'आजी, खालीं कशाला येऊं ? येथूनच पटकन् वर जातां येईल. देवाकडें पटकन् उडून जाईन. रडूं नको. आजी, येथें कां बसलें सांगू ? अग, तो लबाड येईल एकदम. झाडावर असलें म्हणजे मला दिसेल. मग मी त्याला शीळ घालीन. तो ओळखील. कारण, त्या दिवशीं सोनें लुटतांना मी तशी शीळ घालीत होतें. त्याला फार आवडे. शीळ ऐकून तो इकडे येईल. या झाडाखालीं येईल. मग मी वरून फुलांची वृष्टि करीन. डोळयांतील फुलांचा पाऊस पाडीन. त्यांना कोणतीं आवडतात तीं विचारीन. 'बकुळीची आवडतात कीं डोळयांतील आवडतात ?' अशी वर नको बघूंस, आजी. तुझी मान दुखेल. टाकूं उडी ? मला झेलशील ? पदरांत घेशील ? बरें नको. मी खालीं येतें. आतां घरांतून बाहेरच नाहीं पडणार. पण तेंहि तुला आवडत नाहीं. म्हणतेस कीं, वत्सले, जरा हिंडावें, फिरावें ! करूं तरी काय मी ? तो कां येत नाही ? मग प्रश्न नसता असा पडला.' असें म्हणत ती खाली आली.
वत्सला अगदीं कृश झाली. तिला खाणें जाईना. दूध पिववेना. सुश्रुता सचिंत बसे.
'वत्सले, तुझ्यासाठी मी घडाभर मध आणला आहे. तुला लहानपणीं आवडत असें. मध घेत जा. थकवा जाईल. शक्ति येईल. भातावर मध घालावा. दूध घालावें. घेत जाशील का ? बघ तरी कसा आहे तो.' कार्तिक म्हणाला.
'कार्तिक, अरे माझ्या मधाचा घडा निराळा आहे. वेडा आहेस तूं. हा मध का चाटायचा आहे ? ह्या घडयाऐवजीं तो घडा आणतास तर ? जिवंत घडा. त्याला शोधून आण. ते आले तर मातीहि गोड मानीन. ते नसतील तर अमृतहि कडू म्हणून धिक्कारीन. उपनिषदांत आहे ना तें वचन ? त्याला एकाला जाणल्यानें सारें जाणतां येतें. त्याची गोडी चाखली कीं मग इतर सारें गोड लागतें. त्याचा अनुभव घेत आहें मी. शुष्क बाह्य ज्ञान अनुभवानें ओलें होत आहे. ठेव हा घडा; कार्तिक, रडूं नकोस. तुझ्यासाठीं मीं कांहींहि करीन. काय करूं सांग.' तिनें विचारलें.
'या जन्मीं कांही नको. या जन्मीं मी तपश्चर्या करीन. तपश्चर्येशिवाय फळ वांछूं नये. खरें ना ?' तो सकंप म्हणाला.
'जग हें असेंच आहे. मीं एकासाठी रडावें, दुस-यानें माझ्यासाठीं रडावें.' वत्सला म्हणाली.
'परंतु त्या दुस-यासाठीं कोण रडत आहे ? कांहीं असे अभागी असतील कीं ज्यांच्यासाठी कोणीच रडत नसेल.' कार्तिक म्हणाला.
'त्यांच्यासाठीं चराचर सृष्टि रडत असेल. त्यांच्यासाठीं नदी रडते, मेघ रडतात, दंवबिंदु रडतात, अज्ञात अश्रुं अनंत आहेत. कार्तिक, मी वांचणार नाहीं. मी मरेन, मरणें का वाईट आहे ? वाईटच. अशा वयांत मरणें वाईटच. आगडोंब पेटला असतां मरणे वाईटच.' वत्सला दु:खानें म्हणाली.