प्रश्न --मी अत्यंत एकाकी आहे हे मला हळूहळू कळायला लागले आहे . मी आता काय करावे ?

उत्तर--प्रश्न विचारणाऱ्याला, त्याला एकाकी कां वाटत आहे ते जाणून घ्यावयाचे आहे .एकाकीपणा म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे काय ?तुम्ही त्याबद्दल जागृत आहात काय ?मला याबद्दल फार दाट शंका आहे .आपण आपल्याला निरनिराळी संबंधमयता, कल्पना, वाचन, खेळ, करमणूक, निरनिराळ्या क्रिया, यात एवढे गुंतवून ठेवले आहे कि आपण एकाकी आहोत या बद्दलच्या जागृततेला त्यामुळे प्रतिबंध निर्माण  झाला आहे. आपली एकाकीपणा बद्दलची काय कल्पना आहे ?ही एक रिकामपणा बद्दलची जाणीव आहे.काहीही शिल्लक राहिले नसल्याबद्दलची ती एक जाणीव आहे .असामान्य असुरक्षित असल्याबद्दलची ती एक भावना आहे .कुठेही आपल्याला नांगर टाकायला आश्रय घ्यायला जागा नसल्याबद्दलची ती एक जाणीव आहे .एकाकीपणा म्हणजे निराशा,निराशामग्नता, नव्हे .ती एक पोकळपणाची भावना आहे .ती एक पोकळी आहे .रिकामपणा व निष्फळता प्राप्त झाल्याबद्दलची ती एक जाणीव आहे .मला खात्री आहे कि आपल्यापैकी अत्यंत यशस्वी किंवा अयशस्वी इसमाला, अत्यंत कार्यमग्न किंवा कदाचित कमी कार्यमग्न इसमाला,किंवा ज्ञानाचे व्यसन असलेल्याला, ही पोकळी हा रिकामेपणा कधीना कधी जाणवला आहे .सर्वांना हे माहित आहे की आपण कमी करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी न संपणारे दुःख, ज्या दुःखावर कसलेही पांघरूण घालता येणार नाही असे दुःख, हाच तो एकाकीपणा .
               
आपण पुन्हा एकदा काय होत आहे या दृष्टीने ही समस्या पाहू या .जेव्हा तुम्हाला एकाकी वाटते तेव्हां तुम्ही काय करता ते पाहू या .तुम्ही आपल्या एकाकीपणाच्या भावनेपासून पळण्याचा प्रयत्न करता .तुम्ही काहीतरी वाचायला घेता, एखादा पुढारी निवडता व त्याच्यामागून जाता, एखाद्या सिनेमाला जाता, किंवा मित्रमंडळी जमवून गप्पा मारीत पत्ते खेळत वगैरे वेळ घालवता.याशिवाय मोबाईल वरील गेम,फेसबुक' वगैरे अनेक गोष्टी आहेतच.तुम्ही सामाजिक कार्यकर्ते बनता .तुम्ही एकाकीपणावर एखादी सुरेख गोष्ट लिहिता, किंवा कविता करता, तुम्ही असे करीत नाही काय ? एकाकीपणाबद्दल जागृत होऊन,ज्याला तळ नाही असे दुःख पाहून,त्यातील तगमग व अस्वस्थता पाहून, तुम्ही एखादी पळवाट शोधता .ही पळवाट महत्त्वाची बनते आणि म्हणून तुमचा रेडिओ,टेलिव्हिजन, मोबाइल, त्यावरील खेळ ,तुमचे देव ,तुमचे गुरू,तुमचे धर्म, इत्यादी महत्त्व पावतात .ते तसे पावत नाहीत काय ?जेव्हा तुम्ही दुय्यम प्रतीच्या मूल्याना महत्त्व देता, तेव्हा ती मुल्ये तुम्हाला दुःख व गोंधळ यात नेऊन सोडतात .सर्व इंद्रियजन्य मूल्ये व कल्पनाजन्य मूल्ये म्हणजे दुय्यम मूल्ये होत.आजच्या सुधारणा या दुय्यम मूल्यांवर आधारित असल्यामुळे ,त्या तुम्हाला अनेक पळवाटा काढून देतात .मग तुम्ही आपली नोकरी, आपले कुटुंब,आपले सहकारी, आपला अभ्यास,आपला छंद, वगैरे मार्गांनी पळ काढता .तुमची सर्व संस्कृती ही पळवाटांवर आधारित आहे.आपली सर्व सुधारणा ही त्यावर उभी आहे .ही आज प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे .
            
तुम्ही कधीतरी एकटे असण्याचा प्रयत्न केला आहे काय?जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेंव्हा एकटे असणे किती असामान्य बिकट आहे व एकटे असण्यासाठी, त्यात आनंदित राहण्यासाठी,किती शुद्धबुद्धी तुमच्याजवळ असली पाहिजे, हे तुमच्या लक्षात येईल.आपले मन आपल्याला कधीही एकटे बसू देणार नाही.मन सारखे चळवळ करीत राहते.आपल्याला असा एकाकीपणा वाटतो तेव्हा तुम्ही काय करीत असता ?आपल्याला गुंतवण्यासाठी ते(मन) अनेक पळवाटा शोधून काढते. जेव्हा तुम्हाला असा एकाकीपणा वाटतो तेव्हा तुम्ही ती पोकळी ज्ञाताने भरून काढण्याचा प्रयत्न करीत नसता काय?आपण कार्यमग्न असण्याचे अनेक प्रकार शोधून काढता .आपण समाजात मिसळण्याचे नाना मार्ग शोधून काढता .जी वस्तू आपल्याला माहीत नाही ती वर उल्लेख केल्याप्रमाणे निरनिराळ्या मार्गानी भरून काढण्याचा आपण प्रयत्न करीत असतो .निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान,संबंधमयता, वस्तू, यांनी आपण ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करीत नसतो काय?ही आपली प्रक्रिया आहे .ही आपली वस्तुस्थिती आहे.हे आपले अस्तित्व आहे .तुम्हाला आता तुम्ही काय करीत आहात ते पूर्णपणे कळून चुकले आहे .तरीही ती पोकळी तुम्ही कांहीही केल्याशिवाय भरून काढू शकाल असे तुम्हाला वाटते काय?तुम्ही आत्तापर्यंत ही पोकळी भरून काढण्याचे अनेक मार्ग चोखाळले आहेत .तुम्ही यशस्वी झाला आहात काय ?पोकळी भरून काढण्याच्या कोणत्याही एका मार्गाचा तुम्हाला थोड्याच वेळात कंटाळा येतो . मग लगेच तुम्ही दुसऱ्या मार्गाकडे वळता. असे एकामागून एक चाललेले असत नाही काय?तुम्ही पोकळी खरोखरच भरून काढली आहे कि त्यावर एखादे पांघरूण घालून ती दृष्टीआड करण्याचा प्रयत्न केला आहे .जर तुम्ही ती पोकळी दृष्टीआड केली असेल, तर ती अजूनही तिथेच आहे, आणि संधी मिळताच ती तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही .जर तुम्ही ती टाळू शकला असाल, तर तुम्ही एक वेड्याच्या इस्पितळात तरी आहात किंवा अति मद्दड तरी आहात.जगात हेच नेहमी चाललेले आहे .
            
ही पोकळी हा रिकामेपणा आपल्याला योग्य प्रकारे भरता येइल काय?जर भरता येणार नसेल तर अापण त्याच्यापासून निदान दूर तरी पळू शकू काय ? निरनिराळ्या वाटांनी पळण्याचा आपण आतापर्यंत प्रयत्न करून पाहिला आहे . आणि असे लक्षात आले आहे की ती पोकळी पुन्हा दत्त म्हणून आपल्या पुढ्यात उभी आहेच.ती पुन्हा डोके वर काढते. असे आहे तर सर्वच वाटा कुचकामाच्या नाहीत काय?तुम्ही ही पोकळी कशाने भरून काढता,त्याला काडीचेही  महत्त्व नाही.तथाकथित प्रार्थना,पूजा,गुरू, इत्यादि ही सुद्धा एक पळवाट आहे .तुम्ही पळवाटेची दिशा बदललीत म्हणून वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही .अशा परिस्थितीत एकाकीपणा बद्दल आपण काय करावे हे तुम्ही कसे शोधून काढणार आहात ? पळण्याचे थांबा म्हणजे काय करावे हे तुम्हाला आपोआपच कळेल.जेव्हा तुम्ही जे काही आहे ,त्याला तोंड द्याल, तेव्हा तुम्हाला ते आपोआपच कळेल.टीव्ही रेडिओ मोबाइल किंवा इतर अनेक अशा सुधारणांकडे तुम्ही वळता कामा नये.असे होईल तेव्हा तो एकाकीपणा आपोआपच मृत्यू पावेल .आता तो एकाकीपणा नसेल .तो पूर्णपणे बदललेला असेल .जे आहे ते तुम्हाला बरोबर समजेल .जे आहे तेच फक्त सत्य आहे.मन सतत जे काही आहे ते टाळण्याचा प्रयत्न करीत असते.मन त्याच्यापासून सतत  दूर पळत असते.ते जे काही आहे ते पाहण्याचे नाकारीत असते.ते अशा प्रकारे स्वतःचेच स्वतःला अडथळे निर्माण करते .आपल्याला हे असंख्य अडथळे आहेत आणि म्हणून जे काही आहे ते आपण पाहू शकत नाही.ते आपण समजू शकत नाही .अशा प्रकारे आपण सत्याला वंचित होतो .हे सर्व अडथळे मनाने जे काही आहे ते न पाहण्यासाठी निर्माण केलेले आहेत.जे काही आहे ते पाहण्यासाठी नुसतेच प्रचंड सामर्थ्य व कर्म जागृतता लागत नाही, तर तुमची मालमत्ता घर नाव यश जे जे काही सुधारणा या नावाखाली येते त्या सगळ्याकडे पाठ फिरवावी लागते .जेव्हा तुम्ही जे काही आहे ते पाहाल,तेव्हा एकाकीपणा कसा बदलतो ते तुम्हाला आढळून येईल .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel