प्रजेचा संबंध ह्या सर्व कर्मचारींशी प्रत्यक्षही येतो. ह्या कर्मचारींची कृपा असावी असें प्रजा इच्छीत अते. म्हणून प्रजाहि आपले विचार त्या कर्मचारींच्या विचाराप्रमाणे ठेवते. जर कोणी त्या विचाराविरुध्द वागणारा, बोलणारा निघाला तर कर्मचारी त्याचे शासन करितात, त्याला देशत्याग करायला लावतात, त्याला देहदंड देतात. म्हणून शेवटी 'जसा राजा तशी प्रजा ' हे म्हणणें खरें होतें. माझ्या विचारांचा तू कां होत नाहींस ? मी तुझ्याजवळ पूर्वी बाललों होतों. ह्या नागजातीचें उच्चाटन केलें पाहिजे. तूं सर्व आर्यांत ह्या कल्पनेचा प्रसार कर. जे जे राजे तुझे मांडलिक असतील त्यांनाहि ह्या विचारांची दीक्षा दे. जे इतर राजे तुला भीत असतील, तुला मानीत असतील, त्यांनाहि ह्या नवसंघटनेत घे. राजा, आर्य रक्त शुध्द राहिले पाहिजे. किती तरी आर्य तरुण नागतरुणींशी नि:शंकपणे विवाह लावीत आहेत. परंतु हेहि एक वेळ राहूं दे. अरे, आतां आर्यकन्या नागतरुणांशी विवाहबध्द होत आहेत. मला असें वाटूं लागलें आहे की, मुलांची लग्ने आईबापांनी लहानपणीच करावी, म्हणजे हे अतिरेक बंद होतील. परंतु माझें हे म्हणणे ऐकून लोक हंसतात. अनेक आश्रमांतून मी तेथील कुलपतींजवळ चर्चा केल्या. परंतु बाल-विवाह त्यांना पटत नाहीत. 'लग्न म्हणजे गंमत नव्हें.' असें ते म्हणतात.  परंतु आजच माझ्या मतें लग्नाची गंमत झाली आहे. वाटेल त्यानें उठावें व वाटेल त्याच्याशी लग्न लावावें. हा का गंभीरपणा ? राजा, तूं एक आज्ञापत्र काढ कीं, आर्यकन्यांनी नागांशी विवाह करूं नयेत. नागतरुणांनी आर्यकुमारिकांजवळ लग्न लावण्याचें धाष्टर्य करूं नये. मला हा संकर बघवत नाही. आर्यांची संस्कृति उच्च. नागाशी मिश्रणें होत असल्यामुळे आर्यसंस्कृतीचा हा अध:पात होत आहे. आर्यांच्या संस्कृतीचा प्रसार झाला पाहिजे. ठायींठायीं आमच्या आर्यांच्या वसाहती झाल्या पाहिजेत, आमच्या संस्कृतिप्रसाराचे आश्रम निघाले पाहिजेत. पूर्वी ही कामें करणारे ध्येयवादी पुरुष किती तरीं असत ! परंतु आज सारा गोंधळ होत आहे. उदारपणाच्या नांवाखाली भ्रष्टाचार होत आहे. ह्या नागांचे भस्म करावे असें वाटतें; परंतु माझ्या एकटयाच्या मनांत येऊन काय होणार ? 'वक्रतुंड थांबला.

'वक्रतुंड, तुम्ही बरेच दिवसांपासून हें मला सांगत आहांत. परंतु अजूनहि तुमचे विचार सर्वस्वी मला पटत नाहीत. माझ्याच आजोबांनी नागकन्यांजवळ नव्हते का विवाह लाविले ? उलूपी व चित्रांगी ह्या नागकन्याच होत्या. त्यांना जर हे संबंध निषिध्द वाटते, तर त्यांनी असें केलें नसतें.' परीक्षिति म्हणाला.

"राजा, अर्जुनानें त्या नागकन्यांशी विवाह लाविला खरा; परंतु त्यांना इंद्रप्रस्थास त्यानें कधीं आणलें नाही. सुभद्रेचा, द्रौपदीचा मान त्यांना कधी दिला नाही. अशा संबंधांना ते प्राचीन आर्य श्रेष्ठ मानीत नसत. वीरांची ती करमणूक होती. ज्या वेळीं बभ्रुवाहन अश्वमेघाच्या त्या प्रसंगी अर्जुनाला सामोरा आला, त्या वेळीं अर्जुन काय म्हणाला ? 'तो अभिमन्यु, तो खरा माझा पुत्र. माझा पुत्र म्हणून तूं मिरवत जाऊं नकोस ! कोल्ह्याने सिंहाचा छावा होण्याची व्यर्थ आकांक्षा धरूं नये.' ते उद्गार ऐकून बभ्रुवाहन संतापला. त्याला आईचा अपमान वाटला. मग तुंबळ रणकंदन झालें. तुझे आजोबा नागकन्यांजवळचे ते संबंध कोणत्या रीतीनें मानीत, त्यांना कितपत महत्त्व देत ते ह्यावरून कळून येईल. हेंच त्या भिंतीवरचें चित्र पाहा. तुझे आजोबा खांडववन जाळीत आहेत. नर्मदेच्या तीरावर तक्षककुळांतील नागांची केवढी वसाहत होती ! परंतु त्या महान् अग्नीला तेथें आश्रम स्थापावयाचा होता. नद्या म्हणजे वसाहतींच्या जागा. सर्व नद्यांच्या तीरावर आर्यांचे आश्रम झाले पाहिजेत, असें महर्षि अग्नीला वाटे. आश्रमापाठोपाठ वस्ती होते. सुपीक प्रदेश आपले होतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel