'मी आपला जातों. माझ्यासाठीं तुम्हां कोणाला नको मार.' असें म्हणून शशांक घरीं आला. तो रडत रडत आला. एकदम जाऊन पणजीला त्यानें मिठीं मारली. सुश्रुतेंनें त्याला जवळ घेतले.
'काय झालें राजा ? पडलास का ? मारलें का कोणीं ? बोललें का कोणी माझ्या लेकराला ! ' ती विचारूं लागली.
'तू हीन आहेस, नीच आहेस' असें कां ग मला म्हणतात ?' आमच्या मुलांत खेळायला नको येऊं' असें म्हणतात. मी का वाईट दिसतों ? कां मला बोलतात ?' शशांक विचारूं लागला.
'तूं आपला घरींच खेळत जा. ते दुष्ट आहेत लोक. नको जाऊ त्यांच्यांत. मारतील. सुध्दां. घरांत खेळावें.' ती म्हणाली.
'घरांत ग कुणालाजवळ खेळणार ?' त्यानें रडत विचारिलें.
'माझ्याजवळ खेळ. मी खेळेन तुझ्याशीं. मला नाहीं कंटाळा येणार. मी छपेन, तूं मला शोध. तूं छप, मी तुला शोधीन. मी तुला अंगणांत पकडीन. तूं मला पकड. 'चिमणुली बाय तुझ्या घरात येऊं.' तो खेळ खेळूं. रडूं नकों.' सुश्रुता समजावीत म्हणाली.
'मला नाहीं मोठया माणसाबरोबर खेळायला आवडत. मला तुझ्याजवळ निजायला आवडतें, परंतु खेळायला नाहीं आवडत मुलांबरोबर गंमत असते. मला आणखी भाऊ कां ग नाहीत ? लहान नाही, मोठा नाहीं. मी आपला एकटा. इतर मुलांचे भाऊ आहेत, बहिणी आहेत. हंसतेस तूं. मी बोलतच नाहीं.' असें म्हणून शशांक रुसून बसला.
'तूं आपला शेतावर जा. तेथें गाईची वांसरें आहेत. शेजारच्या जंगलांत मोर आहेत. वानर आहेत. हरणेंसुध्दां आहेत. जा तेथें. त्यांच्याबरोबर खेळ. गाईची वासरें तरी लहान आहेत ना ? तीं नाहंत तुला नांवे ठेवणार.' सुश्रुता म्हणाली.
'त्यांना मी नीच नाहीं वाटणार ? हीन नाहीं वाटणार ? मोर तर श्रीमंत असतो. तरीहि मला हंसणार नाहीं ? माणसांपेक्षां का गाय, मोर, हरणें, चांगली असतात ?' शशांकानें विचारिलें.
'मोर हंसत नाहीं. उलट मुलांना आपलीं पिसें देतों. किती तरी मोरांची पिसें मजजवळ आहेत. तुला मी त्यांचा मुकुट करणार आहें. तुला तो छान दिसेल. मग तुला पाहून मोर अधिकच नाचेल.' सुश्रुता म्हणाली.