तिची चित्कळा कोणी नेली, तिचे प्राण कोणीं नेले. ती नदीतीरीं जाऊन बसे व रडे. त्या नदीचे नांव कपोताक्षी होतें. लालसर झांक पाण्यांवर असे. वत्सला म्हणायची, 'माते कपोताक्षि, कशाला मला सोडलेंस, कां टाकलेंस ? तू आपल्या कुशींत मला कां कायमचें झोंपवलें नाहीस ? तुझीं वेदगीतें ऐकत मी कायमची झोंपलें असतें. परंतु आतां काय ? या बाजूनेंच ते धांवत आले व येथून त्यांनी उडी मारली. ह्या अभागिनीसाठी उडी मारली. मला तारणाराच माझ्या जीवनांत आग पेटवीत आहे अशी कोणाला असेल का कल्पना ? आपले तारणारे हात म्हणजे आगीचें कोलीत आहेत, अशी त्यांना तरी असेल का कल्पना ? जगांत सारा विरोध आहे. आनंदवणारे डोळेच आग लावतात. ती आग असह्य तर होते, परंतु नसावी असेंहि वाटत नाही ! वत्सले, रड, रड. या कपोताक्षीच्या प्रवाहांत हृदयांतील प्रवाह ओत. समुद्राला मिळूं जाणा-या या नदींत तुझें हृदय रितें कर.' असें ती बोले, मनांत म्हणे.
एखाद्या भरलेल्या विहिरीजवळ ती जाई व म्हणे, 'विहिरी, तूं भरलेली. परंतु मी रिती. माझ्या जीवनाची विहीर कधी भरेल ?' एखाद्या सुंदरशा फळांच्या मळयाजवळ ती जाई व म्हणे, 'मळया, तूं भरारला आहेस. परंतु माझा मळा केव्हा भरारेल ? माझा मळा का ओसाड राहणार ? नाहीं का मिळणार मला बागवान, माझा बागवान ? मळयाला आंतून कळा लागल्या आहेत. बागवानाचें दर्शन होतांच एकदम फुलेल, फळेल; परंतु केव्हा होणार दर्शन ?' एखाद्या वेळी गांवांतील मुली एकत्र बसून फुलांचे हार करीत बसत. वत्सला एकदम तेथें जाई व विचारी, 'कोणाला ग हार घालणार ? सांगा ग सख्यांनो, सांगा व सयांनो; हे हार कोणाच्या कंठांत शोभणार, कोणाच्या छातीवर रुळणार ? तुम्हांला भेटलें वाटतें कोणी, तुमची वाट पाहात आहे का कोणी ? हे काय, स्वत:च्या गळयांतच तुम्ही हार घालणार ? आपलींच पूजा ? आपली आपणच पूजा करण्यांत काय अर्थ ? दुस-यानें आपली पूजा करावी ह्यात सुख आहे. मी माझ्या गळयांत नाहीं घालणार हार ! माझ्या हातचा हार त्यांच्या गळयांत घालीन. रोज हार करतें व नदीच्या पाण्यावर सोडून देतें. घरीं सुकून जातात. नदीच्या पाण्यावर टवटवीत दिसतील, नाहीं ? त्यांना जाऊन किती दिवस झाले ? त्याचे ठिपके ठेवले आहेत भिंतीवर मांडून. चंदनाचे ठिपके. ते ठिपके मी बघतें व माझे डोळे टिपकतात. भिंतीवर नवीन ठिपका मांडतांना डोळयांतून अनंत ठिपके गळतात !'