प्रश्न ----मानवातील पशुता कमी होण्यासाठी प्रत्येक धर्माने कुठल्या ना कुठल्या शिस्तीचा अवलंब करावा असे सांगितले आहे.स्व-शिस्त आचरणावर भर दिला आहे .संत व गूढवादी यांनी स्वशिस्तीमधून आपण देवत्व प्राप्त करून घेतले म्हणून ग्वाही दिली आहे .तुम्ही तर असे म्हणता कि स्वशिस्त ही  ही ईश्वरप्राप्तीच्या मार्गातील अडथळा आहे.मी गोंधळात पडलो आहे यातील बरोबर कोण आहे ?

उत्तर-- यात बरोबर कोण आहे हा या बाबतीतील प्रश्नच होऊ शकत नाही.बरोबर काय किंवा चूक काय यातील सत्य आपले आपण स्वतःशी शोधून काढले पाहिजे.आपण भारतातील संतांवर , जर तो संत आणखी कुठल्या दूरच्या प्रदेशातून येत असेल तर फारच उत्तम किंवा आणखी कोणा एखाद्या मनुष्यावर अवलंबून राहून चालणार नाही.त्यांच्या सांगण्याप्रमाणे या प्रश्नांतील सत्य शोधण्याचा प्रयत्न करून चालणार नाही .

कोणीतरी एक म्हणतो शिस्त पाहिजे दुसरा कुणीतरी म्हणतो शिस्त नको .तुम्ही या दोन प्रकारच्या मत प्रवाहांमध्ये सापडलेले आहात.साधारणपणे काय होते कि आपल्याला जे जास्त सोईस्कर आहे ते आपण निवडतो .वरील प्रश्नांमध्ये सुप्त अर्थगर्भता दडलेली आहे. आपल्याला याचा अत्यंत  सावधानतेने परिश्रमपूर्वक विचार केला पाहिजे. 

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कुणातरी श्रेष्टीने काय करावे ते सांगावे असे वाटत असते .योग्य वर्तणुकीच्या मार्गदर्शनासाठी आपण कोणाकडे तरी बघत असतो .आपली मूलभूत प्रवृत्ती सुरक्षित असावे आणि आणखी क्लेश होऊ नयेत ही आहे .कोणाला तरी आनंद,सत्य, परमेश्वर,भेटला आहे असे आपण ऐकतो आणि त्यावर अर्थातच विश्वास ठेवतो .नंतर आपण आशा करतो कि तो आपल्याला सत्यापर्यंत कसे पोचावे त्याचे मार्गदर्शन करील .आपल्याला बरोबर हेच पाहिजे असते .या वेड्या गोंधळमय जगात कुणातरी श्रेष्ठीनेआपल्याला आपण काय करावे ते सांगावे असे वाटत असते.आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही मूलभूत इच्छा आहे .या इच्छेप्रमाणे, वासनेप्रमाणे, प्रवृत्ती प्रमाणे, आपण आपल्या क्रियांना आकार देत असतो.परमेश्वर, ती सर्वोच्च वस्तू, ते अनंत, ते अनादि, ते शब्दातीत, ते कालातीत,ते अगणित, शिस्तीतून एखाद्या विशिष्ट आकारित क्रियेतून प्राप्त होईल काय ?आपल्याला एखाद्या विशिष्ट ध्येयाकडे विशिष्ट बिंदूकडे पोहोचावयाचे आहे .आपल्याला  असे वाटते कि स्वनियमन, शिस्त, काही दाबून टाकणे, काही बाष्पीभवन करून टाकणे, काही मोकळे सोडणे, काहींची बदली करणे,काही सवयी अंगी बाणविणे, वगैरेतून आपण जे काही शोधत आहोत ते मिळेल .

शिस्तीमध्ये काय काय अंतर्भूत आहे ?आपण शिस्तपालन का करतो ?शिस्त व शहाणपणा(शुद्ध बुद्धी) एकमेकांबरोबर असू शकतील काय ?बऱ्याच जणांना असे वाटते कि आपल्यातील ती पशुता,ती हिडीस ओंगळ भयानक घाणेरडी वस्तू, कुठच्या ना कुठच्या शिस्तीने ताब्यात ठेवली पाहिजे .ते पशुत्व,घाणेरडी वस्तू, शिस्तीने ताब्यात ठेवण्यासारखी आहे काय ?शिस्त म्हणजे आपली काय कल्पना आहे ?शिस्त म्हणजे बक्षिसाची हमी देणारी एक विशिष्ट प्रक्रिया, जिचा वापर केला असता आपल्याला इच्छित फळ मिळेल असे वाटते .ही वर्तणूक प्रक्रिया सकारात्मक भरीव असेल किंवा नकारात्मक असेल .जर आपण तिचा उत्साहाने  निश्चयपूर्वक काळजीपूर्वक  मेहनतपूर्वक हुशारीने वापर केला तर शेवटी आपल्याला इच्छित फलाची प्राप्ती होईल.ही सर्व प्रक्रिया कदाचित क्लेशदायक असेलहि, परंतु मी इच्छित फळाची प्राप्ती होण्यासाठी त्या सर्वातून जाण्याला तयार आहे.चढाई करणारा, स्वार्थी, ढोंगी, या पशुतेचे कारण,  असा हा "मी" "स्वतः"आता आपल्याला बदलावयाचा आहे .पशुतेचा आपल्याला नाश करावयाचा आहे .हे आता कसे करावे ?मानवातील हे पशुत्व आपण शिस्तीने नष्ट करू शकू काय ?कि ते पशुत्व शहाणपणातून नष्ट करता येईल ?शहाणपणा(शुध्द बुध्दी) शिस्तीतून प्राप्त होतो काय ?तूर्त अापण संत महात्मे काय म्हणतात ते विसरू या .या प्रश्नाची उकल अापण स्वत:च करूया. जणु काही या प्रश्नाकडे आपण प्रथमच पाहत आहोत अशा दृष्टीने या प्रश्नाची उकल करण्याचा आपण प्रयत्न करूया. अशा दृष्टिकोनातून आपल्याला कदाचित शेवटी काहीतरी सृजनशील सापडण्याचा संभव आहे.दुसरे काय म्हणतात ते विसरूया. ते सर्व पोकळ निरर्थक आहे.

प्रथम अापण असे म्हणतो कि आपल्यात विरोध आहे.काळे व पांढरे अधाशीपणा व अन्अधाशीपणा एकमेकांविरुद्ध थैमान घालत आहेत. मी अधाशी आहे त्यामुळे मला क्लेश निर्माण होतात .अधाशीपणातून मुक्त होण्यासाठी मी मला शिस्त लावली पाहिजे.ज्यापासून मला दुःख होईल अशा कुठल्याही प्रकारच्या विरोधाला,त्याला मी इथे अधाशी पणा असे म्हणत आहे, विरोध केला पाहिजे. अधाशी पणा हा समाज विरोधी आहे अनैतिक आहे वगेरे वगैरे .त्याला विरोध करण्यासाठी मी सर्व सामाजिक व धार्मिक कारणे सांगतो.तो  शिस्तीमुळे दूर तरी सारला जाईल काय ?अधाशीपणाचा नाश केला जाऊ शकेल काय ? ही दाबा दाबी विरोध  प्रक्रिया काय आहे याची आपण तपासणी करू या .जेव्हा अधाशीपणाला तुम्ही विरोध करीत असता तेव्हा काय होते ?अधाशीपणाला विरोध करणारी वस्तू कोण आहे ?स्वाभाविकपणे पहिला प्रश्न बरोबर हाच नाही काय ?तुम्ही अधाशी पणाला विरोध का करता ?"अधाशीपणापासून स्वतंत्र झाले पाहिजे"असे म्हणणे हाच अधाशीपणा नाही काय? आत्तापर्यंत अधाशीपणामुळे फायदा झाला होता .आता तोटा होत आहे. क्लेश होत आहेत.म्हणून ती वस्तू आता म्हणते कि "मला अधाशी पणापासून स्वतंत्र झाले पाहिजे".  अधाशीपणातून मुक्त होण्याचा हेतूच मुळी अधाशीपणातून निर्माण झालेला आहे. कारण त्याला तो जे काही नाही ते व्हायचे आहे .त्याच्याजवळ जे काही नाही ते त्याला मिळवायचे आहे.अधाशी नसणे मला आता फायद्याचे आहे म्हणून मी आता अन्अधाशीपणाचा पाठलाग करीत आहे. अजूनही हेतू काहीतरी बनणे हा आहे.अन्अधाशीपणा हा अजूनही अधाशीपणा  आहे ."मी" वर  नकारात्मकरित्या दिलेला जोर आहे .

अनेक उघड उथळ  कारणामुळे अधाशी असणे हे मला फायद्याचे नाही असे आढळून आले आहे .ते मला क्लेशकारक वाटत आहे.जो पर्यंत फायदा होत आहे,आनंद होत आहे ,तोपर्यंत मला त्याचे काहीच वाटत नाही.जोपर्यंत काही समस्या उद्भवत नाही तोपर्यंत मला अधाशीपणा चालतो .अधाशी असण्यासाठी समाज आपल्याला निरनिराळ्या प्रकारे उत्तेजन देतो .त्याचप्रमाणे धर्मही आपल्याला अधाशी असण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे उत्तेजन देतो. अमुकअमुक अाचरण केले  म्हणजे तमुकतमुक होईल असे सांगणे म्हणजे अधाशीपणाला  उत्तेजन नाही काय? जोपर्यंत कायदा हितकारक आहे तो पर्यंत आपण त्याला उत्तेजन देतो .ज्यावेळी तो क्लेशकारक ठरू लागतो त्या वेळी आपल्याला त्याला विरोध करावयाचा असतो .अधाशीपणाला केलेला विरोध म्हणजे शिस्त होय.परंतु  बाष्पीकरणातून विरोधातून आपण यशस्वी होतो का?अधाशीपणापासून आपण मुक्त होतो का? "मी"कडून झालेली कोणतीही क्रिया मग ती अधाशीपणा घालवण्याची का असेना हीच मुळी अधाशीपणा असते.माझ्याकडून केली जाणारी कोणतीही क्रिया अधाशीपणावर औषध ठरू शकत नाही.

जे आपल्याला माहीत नाही, जे अापण धुंडाळू शकत नाही,असे काहीही, प्रश्नकर्त्याचा प्रश्नाप्रमाणे, परमेश्वर समजण्यासाठी आपले मन अत्यंत शांत स्तब्ध निस्तरंग पाहिजे . न ढवळलेले मन अत्यंत आवश्यक आहे.काहीही समजण्यासाठी कुठल्याही समस्येचे आकलन होण्यासाठी मग जीवन असो संबंधमयता असो किंवा आणखी काही असो मन काही खोलीपर्यंत तरी अत्यंत शांत पाहिजे .ही शांतता, ही खोली ,शिस्तीतून प्राप्त होते काय?उथळ मन स्वतःला स्तब्ध  करून घेऊ शकेल परंतु अशी स्तब्धता म्हणजे प्रत्यक्षात नाश व मृत्यू आहे.ती स्तब्धता तरल तत्पर संवेदनाक्षम उत्कट व लवचिक(जमवून घेणारी)  नसते.तेव्हा विरोध हा मार्ग होऊ शकत नाही.

