प्रश्न --सत्य प्रकट होण्यासाठी कल्पना विरहित कर्म पाहिजे अशी आपली शिकवण आहे .सर्वकाळ कल्पना विरहित कार्यरत असणे म्हणजेच हेतुरहितकर्म करणे शक्य आहे काय ?

उत्तर--हल्लींचे आपले कार्य कोणत्या स्वरूपाचे आहे .?कर्म म्हणजे आपली काय समजूत आहे ?आपल्याला जे काही करायचे असते ते,किंवा जे काही बनायचे असते ते,असे प्रत्येक कर्म कल्पनेवर आधारित असते.प्रत्येक कर्म कल्पनाधारित नसते काय ?आपल्याला फक्त एवढेच माहिती आहे .आपल्या जवळ जे काही आहे व जे काही नाहीं त्याबद्दल काही आदर्श,काही कल्पना, काही वचने ,व काही प्रमेये, आहेत .आपल्या कर्माचा पाया भविष्यकाळातील बक्षीस किंवा शिक्षेची भीती या स्वरूपाचा आहे.हे सर्व आपल्याला माहित आहे . कल्पनेवर आधारित क्रिया स्वतःला वेगळे पाडणारी व कोंडी करणारी असते .तुमची सद्गुणांबद्दल काहीएक विशिष्ट  कल्पना आहे .त्याप्रमाणे तुम्ही संबंधरूपतेत जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करता.सामुदायिक व वैयक्तिक संबंधमयता म्हणजे आदर्शानुरूप,कल्पनानुरूप, ध्येयानुरूप, वचनानुरूप, हेतू अनुरूप, सद्गुणानुरूप, हेतूच्या प्राप्तीसाठी केलेले कर्म अशी आपली कल्पना आहे. अशी आपली धारणा आहे .

जेव्हा माझी क्रिया कल्पनेवर आधारित असलेल्या आदर्शावर अवलंबून असते, उदाहरणार्थ "मी धीट बनले पाहिजे.""मी एखाद्या आदर्शानुसार वर्तन केले पाहिजे" . "मी सामाजिक दृष्ट्या जागृत पाहिजे" वगैरे वगैरे .ही कल्पना माझ्या कर्माला आकार देते .ती माझ्या कर्माला मार्गदर्शन करते .आपण सर्वजण म्हणतो "हा पहा इथे एक सद्गुणांचा आदर्श आहे .आणि मीसुद्धा या प्रमाणेच बनले पाहिजे".म्हणजेच मी या आदर्शाप्रमाणे जीवन व्यतीत केले पाहिजे . अशाप्रकारे कर्म कल्पनाधिष्ठित असते .कर्म व कल्पना यांमध्ये एक दरी असते .कर्म व कल्पना यांची विभागणी झालेली असते .इथेही कालप्रक्रिया अस्तित्वात असते .दुसर्‍या  शब्दात सांगायचे म्हणजे मी दयाशील नाही, मी प्रेमळ नाही, माझे हृदय क्षमाशील नाही, पण मला असे वाटते की मी दयावान, प्रेमळ,क्षमाशील वगैरे  बनले पाहिजे.अशा प्रकारे मी जे काही आहे व मी जे काही असले पाहिजे त्यामध्ये एक दरी आहे .आपण सर्व वेळ या दरीवर पूल बांधण्यात खर्च करीत असतो. आपले कर्म हेच नसते काय?

आता जर कल्पनाच अस्तित्वात नसेल तर काय होते? एका फटक्यात तुम्ही दरीच नष्ट करून टाकता .तुम्ही जे आहे तेच आता असाल .तुम्ही म्हणता मी कुरूप आहे मी सुंदर होण्यासाठी काय केले पाहिजे ?आता कल्पनाधारित कृती अस्तित्वात येते .तुम्ही म्हणता मी प्रेमळ नाही मी प्रेमळ बनले पाहिजे .अशा प्रकारे तुम्ही कल्पना ही कर्माहून वेगळी धरून चालता.आणि त्यामुळे तुम्ही जे काही आहा त्यातून योग्य कर्म होत नाही .तुम्हाला जे काही बनायचे आहे त्या आदर्शाधारित असे कर्म होते  .मूर्ख मनुष्य नेहमी म्हणतो की त्याला शहाणा बनायचे आहे .तो काय करीत असतो? तो धडपड करीत असतो. तो कधीही थांबत नाही.तो कधीही म्हणत नाही कि मी मूर्ख आहे. अशाप्रकारे आदर्शाधारित असे त्याचे कर्म,हे कधीही खरे नसते.

कर्म म्हणजे जड कर्म हालचाल परंतु जेव्हा तुमच्याजवळ एखादी कल्पना असते तेव्हा केवळ कल्पना सृजन होत राहते.विचारप्रक्रिया कर्म संबंधात चालू राहते.जर मुळात कल्पनाच अस्तित्वात नसेल तर काय होते ?तुम्ही जे काही आहे तेच असता .तुम्ही अदयाशील आहात, तुम्ही अक्षमाशील आहात,तुम्ही क्रूर आहात, तुम्ही मूर्ख विचारशून्य आहात, तुम्ही या सर्वांबरोबर राहू शकाल काय? जर तुम्हाला हे शक्य होईल तर बघा काय घडून येते ते.जेव्हा मी अदयाशील आहे मूर्ख आहे वगैरे ओळखतो, जेव्हा मी  असे आहे म्हणून त्याबद्दल पूर्ण जागृत असतो,तेव्हा काय होते ?मी आपोआपच दयाशील शुद्ध बुद्धियुक्त नसतो काय?जेव्हा "मी" अदयाशीलत्व पूर्णपणे ओळखतो,केवळ शाब्दिक खोट्या पातळीवर नव्हे तर खरोखरच "मी" कसा आहे ते पूर्णपणे उमजतो, तेव्हा हा"मी" जे काही आहे ते पाहण्यातच प्रेम नसते काय ?"मी" तत्काळ दयाशील प्रेमळ बनत नाही काय ?स्वच्छ होण्याची आवश्यकता मला वाटेल तर फारच सोपे आहे मी नळावर जातो आणि पाय धुतो .परंतु मी स्वच्छ असले पाहिजे असे माझे ध्येय असेल तर स्वच्छतेची टाळाटाळ केली जाते किंवा आणलेली स्वच्छता वरवरची असते .

कल्पनाधिष्ठित  कर्म हे केवळ वरवरचे असते.ते खरे कर्म असूच शकत नाही .ते केवळ कल्पना करणे असते, म्हणजे केवळ विचारप्रक्रिया चालू असते .

जे कर्म आपल्यात मूलगामी बदल घडवून आणते ,ज्यामुळे पुनर्जन्म होतो, खरी सुटका होते,त्या स्थितीला तुम्ही काहीही म्हणा,असे कर्म कल्पनाधिष्ठित  नसते.ते कर्म बक्षीस किंवा शिक्षा यांच्या परिणामांचा विचार न करता केलेले असते .असे कर्म हे काल विरहित असते .मन म्हणजे कालप्रक्रिया, बेरीज व वजाबाकीचे गणित करणारी प्रक्रिया, दुभंगविणारी,वेगळे पाडणारी, कोंडी करणारी प्रक्रिया,ही प्रक्रिया काल विरहित कर्मात अस्तित्वात नसते .

ही समस्या चटकन सुटणारी नाही .तुमच्या पैकी बरेच प्रश्न विचारतात होय किंवा नाही असे उत्तर माझ्याकडून अपेक्षित असते.तुम्हाला काय वाटते असे विचारणे,मला सर्व स्पष्टीकरण करा म्हणून सांगणे, व नंतर खुर्चीत मागे रेलून बसणे फार सोपे आहे .परंतु स्वतःच उत्तर शोधून काढणे हे फार बिकट आहे .समस्येमध्ये स्वतः अशा जाणिवेने, अशा स्पष्टतेने, अशा अधिकारयुक्ततेने, अशा शहाणपणाने, लाचलुचपतीशिवाय, जा कि समस्याच उरणार नाही .

समस्येशी गाठ पडल्यावर जेव्हा मन शांत असेल त्याच वेळेला हे शक्य होईल .समस्या जर तुम्ही त्यावर प्रेम कराल तर सुर्यास्ता प्रमाणे सुंदर आहे .परंतु जर तुम्ही समस्येविरुद्ध उभे ठाकले असाल तर मात्र ती तुम्हाला कधीच कळणार नाही.आपण बरेच जण विरुद्ध असतो,कारण आपल्याला परिणामांची भीती वाटत असते. आपण असेच चालत राहिले तर काय होईल अशी भीती वाटते .अशाप्रकारे आपण समस्येचे महत्त्व व दर्शन हरवून बसतो .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel