प्रश्न ---आपल्याला फक्त ज्ञात माहिती आहे .आपण अशा कोणत्या गोष्टीमुळे अज्ञाताचा सत्याचा परमेश्वराचा शोध घेण्यासाठी उद्युक्त होतो ?

उत्तर-- तुमचे मन खरोखरच अज्ञाताची इच्छा करीत असते काय ?आपल्यामध्ये खरोखरच सत्य परमेश्वर अज्ञात शोधण्याची इच्छा असते काय?हा केवळ उपहासाने विचारलेला प्रश्न नाही .आपण खरोखरच याचा तपास करू या .तुम्ही अज्ञात कसे काय शोधणार आहात ? जे तुम्हाला ज्ञात नाही त्याचा शोध तुम्ही कसा काय लावणार आहात?खरोखरच सत्याची इच्छा आहे की ज्ञाताच्या विस्तारीकरणाची इच्छा आहे ?मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आले आहे काय ?मला किती तरी गोष्टी ज्ञात आहेत .मला त्याच्यापासून शांती समाधान आनंद सुख मिळालले नाही .म्हणून मी आता अशा आणखी कुठल्या तरी गोष्टींची इच्छा करीत आहे की ज्यापासून मला जास्त समाधान ,जास्त आनंद, जास्त सुख, जास्त शांती, यांची प्राप्ती होईल किंवा आपण जे काही म्हणाल ते तुम्हाला मिळेल .ज्ञात म्हणजे माझे मन, कारण मन हा ज्ञाताचा परिणाम आहे .असे हे ज्ञात म्हणजे मन, अज्ञाताचा शोध करु शकेल काय ?जर मला सत्य अज्ञात माहित नसेल, तर मी त्याचा कसा काय आणि कुठे शोध घेणार ?अर्थात अज्ञात माझ्याकडे आले पाहिजे. त्याच्याकडे मी जाऊ शकत नाही .आणि जर मी कशाच्या पाठीमागे जात असेन, तर ते मी स्वरचिताच्या, स्वनिर्मितीच्या, स्वकल्पनेच्या,  स्वआराखड्याच्या, पाठीमागे जात आहे .

आपल्यातील कुठली गोष्ट आपल्याला अज्ञाताच्या शोधाला प्रेरणा देते हा मुळी प्रश्नच उद्भवत नाही.ही आपली समस्या नाही कारण अगदी उघड आहे .जास्त सुरक्षित असावे ,जास्त आनंदी असावे, जास्त सुखी असावे, जास्त समाधानी  असावे, जास्त सातत्य असावे, जास्त स्थायी असावे,  गडबड गोंधळ दुःख विरोध  यांपासून दूर असावे, ही आपली इच्छाच अज्ञाताच्या शोधाला आपल्याला प्रवृत्त करते .ही आपली स्वाभाविक वासना आहे .जेव्हा ही इच्छा ही प्रेरणा असते, आणि ही प्रेरणा सामान्यत: प्रत्येकामध्ये असते, तेव्हा तुम्ही बुद्ध ख्रिस्त राजकीय पक्ष एखादा धर्मगुरू   

यांच्याकडे आश्रय घेता.तुम्हाला एक सुंदर पळवाट सापडते .धर्मगुरु वगैरेंकडून जे मिळते ते सत्य नाही .जाणता न येणारे ते,हे नव्हे. हे अज्ञात नाही म्हणूनच अज्ञाताचा शोध घेण्याची प्रेरणा, अज्ञाताचा तपास करण्याची वासना ,अज्ञाताला हुडकू पाहणारी इच्छा संपुष्टात आली पाहिजे.म्हणजेच एकावर एक साठत गेलेल्या व अशा तर्‍हेने आणखी आणखी बळकट व दृढ होत गेलेल्या ज्ञाताची म्हणजेच मनाची संपूर्ण समज आली पाहिजे .कारण तेवढेच जाणणे आपल्याला शक्य आहे.तुम्हाला ज्ञात नाही त्याबद्दल तुम्ही विचार करू शकत नाही . तुम्ही जे ज्ञात आहे त्याबद्दलच फक्त विचार करू शकाल .

मनाने ज्ञातामध्ये सत्याच्या शोधासाठी  वाटचाल करीत राहता कामा नये.आपली खरी अडचण ही आहे .मन जेव्हा स्वतःला समजून घेते,  त्याची प्रत्येक हालचाल, म्हणजेच भूतातून वर्तमानाच्या द्वारा भविष्याकडे होणारी हालचाल लक्षात घेते, तेव्हाच ते शक्य होते. मन म्हणजे ज्ञाताशी संलग्न अशी सातत्य असणारी हालचाल आहे.हिचा शेवट होणे शक्य आहे काय ?जेव्हा मन स्वतःची कार्य प्रक्रिया समजून घेते, जेव्हा त्याला स्वतःची हालचाल, स्वतःचे मार्ग, स्वत:चे हेतू ,स्वतःची धावपळ व लगबग, स्वतःच्या वासना, केवळ उथळ  उथळ  वासना नव्हेत तर सुप्त खोल अशा वासना इच्छा  व प्रेरणा, कळतात तेव्हा त्याची हालचाल बंद पडते.ही फार बिकट व कसोटी घेणारी गोष्ट आहे .एका बैठकीत ,एखादे पुस्तक वाचून, एखादे व्याख्यान ऐकून,येणारी ही गोष्ट नव्हे. तुम्हाला मनाची हलचाल थांबणे शक्य आहे कि नाही ते कळणार नाही .यासाठी विचारांच्या प्रत्येक हालचालींबद्दल सतत जागृतता, अखंड पहारा ,आवश्यक आहे .तुम्ही केवळ जागे असाल तेव्हाच नव्हे तर जेव्हा तुम्ही झोपेत असाल तेव्हांही जागृतता व सतत पहारा आवश्यक आहे .जागृतता ही एक अखंड संपूर्ण प्रक्रिया आहे .ती केवळ कधी तरी अर्धवट उद्भवणारी प्रक्रिया असून उपयोगी नाही .

त्याचप्रमाणे हेतूही योग्य पाहिजे.अंतर्यामी आपणा सर्वांना अज्ञाताची तहान असते, या भोळसट समजुतीला, श्रद्धेलाहि ,पूर्णविराम मिळाला पाहिजे .आपण सर्वजण परमेश्वराचा शोध घेत आहोत हा भास आहे .आपण परमेश्वराचा शोध घेत नाही .आपल्याला प्रकाशाचा शोध घेण्याची गरज नाही .जेव्हा अंधार नाहीसा होईल तेव्हा आपोआपच प्रकाश असेल .अंधारातून कितीही वाटचाल केली तरी आपल्याला प्रकाश सापडणार नाही .आपण फक्त ज्या अडथळ्यामुळे अंधार निर्माण झाला आहे ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो.हे अडथळे दूर होणे किंवा न होणे हे आपल्या हेतूंवर अवलंबून आहे .जर तुम्ही हे अडथळे प्रकाश पाहण्यासाठी दूर करीत असाल तर तुम्ही वास्तविक दूर काहीही करत नाही .फक्त अंधार या शब्दाच्या ठिकाणी प्रकाश या शब्दाची स्थापना तुम्ही करीत आहात .काहीही न करता सुद्धा अंधाराच्या पलीकडे पाहण्याची इच्छा करणे किंवा काही प्रयत्न करणे ,ही सुद्धा अंधारापासून काढलेली एक पळवाटआहे. अशी कोणती गोष्ट आपल्याला अज्ञाताचा शोध घेण्याची प्रेरणा देते ही खरी चर्चेची गोष्टच नाही .आपल्यात इतका विरोध दुःख क्लेश गोंधळ व आपल्या अस्तित्वातील सर्व मूर्ख गोष्टी का आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे .जेव्हा हे सर्व नसेल तेव्हा प्रकाश आपोआपच असेल .आपल्याला प्रकाशासाठी पाहण्याची गरज नाही . जेव्हा मूर्खपणा नष्ट होईल तेव्हा आपोआपच शुद्ध बुद्धी असेल .परंतु जो मनुष्य मूर्ख आहे व शहाणा बनण्याचा प्रयत्न करीत आहे, तो अजूनही मूर्खच आहे .मूर्खपणाचे कधीही शहाणपणात रूपांतर होणार नाही.जेव्हा मूर्खपणा जाईल तेव्हा आपोआपच शहाणपणा असेल .शुद्ध बुद्धी असेल. जो मनुष्य मूर्ख आहे  व शुद्ध बुद्धि मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे,शहाणा होण्याचा प्रयत्न करीत आहे, तो कधीही शहाणा होणार नाही .मूर्खपणा म्हणजे काय हे कळण्यासाठी आपण शहाणपणा म्हणजे काय हे शोधण्याचा प्रयत्न न करता , मूर्खपणा म्हणजे  काय याचाच, केवळ उथळ उथळ  नव्हे तर खोलवर जाऊन तपास केला पाहिजे .मूर्खपणाच्या सर्वथरातून आपण अवगाहन केले पाहिजे .जेव्हा मूर्खपणा थांबेल तेव्हा शहाणपणा असेल.

ज्ञाताहून काहीतरी भव्य काहीतरी दिव्य आपल्यात आहे,की जे आपल्याला अज्ञाताचा शोध घेण्यास भाग पाडते, याचा शोध घेऊऩ काही उपयोग नाही. कशामुळे हा गोंधळ'ही युद्धे,ही जातीयता, ही वर्गीयता,हा भपका,हा प्रसिद्धीचा पाठलाग,हा ज्ञानाचा संग्रह, हे गायन वाचन कला इत्यादीतून पळ काढणे,निर्माण झाले आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे. हे सर्व ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात पाहणे व आपण जे काही आहोत तिथे परत येणे हे महत्त्वाचे आहे .इथून आपण आता सुरुवात करू शकतो .ज्ञाताला फेकून देणे हे आता तुलनात्मकदृष्टय़ा सोपे झाले आहे .जेव्हा मन स्तब्ध असते, शांत असते,निस्तरंग असते, जेव्हा ते भविष्याचा आराखडा काढीत नसते,कसलीही इच्छा करीत नसते, जेव्हा ते खरोखरच संपूर्ण शांत व स्तब्ध असते' तेव्हा अज्ञात अस्तित्वात येते .तुम्हाला त्याचा शोध करावा लागत नाही.तुम्ही त्याला निमंत्रण देऊ शकत नाही. जे तुम्हाला माहित आहे त्यालाच तुम्ही निमंत्रण देऊ शकता. अज्ञात पाहुण्याला तुम्ही निमंत्रण देऊ शकत नाही .ज्याला तुम्ही ओळखता त्याला तुम्ही निमंत्रण देऊ शकता .अज्ञात ,परमेश्वर, सत्य, किंवा तुम्ही जे काही म्हणाल ते, तुम्ही ओळखत नाही.तेव्हा सत्यालाच तुमच्याकडे आले पाहिजे.जेव्हा शेत योग्य स्थितीमध्ये आहे, जेव्हा शेत नांगरलेले आहे ,तेव्हा ते आपोआपच येईल .परंतु जर तुम्ही ते यावे म्हणून नांगरट कराल तर मात्र ते येणार नाही.

आपली खरी समस्या अज्ञाताचा शोध कसा घ्यावा ही नाही .मनाची ही संग्रह प्रक्रिया कशी समजून घ्यावी ही आहे.हे एक फार जबरदस्त व बिकट कार्य आहे .त्यासाठी सतत जागृतता अखंड पहारा व नित्य लक्ष पाहिजे .कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थन धि:कार समरसता व अवास्तव समजूत  असता कामा नये.हे सर्व म्हणजेच जे काही आहे त्याबरोबर असणे होय .कितीही शिस्तपालन व प्रार्थना, मन खऱ्या अर्थाने शांत स्तब्ध व निस्तरंग करणार नाही .जेव्हा वायुलहरी संपूर्णपणे थांबतात तेव्हा तळे आपोआप शांत होते.तुम्ही जलाशय निस्तरंग करू शकत नाही .तेव्हा आपले काम अज्ञातांचा शोध घेणे हे नसून ,आपल्यातील गडबड गोंधळ लगबग धावपळ दंगा विरोध क्लेश दुःख हे व्यवस्थित समजून घेणे हे आहे, आणि नंतर ती वस्तू अंधारातून चाहुलीविना एकदम प्रगट होते व त्यात आनंद असतो .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel