'इंद्र तर युध्दार्थ चाल करून येत आहे असें कळतें. जनमेजयानें त्याला अपमानास्पद पत्र लिहिलें. त्यामुळें इंद्राला संताप आला आहे.' हारीत म्हणाले.
'आपण दोघांकडचे हजारों-लाखों शूर सैनिक मरण्याच्या आधीं हा प्रयोग करूं या. आपण तपस्वी लोक. हे अग्नींत देह होमिण्याचें तप करूं या. इंद्राला कदाचित् मग युध्दच करावें लागणार नाहीं. प्रेम उत्पन्न व्हावें, द्वेष-द्रो शमावेत म्हणून आपण जर आत्मसमर्पण केलें तर तें का व्यर्थ जाईल ? आणि समजा, व्यर्थ गेलें, तर करणारे करतील युध्दें. आपण एक लक्षांत ठेवलें पाहिजें कीं, जगांत कांही फुकट जात नाहीं. आपलें बलिदान फुकट नाहीं जाणार. तें विचार करावयाला लावील. कोणाला तरी विचार करायला लावील. मनुष्य कितीहि दुष्ट झाला तरी त्याच्यामध्येंहि खालीं खोल संदेश दडलेला असतो. पृथ्वीच्या पोटांत झरा असतों. वरची दगडमाती दूर करूं तर तो झुळझुळ वाहणारा झरा दिसेल. मनुष्याच्या सत्पवृत्तीवर अहंकाराचे, दुष्ट आकांक्षाचे दगड पडलेले असतात. हे दगड आपण आपल्या देहार्पणानें दूर करण्याची खटपट करूं या. आपण प्रत्यही अग्निपूजन करतों, समिधा अर्पितों. परंतु एके दिवशीं माझ्या लक्षांत आलें कीं, ध्येयार्थ आपला देह अर्पिणें म्हणजे खरें अग्निपूजन. या काष्ठमय समिधा जाळून प्रकाश मिळणार नाहीं, जीवनांत ज्ञानाग्नि पेटणार नाहीं. देहाची समिध होंमूं, आपल्या आसक्तीची, क्षुद्र वासना-विकारांची समिध होमूं, तरच ज्ञानाग्नि प्रज्वलित होईल. आपणांस आजच्या भेसूर अज्ञानांधकारांत विचारवन्हि पेटवायचाआहे. द्वेषानें थैमान मांडलें असतांना प्रेमळ ज्योत पेटवायची आहे. त्याला हा आत्महोम हाच उपाय. 'एष एव पन्था विद्यतें अयनाय, नान्य: पंथा ।' हाच मार्ग, दुसरानाहीं. लढाया लढतील, युध्दें करतील. त्यांतून आणखींच वैरें निर्माण व्हावयाचीं; हाडवैरें उत्पन्न व्हावयाचीं. पुढील पिढीला हीं वाढतीं वैरें द्यावयाचीं. त्यापेक्षां हा निर्वैर होण्याचा मार्ग अंगिकारूं या. आत्मा हा यजमान, श्रध्दा ही पत्नी व हा देह हा हवि असे हें दिव्य यज्ञकर्म आपण सुरू करूं या. आपणां सर्वांस काय वाटतें ?' आस्तिकांनी विचारिलें.
'योग्य आहे आपला विचार. अशी एक पवित्र प्रेमज्वाला पेटवूं या कीं या भरतखंडाला जी कायमची प्रकाश देईल; संतत मार्गदर्शन करील. माझे नांव आहे यज्ञमूर्ति, तुमच्याबरोबर येऊन नांव सार्थ करूं दे मला.' यज्ञमूर्ति म्हणाले.
'माझें नाव दधीची. त्या महान् प्राचीन हुतात्म्याचें नांव. मलाहि त्या नांवाला निर्मळ राखूं दे.' दधीचि म्हणाले.
'माझं नांव हारीत, सर्व सृष्टीला हरित करणारा तो का हारित ? शुष्क जीवनाला हिरवें हिरवें करणारा तो का हारीत ? आज जीवन नीरस झालें आहे. शुष्क झालें आहें. सहानुभूति संपुष्टांत आली आहे. मानवी जीवनांतील जीवनदायी झरे सुकून गेले आहेत. ओसाड भगभगीत दिसत आहे समाजसंसार. अशा वेळीं माझा शेवटचा यज्ञ मला करूं दें. 'यज्ञात् भवति पर्जन्य:।' असें श्रीकृष्णांनी सांगितलें आहे. आपण बलिदान करूं तर दुस-याच्या हृदयांत प्रेमाचा पाऊस पडेल. त्याच्या डोळयांतून प्रेमाचा पाऊस पडेल. खरेंच 'यज्ञात् भवति पर्जन्य:।' याचरणाचा आज मला अर्थ कळला. गंभीर अर्थ. आकाशांतील पावसासाठीं बाहेरची समिधा. जीवनांतील पावसासाठीं देहाची समिधा, प्राणांची समिधा.' हारीत म्हणाले.