प्रश्न --प्रार्थनेमधून व्यक्त केलेली इच्छा, हा परमेश्वराकडे नेणारा एक मार्ग नाही काय?

उत्तर--आपण या प्रश्नात अंतर्भूत असलेल्या सर्व प्रश्नांची तपासणी करणार आहोत .यामध्ये प्रार्थना एकाग्रता व ध्यान ही सर्व अंतर्भूत आहेत .प्रार्थना म्हणजे आपली काय समजूत आहे ?प्रार्थना म्हणजे अर्ज होय .ज्याला कुणाला तुम्ही परमेश्वर किंवा सत्य असे म्हणता त्याच्याकडे केलेली मागणी होय .ज्याला तुम्ही परमेश्वर म्हणून म्हणता  त्याच्याकडे केलेला अर्ज म्हणजे मागणी होय .त्याच्याकडे तुम्ही मार्गदर्शन मागत आहात . त्याच्याकडे तुम्ही भीक मागत आहात.तुमचा दृष्टिकोन बक्षीस समाधान मिळविण्याचा आहे .तुम्ही वैयक्तिक किंवा राष्ट्रीय संकटात आहात व तुम्ही मार्गदर्शनासाठी मदतीसाठी परमेश्वराकडे मागणी करीत आहात .तुम्ही गोंधळलेले आहात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी  परमेश्वराकडे मदत मागत आहात.तुम्ही सुरक्षिततेसाठी कल्याणासाठी भविष्यकालीन उत्कर्षासाठी परमेश्वराकडे भीक मागत आहात.यात परमेश्वर, मग हा तुमचा परमेश्वर कुणीही असो त्याबद्दल आपल्याला चर्चा आत्ता करावयाची नाही ;तुम्ही व मी निर्माण केलेला गोंधळ स्पष्ट करणार आहे,दूर करणार आहे, असा गर्भितार्थ यात आहे .गोंधळ,क्लेश, दुःख, अव्यवस्था, प्रेमाचा अभाव, भयानक अत्याचार,  माणुसकीला कलंक लावणारी वर्तणुक, हे सर्व तुम्ही व मी निर्माण केले आहे .हे सर्व ज्याला आपण परमेश्वर असे म्हणतो त्याने दूर करावे अशी आपली इच्छा आहे .दुसर्‍या शब्दात सांगावयाचे म्हणजे  आमचा गोंधळ,आमचे क्लेश, आमची दुःखे,आमचे विरोध, हे दुसऱ्या कुणीतरी दूर करावेत अशी आमची इच्छा आहे .आपण दुसऱ्याकडे प्रकाश व आनंद यासाठी अर्ज करीत आहोत .

आता जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, अर्ज करता, भीक मागता, तेव्हा तुमची मागणी मान्य झालेली पूर्ण झालेली तुम्हाला आढळून येते.जेव्हा तुम्ही मागता तेव्हा तुम्हाला मिळते .जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळते .परंतु तुम्हाला जे मिळते त्याने सूत्रता येणार नाही. तुम्हाला जे मिळते त्यांने स्पष्टता व समज येणार नाही.जे मिळते ते फक्त तुमचे समाधान करते.परंतु त्यामुळे समज येत नाही .जेव्हा तुम्ही मागणी करता तेव्हा तुम्हाला स्वरेखित मिळते.तुम्हाला मिळालेले स्वरचित असते.सत्य परमेश्वर तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे कसे काय उत्तर देणार ?अगणित अनंत निःशब्द असे ते आम्ही निर्माण केलेल्या आमच्या क्षुद्र काळज्या दुःखे गोंधळ यांच्याशी कधी तरी संबंधित असणे शक्य आहे काय ?मग जे उत्तर देते ते कोण?क्षुद्रांचे सामान्यांचे गणिताचे उत्तर, अगणिताकडून मिळणे शक्यच नाही .जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा अापण बरेच शांत मनस्थितीत असतो .आपण ग्रहण क्षमतेच्या स्थितीत असतो .अशा वेळी स्वतःचे अप्रगट मन क्षणभर स्पष्टता आणते. तुम्हाला काहीतरी हवे आहे .तुमची ती तीव्र इच्छा आहे. त्या तीव्र इच्छेच्या क्षणी, त्या भीक मागण्याच्या क्षणी, तुम्ही बऱ्याच प्रमाणात ग्रहणक्षम आहात.तुमचे जागृत धडपडे मन तुलनात्मक दृष्ट्या जास्त स्तब्ध आहे .अशा वेळेला अप्रगट मन त्यात आराखडा काढते व तुम्हाला उत्तर मिळते. हे अर्थातच त्या अगणिताकडून अनंताकडून कालरहिताकडून आलेले उत्तर नव्हे .हे तुमचे अप्रगट मन जबाब देत असते .जेव्हा तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळते तेव्हा  तुम्ही सत्याशी संबंधित असता अशा भ्रमात राहू नका .सत्यालाच तुमच्याकडे आले पाहिजे.तुम्ही सत्याकडे जाऊ शकत नाही.

प्रार्थनेत अंतर्भूत असलेल्या आणखी एका गोष्टीचा विचार आपल्य़ाला केल पाहिजे .ज्याला अापण आतला आवाज असे म्हणतो म्हणजेच अंतर्ज्ञान हे काय आहे ?पुन: मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हां तुम्ही अर्ज करीत असता, प्रार्थना करीत असता,तेव्हा तुमचे प्रगट मन तुलनात्मकदृष्ट्या जास्त स्तब्ध असते .अशा वेळेला तुम्हाला तुमच्याच अप्रगट मनाकडून आवाज ऐकायला येतो .अप्रगट मन प्रगट स्तब्ध मनावर रेखाटन करीत असते.तो आवाज सत्याचा कसा काय असू शकेल?जे मन गोंधळलेले, अज्ञानी, भीक मागत असलेले, अर्ज करीत असलेले, विनवण्या करीत असलेले, प्रार्थना करीत असलेले,मागण्या करीत असलेले,असेे आहे त्याला सत्य कसे काय समजणार?जेव्हा मन तुमच्यासाठी किंवा आणखी दुसऱ्या कुणासाठी किंवा देशासाठी काही मागत नसेल जेव्हां ते पूर्णपणे स्तब्ध असेल तेव्हांच  सत्य प्रकट होईल. तेव्हाच मन सत्य ग्रहण करू शकेल .जेव्हा मन संपूर्ण स्तब्ध होते,जेव्हा वासना पूर्णपणे नष्ट होतात,फक्त तेव्हाच सत्य अस्तित्वात येते.जो मनुष्य अर्ज करीत आहे, भीक मागत आहे, विनवण्या करीत आहे, प्रार्थना करीत आहे, इच्छा करीत आहे,  त्याला तो जे काही मागत आहे ते कदाचित मिळेलही, परंतु ते सत्य असणार नाही.तो जे काही ग्रहण करतो ते फक्त अप्रगट मनाचे प्रतिबिंबीकरण असते. तो अप्रगट मनाने दिलेला जबाब असतो .जो छोटा आवाज त्याला मार्गदर्शन करतो तो अप्रगट मनाचा असतो .

या प्रार्थनेच्या प्रश्नात एकाग्रतेचा केंद्रीकरणाचा ध्यानाचा प्रश्नही अंतर्भूत आहे.आपल्यापैकी बऱ्याच जणांना केंद्रीकरण म्हणजे बर्‍याच काही गोष्टींच्या त्यागाने साध्य केलेली गोष्ट असे वाटते.प्रयत्न, नियमन, जोरा, जबरदस्ती,  नक्कल,यांच्या साहाय्याने केंद्रीकरण केले जाते .अशाप्रकारे एकाग्रता ही त्याग प्रक्रिया आहे .मी तथाकथित प्रार्थनेत रस घेतो, परंतु विचार मात्र चालूच असतात.ते विचार माझी फरफट करतात म्हणून मी स्वत: मला एखादे चित्र,  एखादा शब्द, एखादी मूर्ती, एखादी कल्पना, एखादे वाक्य(मंत्र ), यावर केंद्रित करतो .ही केंद्रीकरण प्रक्रिया म्हणजे त्याग प्रक्रिया .ही प्रार्थना साधना समजली जाते .जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा तुम्ही आपले मन एखादा शब्द ,एखादा मंत्र, एखादी कल्पना,एखादी मूर्ती, किंवा आणखी काही तरी,यावर केंद्रित करता ; परंतु बेटे मन मात्र जगभर भटकतच राहते.अनेक कल्पनांचा उद्भव, अनेक कल्पनांचा अडथळा, अनेक विचार,अनेक भावना, यांचा सारखा अडथळा गोंधळ चालूच असतो .हे सर्व विचार तुम्ही पुन: पुनः दूर ढकलण्याचा प्रयत्न करता.अशाप्रकारे तुम्ही तुमच्या विचारांबरोबर युद्ध करण्यात आपला कितीतरी वेळ फुकट दवडता.या सर्व प्रक्रियेला तुम्ही ध्यान म्हणता. म्हणजेच तुम्ही अशा कोणत्या तरी गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करता की ज्यात तुम्हाला रस वाटत नाही .एखादा सिनेमा पहाताना,एखादे नाटक पहाताना, एखादे पुस्तक वाचताना, एखादे निसर्गदृश्य पाहताना, तुमचे मन किती सहज एकाग्र होते .परंतु प्रार्थनेमध्ये मात्र तुमचे विचार सतत गणित श्रेणीने वाढत असतात .ते सारखे मध्ये मध्ये अडमडत असतात.  त्यांना हाकलून लावण्यात,त्यांना दूर करण्यात,त्यांचा त्याग करण्यात, तुम्ही आपली सर्व शक्ती खर्च करता .जर शेवटी तुम्ही एखादी कल्पना चित्र मंत्र विचार यावर केंद्रित होण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला आपण आपल्या ध्यानात यशस्वी झाल्यासारखे वाटते .खरोखरच प्रार्थना अशी असू शकते काय ?खरी प्रार्थना अशी असणे शक्यच नाही .प्रार्थना ही त्याग प्रक्रिया नाही .त्याग हा शब्द मी कल्पनांना दूर सारणे,विचारांना दूर ढकलणे, विचाराना जवळ येऊ न देणे, प्रतिबंध करणे, या अर्थी वापरत आहे .प्रार्थना म्हणजे ध्यान व केंद्रीकरण नव्हे .त्याग म्हणजे ध्यान नव्हे.

मग ध्यान हे काय आहे ?एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे .जेव्हा आपल्याला रस असतो तेव्हा केंद्रीकरण तुलनात्मकदृष्ट्या सोपे असते.जो सेनापती युद्धाची आखणी करीत असतो जो बलात्काराची अत्याचारांची रेखाटने करीत असतो त्याची फारच सुरेख एकाग्रता झालेली असते .जो अगदी जबरदस्त असेल,तो बाकी सर्व विचार व भावना दूर सारील.तो त्याला फक्त हव्या असलेल्या विचारावर मन एकाग्र करील .जेव्हा मनुष्य एखाद्या गोष्टीत रस घेतो तेव्हा तो स्वाभाविक स्वयंभूपणे आपले मन त्या गोष्टीत एकाग्र करतो.अशी एकाग्रता ही प्रार्थना नाही. ती फक्त त्याग प्रक्रिया आहे .

मग खऱ्या अर्थाने प्रार्थना ध्यान म्हणजे काय आहे .प्रार्थना म्हणजे समजणे होय .हृदय ध्यान म्हणजे केवळ समजणे होय .जर त्याग असेल तर समज कशी येणार ? जेव्हा अर्ज विनंत्या याचना असतील तेव्हां समज कशी येणार ?समजामध्ये शांतता स्वतंत्रता असते .जे तुम्हाला समजते त्यापासून तुम्ही स्वतंत्र होता.केवळ एकाग्रता व प्रार्थना समज निर्माण करीत नाहीत .ध्यान प्रक्रियेचा समज हा मूलभूत पाया आहे .यासाठी तुम्ही माझा शब्द हा पाया बिलकूल मानू नका .तुम्ही प्रार्थना व एकाग्रता काळजीपूर्वक खोलवर तपासून पाहा .तुम्हाला असे आढळून येईल की त्यामुळे समजशीलता येत नाही .त्यामुळे फक्त काठिण्य बांधून ठेवणे एवढेच प्राप्त होते.हा सर्व अाभास आहे हे खरे ध्यान नाही .ज्या ध्यानामध्ये समज आहे ज्यामुळे स्वातंत्र्य स्पष्टता व एकात्मता निर्माण होते ते खरे ध्यान होय.  

मग आता आपल्याला समज म्हणजे काय म्हणायचे आहे ?समज म्हणजे सर्व गोष्टींना योग्य महत्त्व देणे होय.अज्ञानी असणे म्हणजेच चुकीचे मूल्यमापन करणे . वस्तूंना चुकीचे महत्त्व देणे . चुकीच्या किमती देणे. मूर्खत्व म्हणजे योग्य मूल्यांची समज नसणे होय. योग्य मूल्ये एखाद्याने कशी काय प्रस्थापित करावीत?मालमत्ता संबंधित कल्पना यांना योग्य मूल्ये एखाद्याने कशी काय द्यावीत.योग्य मूल्ये अस्तित्वात येण्यासाठी तुम्ही विचार करणारा समजून घेतला पाहिजे .विचार करणारा समजून घेणे आवश्यक नाही काय ? विचार करणारा म्हणजे "मी" होय.जर या "मी"ला मी समजून घेतले नसेल तर मी काय निवडतो याला काहीच अर्थ नाही .जरी  मी मला "स्वत:ला" ओळखत नसेन तर माझ्या क्रिया व माझे विचार यांना काही पायाच नाही.अशा प्रकारे स्वज्ञान ही ध्यानाची खरी सुरुवात आहे .गुरू ,प्रणेते, प्रेषित, प्रेषक, पुस्तके, यातून तुम्ही जे मिळविता ते ज्ञान नव्हे.स्वशोधातून स्वचवकशीतून स्वजागृतीतून तुम्ही मिळविता ते ज्ञान होय.ध्यान ही स्वज्ञान सुरुवात आहे .स्वज्ञाना विना ध्यान नाही.जर मला माझ्या विचारांचे मार्ग समजत नसतील, माझ्या भावना माझे हेतू माझ्या वासना माझ्या इच्छा माझ्या कल्पना माझ्या मार्गांचे पाठलाग माझ्या क्रिया या मला समजत नसतील, जर मी मला ओळखत नसेन, तर माझ्या विचारांना पायाच नाही . विचार करणारा स्वज्ञानाविना फक्त मागतच असेल,प्रार्थना करीत असेल, नियमन करीत असेल, त्याग करीत असेल,तर या सगळ्याचे पर्यवसान गोंधळात होणे अपरिहार्य आहे .

स्वज्ञान ही ध्यान सुरुवात आहे .ध्यान म्हणजे विचार व भावनांच्या प्रत्येक हालचालींबद्दल जागृत असणे होय .जाणीवेचे केवळ प्रकट थरच नव्हे तर खोल सुप्त छुपे थरही त्यांच्या गूढ हालचालींसह समजून घेणे होय .गुप्त सुप्त खोल छुप्या हालचाली हेतू प्रतिक्रिया विचार व भावना समजून घेण्यासाठी जागृत मन स्तब्ध पाहिजे .म्हणजेच जागृत मन सुप्त मनाचे  प्रतिबिंब ग्रहण करण्यासाठी स्तब्ध पाहिजे .उथळ  जागृत मन हे दैनंदिन हालचालींनी ,भाकरी मिळवण्याच्या क्रियानी, दुसऱ्यांना फसवण्याच्या, लुटण्याच्या, समस्यांपासून दूर पळण्याच्या हालचालींनी, आपल्या दैनंदिन अस्तित्वाच्या हालचालींनी ,वगैरे वगैरे व्यापलेले असते .या उथळ  मनाला आपल्या हालचालीचा अर्थ अगोदर कळला पाहिजे.त्या समजण्यातून त्याला स्तब्धता प्राप्त झाली पाहिजे . नियमन ताबा जोरजबरदस्ती शिस्त हुकूमत यांनी स्तब्धता येणार नाही. शांतता स्तब्धता निस्तरंगता स्वक्रियासमजातून, स्वचवकशीतून, स्वपाहण्यातून, स्वपहाऱ्यातून, स्वजागृतीतून, येईल .ती स्वतःची निर्दयता समजण्यातून,आपण आपला नोकर आपली पत्नी आपला पती आपली मुलगी आपला मुलगा आपले शेजारी आपली आई आपले वडील यांच्याशी कसे बोलतो,त्यांच्याबद्दल कसा विचार करतो, त्या पाहण्यातून येईल .अशाप्रकारे उथळ मन जेव्हा स्वतःच्या क्रियांबद्दल संपूर्ण जागृत होते ,तेव्हा ते त्या समजातून स्वयंभूपणे, ओढल्याशिवाय, खेचल्याशिवाय, ताणल्याशिवाय,वासनेशिवाय, हुकमती शिवाय, स्तब्ध होते .नंतर ते मनाच्या कितीतरी थरांच्या सूचना,वांशिक इच्छा, गाडलेल्या आठवणी, गुप्त वासना, छुपे पाठलाग, न भरून आलेल्या जखमा, हे सर्व ग्रहण करण्याच्या स्थितीत येते. जेव्हा या सर्वांचे प्रगट मनावर रेखाटन होते व अशा प्रकारे त्या समजल्या जातात,जेव्हा सर्व जाणीव अशाप्रकारे रिकामी होते,जेव्हा सर्व जाणीव अशाप्रकारे सर्व स्मरणापासून मग ते कसलेही असो बंधमुक्त होते,तेव्हा मन अंतिम ग्रहण करण्याच्या स्थितीत असते .

ध्यान म्हणजे स्वज्ञान होय.स्वज्ञानाविना ध्यान नाही . तुमच्या प्रतिक्रियांबद्दल सर्वकाली जर तुम्ही जागृत नसाल, जर तुम्ही पूर्णपणे स्तब्ध नसाल,जर तुम्ही दैनंदिन क्रियांना पूर्णपणे ओळखत नसाल, तर एखाद्या खोलीत स्वतःला कोडून घेण्यात तुमच्या गुरूच्या, देवाच्या, किंवा आणखी कोणाच्या पुढय़ात, मांडी ठोकून ध्यान करण्यात काहीच अर्थ नाही .ती फक्त पळवाट आहे .स्वज्ञानाविना योग्य विचार नाही .योग्य विचाराविना तुमच्या कर्माला अर्थ नाही .जेव्हा स्वज्ञान असेल तेव्हा योग्य विचार असेल .योग्य विचार असेल तेव्हा योग्य क्रियाही असेल .जेव्हा योग्य क्रिया असेल तेव्हा गोंधळही नसेल .साहजिकच कुणीतरी तुम्हाला या गोंधळातून बाहेर काढावे अशा प्रकारच्या मागण्या अर्ज इत्यादी गोष्टीही नसतील .जो मनुष्य पूर्ण जागृत आहे तो सतत ध्यानमग्नच असतो .तो प्रार्थना करीत नाही.त्याला काहीही नको असते .प्रार्थनेतून ताब्यातून जोरातून हुकमतीतून नियमनातून वगैरे वगैरे सर्व उपाय योजनेतून तुम्ही काही एक स्तब्धता आणू शकाल, पण तो फक्त मंदपणा सुस्तपणा मद्दडपणा आहे.मनाला व अंत:करणाला सुस्तावस्थेत ढकलणे आहे .ते मनाला ओढणे आहे ..त्यागातून ज्याला तुम्ही एकाग्रता म्हणता त्यातून सत्याकडे तुम्ही जाणार नाही.कोणत्याही प्रकारचा त्याग तुम्हाला सत्याकडे नेणार नाही.समज स्वज्ञानातून येते.योग्य हेतू असेल तर जागृत राहणे कठीण नाही .जर तुम्ही मनाची स्वप्रक्रिया पाहण्यास उत्सुक असाल,केवळ उथळ थरच नव्हे तर जाणिवेच्या सर्व पातळ्या सुप्त गुप्त हेतूसह जाणण्यास  उत्सुक असाल ,तर जागृतता तुलनात्मक दृष्ट्या सोपी आहे .तुम्हाला खरोखरच जर स्वतःला जाणून घ्यावयाचे असेल तर तुम्ही स्वतःचे मन व अंतःकरण जरूर जरूर तपासाल.जेव्हा तुम्हाला जाणून घेण्याची तळमळ असेल तेव्हा ते तुम्हाला समजेलही.आता तुम्ही धि:कार किंवा समर्थनाशिवाय आपल्या प्रत्येक विचाराचा क्षणोक्षणी पाठलाग करू शकता .प्रत्येक भावना व विचार जसजसा उद्भवेल तसतसा त्याचा पाठलाग करून शिस्ती शिवाय शांतता प्राप्त होईल.आता तुम्हाला कुठलीही समस्याच शिल्लक राहिलेली नसेल.अंतर्विरोध  संपूर्णपणे नष्ट झालेला असेल .एखाद्या संध्याकाळी जेव्हा वारा नसेल तेव्हा तळे ज्याप्रमाणे शांत होते. लहरी पासून मुक्त होते. त्याप्रमाणेच हे आहे.जेव्हा मन निस्तरंग असते तेव्हाच ते न मोजता येणारे अस्तित्वात येते .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel