प्रश्न --या क्षणी तुम्ही जे कांही म्हणत आहात ते सत्य आम्हाला प्राप्त होईल काय ?की त्यासाठी काही तयारीची आवश्यकता आहे .

उत्तर--सत्या बद्दल तुमची काय कल्पना आहे?कृपा करून ज्याचा अर्थ आपल्याला माहीत नाही असा शब्द वापरण्याचे आपण टाळू या .आपण जास्त सोपा जास्त प्रत्यक्ष असा शब्द वापरू या. एखाद्या समस्येची समज एखाद्या समस्येचे आकलन आपल्याला ताबडतोब होऊ शकेल काय ?जे काही आहे ते तुम्हाला तत्काळ समजते काय ?जे काही आहे ते समजण्यातून तुम्हाला सत्याचे महत्त्व लक्षात येईल.प्रत्येकाला सत्य समजलेच पाहिजे या म्हणण्याला विशेष काही अर्थ नाही .तुम्ही एखादी समस्या प्रत्यक्ष संपूर्ण समजून घेऊन त्यापासून स्वतंत्र होऊ शकाल काय ?एखादी प्रचंड दुर्घटना, एखादे प्रचंड आव्हान ,प्रत्यक्ष संपूर्ण महत्त्वासहित समजून घेऊन ,अशाप्रकारे तुम्ही त्यापासून स्वतंत्र होऊ शकाल काय?जे तुम्हाला समजते त्याची मागे खूण किंवा ओरखडा शिल्लक राहत नाही.समज किंवा सत्य हे बंध विमोचक आहे .एखाद्या आव्हानापासून एखाद्या समस्येपासून तुम्ही स्वतंत्र होऊ शकता काय ?जीवन म्हणजे  आव्हान व  जबाब यांची एक मालिका आहे.ती तशी नाही काय ?जर तुमची प्रतिक्रिया ही आकारित, बांधीव, आणि अपूर्ण, असेल तर त्या आव्हानाचा ओरखडा खूण ठसा अवशेष मागे शिल्लक राहतो. ती खूण दुसऱ्या नव्या आव्हानाने बळकट केली जाते.अशा प्रकारे स्मरण संग्रह, जखमा, ओरखडे, खुणा या अवशेषरूपाने सतत मागे राहात असतात. या खुणा हे ओरखडे घेऊन तुम्ही नव्याला भेटू पाहता,  म्हणून तुम्ही नव्याला कधीही भेटू शकत नाही.म्हणूनच तुम्हाला कधीही समजत नाही .आव्हानांपासून तुमची कधीही मुक्तता होत नाही .

तेव्हा आपली समस्या आपला प्रश्न असा आहे कि एखादे आव्हान संपूर्णपणे प्रत्यक्षपणे मला समजू शकेल काय? मी त्याचे सर्वांगीण महत्त्व ,त्याचा सुवास, त्याची खोली,त्याचे सौंदर्य,त्याची कुरूपता, त्याचा बेढबपणा, समजू शकेन काय ?  अशाप्रकारे त्यापासून  स्वतंत्र होऊ शकेन काय ?  आव्हान नेहमी नवीन असते. समस्या नेहमी नवीन असते.उदाहरणार्थ तुम्हाला काल जी समस्या असते, ती आजपर्यंत इतकी बदललेली असते,की जेव्हा तुम्ही पुनः  त्या समस्येला भेटता तेव्हा ती नवीन असते.परंतु तुम्ही त्या समस्येला भेटताना तुमचे पूर्वीचे जुने ठसे घेऊन भेटता .समस्या बदललेली आहे. तुम्ही बदललेले नाही. तुमच्या विचारांची थोडीबहुत डागडुजी झालेली असते.त्यामुळे तुम्ही समस्येचे आकलन बरोबर करू शकत नाही . 

हीच गोष्ट मी थोडी वेगळ्या तर्‍हेने मांडतो.मी तुम्हाला काल भेटलो.आजपर्यंत तुमच्यात काही ना काही बदल झालेला असतो. तुम्ही बदललेले असता. परंतु माझ्याजवळ तुमचे कालचे चित्र असते.तोच ठसा घेऊन मी तुम्हाला भेटतो .आणि म्हणूनच मी तुमचे आकलन बरोबर करू शकत नाही . मला फक्त तुमचे काल घेतलेले चित्रच दिसत असते. समजत असते.जर मला बदललेल्या तुम्हाला भेटायचे असेल तर मला कालचे तुमचे चित्र फेकून दिले पाहिजे. दुसर्‍या  शब्दात सांगावयाचे म्हणजे आव्हान नेहमीच नवीन असते आणि त्यामुळे ते समजण्यासाठी जुने ठसे   फेकून देऊन त्याला नव्याने भेटले पाहिजे .कालचे अवशेष शिल्लक असता कामा नये.मी गेल्या दिवसाला रामराम  ठोकला पाहिजे.

शेवटी जीवन हे काय आहे ?प्रतिक्षणी नवीन असलेले असे ते काही तरी आहे .ते असे काही तरी आहे कि जे सतत बदलत असते .त्यामुळे नेहमी नवीन भावना निर्माण होत असतात .कालच्या सारखा आज कधीच नसतो .यातच जीवनाचे सौंदर्य आहे.तुम्ही व मी प्रत्येक समस्येला नवीनपणे भेटू शकू काय?  तुम्ही आता जेव्हा घरी जाल तेव्हा तुमच्या पत्नीला व मुलांना नवीनपणे भेटू शकाल काय? जर तुम्ही कालच्या दिवसाने भारलेले असाल तर तुम्ही नवीनपणे भेटू शकणार नाही.कुठल्याही समस्येतील सत्य कुठलीही संबंधमयता समजण्यासाठी तुम्ही स्वतः ताजे होऊन आले पाहिजे .लक्षात घ्या उघड्या मनाने नव्हे तर ताजेपणाने भेटले पाहिजे .प्रत्येक आव्हानाला तुम्ही गेल्या दिवसाच्या ओरखड्याशिवाय भेटले पाहिजे .जस जसे एखादे आव्हान येईल तसतसे कालच्या प्रतिक्रियांबद्दल जागृत रहा .अशाप्रकारे कालच्या अवशेषांबद्दल जागृत राहूनच तुम्हाला असे आढळून येईल की ते अवशेष कुठच्याही धडपडी शिवाय गळून पडले आहेत .तुमचे मन संपूर्णपणे ताजे आहे .

एखादी व्यक्ती काही पूर्व तयारी केल्याशिवाय सत्य तत्काळ समजू शकेल क़ाय ?मी म्हणतो होय ही माझ्या बोलण्याची लकब नाही.हा माझा एक विक्षिप्त तर्‍हेवाईकपणाहि नाही .किंवा हा काहीतरी फसवा आभासही नाही.ही माझी एक टूमहि नाही.तुम्ही मानसिक प्रयोग करून पाहा, तुमची तुम्हालाच यातील सत्यता लक्षात येईल .कुठलेही आव्हान घ्या. कुठचीही एखादी बारीक घटना घ्या .मोठय़ा दुर्घटनेसाठी थांबायचे कारणं नाही .तुम्ही कसा जबाब देतात ते पाहा .त्या प्रतिक्रियेबद्दल,त्या जबाबांबद्दल, त्यातील तुमच्या हेतूंबद्दल,त्या तुमच्या आवडी निवडीबद्दल,जागृत रहा .त्या तुम्हाला लगेच समजतील व तुम्हाला त्याची पार्श्वभूमी कळून येईल .मी तुम्हाला वचन देतो. तुम्ही खात्री बाळगा .जर तुम्ही आपले संपूर्ण लक्ष इकडे द्याल तर तुम्ही हे करू शकाल .जर तुम्ही आपल्या संपूर्ण पार्श्वभूमीचा शोध घेत असाल, अर्थ शोधत असाल, तर या कळकळीतून एका फटक्यात तुम्हाला सत्य कळेल .समस्येची संपूर्ण समज येईल .जरी ती गोष्ट उद्या व्हायची असली तरी ती आता होऊ शकते .उद्या जे काही होणार आहे ते समजण्यासाठी, त्याचे स्वागत करण्यासाठी, त्याची तयारी करण्यासाठी, कालापव्यय करण्याची गरज नाही .समजणे पुढे ढकलणे,म्हणजे जे काही आत्ता आहे,त्याच्या समजाला प्रतिबंध करणे होय.जे काही आत्ताआहे ते तुम्हाला समजलेच पाहिजे.जे काही आहे ते समजण्यासाठी तुम्ही शांत स्तब्ध न ढवळलेल्या मानसिक स्थितीमध्ये कुठच्याही फरफटीविना असले पाहिजे.तुम्ही आपले सर्व तनमन तिकडे लावले पाहिजे.त्या क्षणी फक्त तेवढीच गोष्ट तुम्हाला दिसत असली पाहिजे .असे असेल तेव्हा जे काही आहे ते त्याची संपूर्ण खोली त्याचा संपूर्ण अर्थ ते तुम्हाला दाखविते व अशाप्रकारे तुम्ही त्या समस्येपासून मुक्त होता .

जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही ते कसे जाणून घेता ?तुम्हाला जे सत्य जाणून घ्यायचे असेल त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटले पाहिजे.तुम्हाला त्याबद्दल जवळीक वाटली पाहिजे. तुम्ही त्याला घाबरुन चालणार नाही. तुमच्याजवळ त्या समस्येबद्दल इतरांची मते व  त्यांना  काय वाटते अशाप्रकारे तयार उत्तर असता कामा नये. थोडक्यात तुम्ही व समस्या यांच्यामध्ये काहीही असता कामा नये. जेव्हा तुमचा त्या समस्येशी कोणाच्या मार्फत नव्हे तर प्रत्यक्ष संबंध असतो तेव्हा तुम्हाला उत्तर मिळतेच.तुम्ही पूर्वग्रह दूषित असता कामा नये.जर तुम्ही उत्तर मध्ये आणाल ,योग्य अयोग्य निश्चिती करण्याला सुरुवात कराल , जर तुमच्याजवळ मानसिक अरुची असेल ,तर तुम्ही समज पुढे ढकलता .आत्ता कशाला उद्या बघू असे म्हणता .जे आत्ता समजण्यासारखे आहे ते तुम्ही उद्यावर ढकलता.उद्या समजण्यासाठी तुम्ही तयारी करता.यामुळे तुम्हाला ते सत्य कळत नाही .सत्य कळण्यासाठी कुठचीही तयारी लागत नाही.तयारी करणे यामध्ये काल(वेळ) अभिप्रेत आहे .काल हे सत्य समजण्याचे साधन नाही.काल म्हणजे सातत्य व सत्य हे काल रहित आहे .सत्य अ-सतत आहे समजही ही अ-सतत असते .सत्य प्रतिक्षणी असते अवशेष रूप नसते .

मला धास्ती वाटते की मी हे सर्व अत्यंत गूढ व  अनाकलनीय करून सोडत आहे .परंतु हे फार सोपे सुलभ आहे .फक्त तुम्ही प्रयोग केला पाहिजे .जर तुम्ही एखादे स्वप्न मनाशी रचित असाल, किंवा एखादे स्वप्न उराशी बाळगून असाल ,व मग ते मिळविण्याची प्रार्थना करीत असाल, तर मात्र सर्व काही बिकट होऊन जाते . तुम्ही व मी यामध्ये जर एखादा पडदा आडकाठी असेल तर आपण एकमेकांना समजू शकत नाही.परंतु मी जर तुम्हाला मोकळा(सहज संपूर्ण उपलब्ध ) असेन,आपल्या दोघांमध्ये  कोणतीही आडकाठी नसेल, कोणताही पडदा नसेल, तर मी तुम्हाला व तुम्ही मला लगेच समजू शकता.मोकळे असणे उघडे असणे यासाठी कालाची काहीही गरज नाही .काल,मला उघडा स्वतंत्र मोकळा मुक्त कधीतरी करू शकेल काय ?तयारी पंथ मार्ग पद्धत  शिस्त मला तुमच्या समोर उघडा करू शकत नाही.आपल्याला एकमेकांना समजून घेण्याची कळकळ असेल तर ती कळकळच आपल्याला उघडे करील . मला उघडे राहावयाचे आहे कारण माझ्या जवळ   लपविण्यासारखे  काही नाही .म्हणूनच मी उघडा राहू शकतो व आपल्या दोघांमध्ये  दळणवळण  सुरू होऊ शकते .सत्य तिथेच आहे. सत्य प्रकट होण्यासाठी,सत्य अस्तित्वात येण्यासाठी, त्याचे सौंदर्य त्यातील आनंद कळण्यासाठी, तात्काळ ग्राहकता आवश्यक आहे. कुठच्याही प्रणालीचे, कल्पनांचे, स्वप्नांचे, भीतीचे,स्वरेखित उत्तरांचे ढग  तुम्ही व सत्य यांमध्ये असता कामा नये. 

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel