प्रश्न --परमेश्वरावरील श्रद्धा ही उदात्त जीवनासाठी एक प्रबळ प्रेरणा आहे .तुम्ही परमेश्वर अस्तित्व का नाकारता ?परमेश्वरावरील कल्पनेचे पुनर्ज्जीवन करण्याचा तुम्ही कां बरे प्रयत्न करीत नाही?

उत्तर--आपण या प्रश्नाकडे जास्त विशाल दृष्टिकोनाने व शहाणपणाने पाहूया .मी परमेश्वर नाकारीत नाही ,तसे करणे मूर्खपणाचे होईल .जो मनुष्य सत्य जाणत नाही तो केवळ शब्दांमध्ये वाटोळा वाटोळा फिरत असतो .जो मनुष्य मी ओळखतो,मी जाणतो,असे म्हणतो तो काही जाणत नसतो .जो मनुष्य सत्य प्रतिक्षणी अनुभवित आहे त्याला ते दुसऱ्यांना सांगण्यासाठी काही साधन नाही .

श्रद्धा म्हणजे सत्याला दिलेला नकार होय .श्रद्धेमुळे सत्याला अडथळा होतो. परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे म्हणजे त्याचा शोध न लागणे होय .श्रद्धावान् किंवा अश्रद्ध  कुणालाही परमेश्वर सापडणार नाही .सत्य हे अज्ञात आहे .तुमची अज्ञाता वरील श्रद्धा किंवा अश्रद्धा म्हणजे केवळ स्वरचित आराखडा आहे . म्हणूनच तो असत्य आहे .मला माहित आहे की तुम्ही श्रद्धा ठेवता, परंतु त्यामुळे तुमच्या जीवनाला काहीही अर्थपूर्णता व संपन्नता प्राप्त झालेली नाही .असे असंख्य मनुष्य आहेत की जे परमेश्वरावर श्रद्धा ठेवतात .नंतर त्या श्रद्धेमध्ये आश्रय घेतात व सुख शोधतात .मी विचारतो की प्रथम तुम्ही श्रद्धाच का बाळगता ?तुम्ही श्रद्धा बाळगता कारण त्यामुळे तुम्हाला सुरक्षितता समाधान व भविष्यकालात आनंद मिळेल अशी  आशा वाटते. तुम्ही असे म्हणता की त्यामुळे तुमच्या जीवनाला महत्व व अर्थ प्राप्त होतो .वस्तुत:तुमच्या श्रद्धेला काहीही महत्त्व नाही .तुम्ही श्रद्धा ठेवता आणि पिळवणूक करता.तुम्ही श्रद्धा ठेवता आणि खून करता .तुम्ही परमेश्वर एकच आहे असे म्हणता आणि धर्माच्या नावाने एकमेकांचे खून करता.श्रीमंत मनुष्यही परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो आणि निर्दयपणे लूट  करतो .पैसा जमवतो . नंतर देऊळ बनवतो. देणग्या देतो . दाता बनतो.

ज्यांनी हिरोशिमावर बॉम्ब टाकला ते म्हणत होते की परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे .जे इंग्लंडवरून जर्मनीकडे बॉम्ब टाकण्यासाठी गेले तेही म्हणते होते की परमेश्वर त्यांचा सारथी  आहे.हिटलरचाही परमेश्वरावर नितांत विश्वास होता  तरीही त्याने अनन्वित कृत्ये केली .हुकूमशहा,अध्यक्ष, मुख्यमंत्री, सेनापती, सर्व परमेश्वरा बद्दल बोलतात.या सर्वांची परमेश्वरावर खूप श्रद्धा आहे .ते सर्व खरोखरच काही उपयुक्त गोष्ट करीत आहेत काय?  त्यांच्यामुळे मनुष्यांचे  जीवन जास्त समृद्ध झाले आहे काय ? जे परमेश्वरावर  आपली श्रद्धा आहे असे म्हणत आहेत, त्यांनी सर्व जगात हाहा:कार माजविला आहे .त्यानी अर्ध्या जगाचा नाश केला आहे .जग पूर्णपणे दुःखात व हालअपेष्टात आहे .धार्मिक असहिष्णुतेवरून लोकांचे श्रद्धावान व अश्रद्ध( त्यांच्यासारखी श्रद्धा न बाळगणारे )असे दोन भाग पडले आहेत.धार्मिक युद्धे सर्वत्र चालली आहेत . तुमची मनोरचना किती असामान्य राजकीय आहे एवढेच फक्त यातून निदर्शनास येत आहे .

परमेश्वरावरील श्रद्धा  ही उन्नत संपन्न जीवनाला प्रेरणादायी ठरत आहेत काय? तुम्हाला उन्नत जीवन जगण्यासाठी काही प्रेरणा आकर्षण का पाहिजे ?स्वच्छ व साधे जीवन व्यतीत करण्याची वासना हीच तुमची प्रेरणा का ठरत नाही ?जर तुम्ही प्रेरणांकडे आकर्षणांकडे पाहात असाल तर  जीवन सर्वांना योग्यप्रकारे व्यतीत करता येईल असे वातावरण तयार करण्यात  तुम्ही रस घेत नाही .फक्त आपल्या प्रेरणात तुम्ही रस घेत आहात, असा त्याचा अर्थ आहे .तुम्ही आपल्या प्रेरणात गुंतलेले आहात व मी माझ्या प्रेरणात गुंतलेला आहे .नंतर आपण या प्रेरणांवर भांडायला सुरुवात करतो .आपण परमेश्वरावर श्रद्धा  ठेवतो म्हणून नव्हे,तर फक्त मानव म्हणून, आपण सर्व आनंदाने गुण्या गोविंदाने का राहू शकत नाही ?उत्पादनाची साधने योग्य प्रकारे आपण का वाटून घेत नाही ?उत्पादन सर्वासाठी करू असे आपण का म्हणत नाही ?असा एक उच्च शहाणपणा आहे की ज्याला आपण परमेश्वर म्हणतो या कल्पनेवर आपण शहाणपणाच्या अभावामुळे विश्वास ठेवतो .हा परमेश्वर हा उच्च शहाणपणा आपल्याला अर्थातच उन्नत जीवन देणार नाही .शहाणपणातून शुद्ध बुद्धीतून आपोआपच उन्नत जीवन निर्माण होते .जोपर्यंत श्रद्धा आहे,जोपर्यंत समाजात वर्गीकरण आहे,जोपर्यंत विषमता आहे ,जोपर्यंत उत्पादनाची साधने काही लोकांच्या हातात केंद्रित आहेत, जोपर्यंत वेगवेगळी राष्ट्रे व वेगवेगळ्या सार्वभौम शासन संस्था अस्तित्वात आहेत, तोपर्यंत शुद्ध बुद्धी व शहाणपणा अशक्य आहे .या सर्वांचा अर्थच मुळी शहाणपणा नाही असा आहे . परमेश्वरावरील श्रद्धा (असणे किंवा नसणे ) नव्हे तर शहाणपणाचा अभाव उन्नत जीवन अशक्य करून सोडत आहे .

तुम्ही सर्वजण निरनिराळ्या प्रकारे श्रद्धा ठेवता .तुमच्या श्रद्धांना सत्याचा वासही नाही .तुम्ही जे काही आहा तुम्ही जे काही करता  तुम्ही जो काही विचार करता तो सत्य आहे .तुमची परमेश्वरावरील श्रद्धा म्हणजे तुमच्या कंटाळवाण्या मूर्ख व क्रूर जीवनापासून काढलेली ती एक पळवाट आहे .मानवामध्ये श्रद्धा नेहमीच विभागणी करते. त्यांच्यात ती तट निर्माण करते .हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन साम्यवादी भांडवलदार वगेरे सर्व इथेच आहेत .श्रद्धा लोकांना एकत्र आणत नाही . कल्पना विभाजन करतात.श्रद्धा दुभंगविते.एखाद्या श्रद्धेमुळे काही लोक एका गटात तुम्ही आणू शकाल .परंतु हा गट दुसऱ्या गटाच्या विरुद्ध उभा राहिलेला असतो .कल्पना व श्रद्धा  यांच्यामुळे कधीही एकी होत नाही.त्या दुभंगविणाऱ्या विभाजन करणाऱ्या विघटन करणाऱ्या व विनाशकारक आहेत.तुमची परमेश्वरावरील श्रद्धा ही जगात जास्त क्लेश  पसरवीत आहे .त्यामुळे कदाचित तुम्हाला क्षणिक समाधान वाटत असेलही, परंतू प्रत्यक्षात त्यामुळे युद्ध दुष्काळ वर्गयुद्ध निरनिराळ्या व्यक्तीची क्रूर  निर्दय कर्मे या स्वरूपात क्लेश  व विनाश या श्रद्धेमुळे आला आहे .तुमच्या श्रद्धाना काहीही किंमत नाही .तुम्ही खरोखरच परमेश्वरावर श्रद्धा ठेवली असती, जर तो सत्य अनुभव असता, तर तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसले असते. तुम्ही कधीही मानवांचा नाश केला नसता .

आता सत्य काय आहे ?  परमेश्वर काय आहे ?परमेश्वर म्हणजे शब्द नव्हे. शब्द म्हणजे वस्तू नव्हे.अगणित, कालरहित, कालातीत, कालातील नव्हे,असे  ते समजण्यासाठी मन काल मुक्त झाले पाहिजे.म्हणजेच मन सर्व विचारांपासून मुक्त झाले पाहिजे .ते परमेश्वराबद्दलच्या सर्व कल्पनांपासून मुक्त झाले पाहीजे .तुम्हाला परमेश्वरा बद्दल सत्या बद्दल काय माहिती आहे ?तुम्हाला खरोखरच सत्याबद्दल काडीचीही माहिती नाही . तुम्हाला फक्त शब्द माहिती आहेत.तुम्हाला इतरांचे अनुभव ऐकून किंवा वाचून माहिती आहेत. कदाचित तुम्हाला आलेले काही अस्पष्ट अनुभवही तुम्हाला माहिती आहेत . हे सर्व म्हणजे अर्थातच सत्य नव्हे.ते परमेश्वर नाही .हे सर्व काल क्षेत्रातील आहे .काला पलीकडील असे ते, समजण्यासाठी कालप्रक्रिया समजून घेतली पाहिजे .कालप्रक्रिया म्हणजेच विचारप्रक्रिया, विचारप्रक्रिया म्हणजेच बनणे प्रक्रिया,बनणे प्रक्रिया म्हणजेच ज्ञानसंग्रह .मनाची ही सर्व पार्श्वभूमी आहे. किंबहुना मन हीच पार्श्वभूमी आहे . प्रगट व सुप्त मन, वैयक्तिक व सामुदायिक मन,म्हणजेच पार्श्वभूमी .ज्ञातापासून मन स्वतंत्र झाले पाहिजे . मन संपूर्ण शांत स्तब्ध निस्तरंग झाले पाहिजे .लक्षात घ्या शांत असलेले मन, शांत झालेले मन, *शांत केलेले मन नव्हे*.जे मन कशाचा तरी परिणाम म्हणून शांत आहे ,ते मन खरोखर  शांत नाही.जे मन कुठल्या तरी ठरवलेल्या क्रियेचे, सवयीचे, नियमनाचे, शिस्तीचे फल, म्हणून शांत आहे ते मन खरे शांत नाही.ज्या मनावर बळजबरी केली आहे, ज्या मनावर ताबा ठेवला आहे, ज्या मनाला चौकटीत दाबून बसविले आहे, ज्याला शिस्तीने शांत ठेवले आहे, असे मन खर्‍या अर्थाने  शांत नाही .काही काळ मनाला वरवर स्तब्ध ठेवण्यात कदाचित तुम्ही यशस्वी व्हाल, परंतु असे मन खऱ्या अर्थाने शांत नाही .जेव्हा तुम्ही संपूर्ण विचारप्रक्रिया समजता तेव्हांच  शांतता प्राप्त होते. विचारप्रक्रिया समज म्हणजे विचारप्रक्रिया अंत, विचारप्रक्रिया अंत म्हणजेच शांतता आरंभ होय .

जेव्हा मन संपूर्ण शांत असेल, केवळ वरवरच्या थरात नव्हे तर जाणिवेच्या सर्व पातळ्यांवर शांत असेल,तेव्हा आणि तेव्हांच  फक्त सत्य अस्तित्वात येईल .अज्ञात ही मनाकडून अनुभवण्याची वस्तूच नव्हे. शांतता स्वतःच स्वतःचा अनुभव घेते .जर मन कसलाही अनुभव घेईल,तर ते फक्त स्वरचिताचा अनुभव घेत आहे .असे मन शांत नाही. जोपर्यंत विचार कुठल्याही प्रगट किंवा अप्रगट स्वरूपात अस्तित्वात आहे, कार्यवाहीत आहे, तोपर्यंत शांतता अशक्य आहे .जेव्हा मन संपूर्ण शांत असते .जेव्हा मन उपयोगात नसते .व हे सर्व कुठच्याही प्रयत्नांचे फल असे नसते.तेव्हा व फक्त तेव्हाच काल रहित अंतिम  अस्तित्वात येते. शांतता म्हणजे भूत मुक्तता, ज्ञान मुक्तता, प्रगट व सुप्त  स्मरण मुक्तता, ही स्थिती आठवता येण्यासारखी नाही. स्मरण ठेवणारी, स्मरण करणारी, आठवणारी, अनुभवणारी, अशी कोणतीही वस्तू तिथे नसते.

म्हणून सत्य किंवा परमेश्वर तुम्ही जे काही म्हणाल ते, ही प्रतिक्षणी अस्तित्वात येणारी वस्तू आहे .मन जेव्हा एखाद्या शिस्तीने विशिष्ट आकारात ठेवलेले असते तेव्हा नव्हे, तर फक्त स्वतंत्र स्वयंभू उत्स्फूर्त स्थितीतच हे शक्य होते.परमेश्वर ही मनापैकी वस्तूच नव्हे . स्वआराखडय़ातून ती येत नाही .जेव्हा केवळ सद्गुण म्हणजे स्वतंत्रता असते तेव्हा ती येते.जे काही आहे त्या वस्तुस्थितीला तोंड देणे म्हणजेच सद्गुण.वस्तुस्थितीला तोंड देणे म्हणजेच परमेश्वरी वरदहस्त असणे होय .जेव्हा मन वरदहस्तपूर्ण असते, शांत स्तब्ध निस्तरंग असते, जेव्हा ते स्वतःच्या हालचालींनी बद्ध नसते, जेव्हां ते कुठच्याही सुप्त वा प्रगट स्वरचित विचारांनी बद्ध नसते, तेव्हा व फक्त तेव्हाच अंतिम प्रगट होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel