'परंतु आधीं आणखी थोडें दूध घ्या.' तो म्हणाला.
'ते कशाला ? अजीर्ण होईल.' ती म्हणाली.
'बांसरी ऐकून सारें जिरेल. बांसरी तुम्हांला पागल बनवील. तुम्हाला मागून इतर कांही खाण्यापिण्याची शुध्द नाहीं राहणार. तुम्हाला भावनांचा भार सहन होणार नाहीं. म्हणून आधीं दूध पिऊन ठेवा म्हणजे तोल सांभाळेल. माझे ऐका.' तो म्हणाला.
'मी अशी दुबळी नाहीं. इतके दिवस माझें हृदय जो भार सहन करीत आहे, त्याच्याहून अधिक भार कोठें आहे जगांत ? वाजवां आतां लौकर. मी अधीर झाले आहें. पुरुष नेहमीं अंत पाहत असतात.' ती म्हणाली.
त्याने बासरी हातांत घेतली. दोनचार सूर काढून पुन्हां त्यानें ती नीट पुसली. जणूं सर्व सृष्टीला त्यानें आमंत्रण दिलें. सूचना दिली. पांख रें उडत उडत आलीं व जवळच्या वृक्षांवर बसलीं. हिरव्या निळया पंखांचे पक्षी ! गाईंनी माना वर केल्या. वासरांनी इकडे माना वळविल्या. वत्सला जरापदर सरसावून बसली. नागानंद वाजवूं लागले. दिव्य गीत आळवूं लागले. तें एक प्रसिध्द प्रेमगीत होतें. कपोताक्षीच्या तीरावरील सर्व गांवांत तें माहीत होतें. अनेक स्त्रियांच्या तोंडी तें होतें. काय होतें त्या गाण्यांत ? थोडा भावार्थ सांगूं ? त्यांतील सारा अर्थ सांगणें शक्तीबाहेरचें आहे. तो स्वसंवेद्य आहे. फुलांचा सुवास का समजून द्यावयाचा असतो ? अन्नाची चव का व्याख्यानानें कळते ? तसेंच गीताचें, काव्याचें ! परंतु थोडे सांगतों.
'भोळया डोळया ! त्या वेळीं त्याला कशाला रें पाहिलेंस तूं ? सांगत होतें बघूं नकोस. बघूं नकोस म्हणून. परंतु ऐकलें नाहीस. विश्वास टाकलास त्याच्यावर. परंतु आतां फसलास. रड आतां जन्मभर; रड आतां रात्रंदिवस.
आणि हें अधीर व बावळट हृदय ! त्याला नको देऊ जागा म्हणून पुन: पुन: याला सांगितलें, परंतु नाही ऐकलें यानें. आतां कांटा बोंचतो म्हणून सारखें रडत बसतें. रड म्हणावें आतां जन्मभर, रड रात्रंदिवस.
हे हात ! आतां कृश झाले म्हणून रडतात. परंतु त्याला घट्ट धरून ठेवण्यांत शक्ति उगीच खर्चू नका म्हणून सांगत होतें. नाहीं ऐकलें त्या वेळी ह्यांनी. मारली त्याला मिठी. परंतु आतां गेले गळून.
हृदयांतून धैर्य गळतें, डोळयांतून अश्रु गळतात, हातांतून कांकणें गळतात. परंतु सारें जीवनच कां एकदम गळून जात नाहीं ?