'राजाच्या क्रोधाला शांत करण्यासाठीं बळी पाहिजेच असेल तर मी माझा देतें. मी नागकन्या आहें. परंतु मीं आर्याला वरिलें आहे. पत्नी पतींत मिळून जाते. मला आतां वास्तविक स्वतंत्र अस्तित्व नाहीं. मी आतां नाग कीं आर्य ? राजपुरुषांना सांगता येईल का ? पति पत्नीचा होतो व पत्नी पतीची होते. या देशांत आतां कोण खरे आर्य व कोण खरे नाग ?  शेंकडों नागकन्यांनी आर्यांना वरिलें आहे व शेंकडों आर्यकन्यांनी नागांना वरिलें आहें. या गांवातील आर्यकन्या वत्सला हिनें नागाला माळ घातली. मी नागकन्या आहें. मी आर्याला जीवन वाहिलें. नाग आणि आर्य ! काय आहे त्यांच्यात भेद ? आर्यमाता मुलांना वाढवते व नागमाता का फेंकून देते ? आर्य थोर आहेत व नाग का नीच आहेत ? आर्य व नाग हे शेवटीं मानव आहेत.

या सर्व गांवाची राख होण्यापेक्षां माझाी एकटीची होऊं दे. पेटूं दे जनमेजयाचे तें होमकुंड. ते होमकुंड एक दिवस सर्व आर्यांचे भस्म करील. ह्या होमकुंडाला आर्यांनी विझविलें पाहिजे. नागांची होळी पाहाल तर पुढे तुमची होळी होईल हे ध्यानांत धरा. पेराल तें मिळेल. नाग निर्भय असतों. नागकन्या निर्भय असतात. आम्हांला मारणाराची भीति नाहीं. कुठें आहे तुझें तें कोलित ? आण तें इकडे. (ती हिसकून घेतें.) माझ्या या हातावर हें बघ मी ठेवतें कोलित.  बघ.  बघ, फुलाप्रमाणें आत अग्नीला धरू शकतो, निखा-यांना फुलें मानतो, कोणला भीति घालतां, माकडांनो ? तुम्हांला ना माणुसकी, ना विवेक. या येथें शेंकडों आयाबहिणी बसल्या आहेत. यांचे शाप तुम्हांला भस्म करितील. तुम्ही नागांना नाहीं जाळीत, तुमचें भावी कल्याण तुम्ही जाळीत आहांत. पकडा मला, करा बध्द. खालीं नका माना घालूं. त्या होळींत नेऊन फेंका.

सभेंत फार प्रक्षुब्धता उत्पन्न झाली. सुश्रुता आजीं तेथें गेली. ती वृध्द सती उभी राहिली. ती म्हणाली. 'मलाहि न्या. माझ्या मुलानें कित्येक वर्षापूर्वी नागांच्या वसाहतीला आर्यांनी आग लावली असतां आगींत शिरून नागांना वांचविलें. त्या मुलाची मी माता. मलाहि आज आगींत शिरूं दे. नाग आगींत जात असतील तर आर्य कसे दूर राहतील ? नागमाता जाळल्या जात असतां आर्यमाता का दूर राहतील ? नागपत्न्या पतींपासून ओढल्या जात असतां आर्यपत्न्या पतीजवळ कशा राहतील ? स्त्रियांनी स्त्रीधर्म ओळखावा. मातेनें मातृधर्म ओळखावा. ही कृष्णी निघाली. परवां तिनें लग्न लावलें. प्रियकराचा हात जन्माचा हातीं घेतला. कोंवळी पोर. फुलाची कळी. ती आगींत शिरावयाला जाते. हातावर हंसत निखारे ठेवते. कोणाला हें पाहवेल ?  येथें कोणाला हे पाहवतें का ? चला-आपण सा-याजणीं जाऊं. जनमेजयासमोर उभ्या राहूं. जाळ म्हणावें आम्हांला. कर तुझ्या क्रोधाची शांति. या सर्व मायबहिणी ! उठा. या इकडे. शाबास. राजपुरुषांनो, पकडा आम्हांला. न्या. माझ्या देहाचीं हाडें आधीं फेंका यज्ञांत.'

कार्तिक एकदम तेथें धांवून गेला. तो म्हणाला, 'गांवातील स्त्रिया निघतात नि पुरुष मागें राहणार ? चला, आपण सारे जाऊं.  होळीचा समारंभ पार पाडूं. स्त्रियांच्या पुढे पुरुष होऊं देत. स्त्रियांनी आजपर्यंत कधीं अग्नीची भीति बाळगलीं नाहीं. त्या हंसत सती जातात. आतां पुरुषांनी दाखवावें तें तेज. चला, सारा गांव निघूं दे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel