'मी सांगतो.' शुध्दमति म्हणाला.
'सांग बरें.' गुरुदेव प्रसन्न होऊन म्हणाले.
'ज्याप्रमाणें झाड आपली मुळें सर्व दिशांत पसरून ओलावा मिळवितें व स्वत:ची वाढ करून घेतें, त्याप्रमाणें मानवानेंहि जेथें जेथें प्रकाश मिळेल, चांगुलपणा मिळेल, तेथून तेथून ता घेऊन स्वत:चा विकास करावा. जे झाड आपलीं मुळें दूरवर पसरतें, तें सुदृढपणें उभें राहते, असाच ना तुमचा आशय ?'
'होय बाळ. आर्यांनी नागांजवळचें चांगलें असेल तें घ्यावें व नागांनी आर्यांजवळचे घ्यावें. कोणाजवळ कांहींच चांगुलपणा नाहीं अशी भिकारी वस्तु वा व्यक्ति ईश्वराच्या विश्वांत नाही. विषांतहि अमृतत्व असतें. कांही विषें अप्रतिम औषधें होतात. उपयोग करून घेणा-यावर सारें आहे. आपण सर्व वस्तूंचा उपयोग करून घेतो. परंतु मानवाचा सदुपयोगआपणांस करून घेतां येऊं नये, हे आश्चर्य नाहीं का ? या आश्रमांतून तरी जे तरुण बाहेर पडतील ते मानव्याची उपासना करणारे होवोत. आजकाल आर्य व नाग यांच्यांत द्वेष वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रकट रीतींने होत आहेत, अप्रकट रीतींने होत आहेत. द्वेषसंवर्धनाचे आश्रम व शाळा सुरू होत आहेत. अशा या जगांत तुम्ही शांतीचे उदकुंभ भरून न्या.' आस्तिक गंभीरपणें म्हणाले.
'परंतु कांही लोक वाईटच असतात. 'दुर्जन: परिहर्तव्य:'।' बोधायन म्हणला.
'वाईटपणा हा एक वरचा पापुद्रा असतो. एखादा कंद जरा वर वाईट दिसला तर आपण एकदम फेंकीत नाहीं. तो आंत बघत जातों. चांगला भाग दिसेल तो घेतों. आपण एक गमतीचा प्रयोग करूं या. तुमच्यांत सर्वांत झोंपाळू कोण आहे ?' गुरुदेवांनी हंसून विचारिलें.
'नागेश.' आर्यव्रत म्हणाला.
'कधीं रे पाहिलेंस ? आर्यव्रतच आहे आळशी.' नागेश रागानें म्हणाला.
'आळशीं म्हणजे झोंपाळूं नव्हे.मी पडलेला असलों तरी जागा असतों.' आर्यव्रतानें उत्तर दिलें.
'तें तर फारच वाईट. मला झोंप लागलेली असते. मी उगीच लोळत नसतों.' नागेश म्हणाला.
'म्हणजे झोंप तुला फार येते हें तूंच कबूल केलेंस.' आस्तिक म्हणाले. सर्व मुलें हंसूं लागलीं.