हे लक्षात येण्यासाठी शहाणपणा लागतो .तो लागत नाही काय ?मन शिस्तीमुळे मद्दड बनते हे लक्षात येणे हीच शहाणपणाची सुरुवात आहे .शिस्त म्हणजे एखाद्या भीतीच्या पोटी विशिष्ठ प्रकारची क्रिया करणे होय.हे लक्षात येणे ही शहाणपणाची सुरूवात नाही क़ाय ? स्वतःला शिस्त लावण्यामागे भीती नसते काय?भीती कसली? आपल्याला  हवे असते ते न मिळण्याची भीती होय.जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला शिस्त लावता जेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाला शिस्त लावता तेव्हा काय होते ?मन कठीण बनत नाही काय? अतरल अउत्कट बनत नाही काय ?ज्यानी स्वतःला अत्यंत कडक शिस्त लावली आहे असे लोक तुम्ही पाहात नाही काय?  याचा परिणाम नाश प्रक्रियेत होत नाही काय ?अंतर्विरोध  बाजूला केला जातो तो दडपला जातो परंतु तो तिथेच असतो .तो आत खदखदत असतो .

अशा प्रकारे शिस्त म्हणजे अंतर्विरोध होय.त्यातून एक यांत्रिक सवय निर्माण केली जाते.सवयीतून शुद्ध बुद्धी निर्माण होत नाही.सवय ,नेहमी तेच तेच करणे,यातून शहाणपणा निर्माण होत नाही . बाजाच्या पेटीवर दिवसभर बोटे फिरवून तुमची बोटे अतिशय हुषार बनतील किंवा आणखी कुठल्या क्रियेमध्ये तुमची बोटे हुषार बनतील परंतु हातांना मार्गदर्शन करण्यासाठी शहाणपणा लागत असतो .आपण आता शहाणपणाचा तपास करीत आहोत .

ज्याला तुम्ही आनंदी समजता,किंवा ज्याला सत्य दर्शन घडले आहे असे तुम्ही समजता, त्याला तुम्ही पाहता, तो नित्य काही गोष्टी नेमाने करीत असतो, आणि तुम्ही तो आनंद मिळवण्यासाठी त्याची नक्कल करता .या नक्कल करण्याला शिस्त म्हणता. त्यालाच शिस्त म्हणत नाही काय?दुसऱ्याला जे मिळाले आहे ते मिळण्यासाठी आपण नक्कल करतो .आनंदी(तो तसा आहे अशी आपली कल्पना असते ) होण्यासाठी आपण त्याची नक्कल करतो.शिस्तीतून आनंद मिळतो काय ?एक कसली तरी सवय लावून घेऊन, एक कसलीतरी प्रक्रिया पुन्हा पुन्हा करून, एक विशिष्ट वर्तणूक आचरून,तुम्ही स्वतंत्र होता काय ?कुठचाही शोध घेण्यासाठी प्रथम आपण स्वतंत्र असले पाहिजे.आपण स्वतंत्र असणे आवश्यक आहे असे तुम्हाला जाणवत नाही काय?जर तुम्हाला कसला तरी शोध लावायचा असेल, तर अंतर्यामी तुम्ही स्वतंत्र पाहिजे ,हे अगदी उघड आहे .शिस्तीने म्हणजेच मनाला विशिष्ट आकार देवून तुम्ही स्वतंत्र होता काय ?अर्थातच तुम्ही स्वतंत्र बनत नाही. तीच तीच क्रिया पुन्हा पुन्हा करणारे एक यंत्र तुम्ही बनता .एखाद्या विशिष्ट वर्तणुकीच्या नियमाप्रमाणे आचरण करणारे यंत्र तुम्ही बनता .शिस्तीतून कधीही स्वातंत्र्य निर्माण होणार नाही .शहाणपणातून शुद्ध बुध्दीतून स्वातंत्र्य निर्माण होईल.जेव्हा तुम्ही कुठच्याही अंतर्गत किंवा बाह्य शिस्तीतून स्वातंत्र्य येणार नाही, हे पाहता त्याच क्षणी शुद्ध बुद्धी जागृत केली जाते .म्हणजेच तुमच्या जवळ शहाणपणा येतो .

शिस्त म्हणून नव्हे परंतु प्रत्येकाची पहिली गरज स्वातंत्र्य हीच आहे. फक्त सद्गुणच तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकतात. अधाशीपणा  म्हणजे गोंधळ, कटुता म्हणजे  गोंधळ, राग म्हणजे  गोंधळ ,जेव्हा तुम्ही हे पाहता त्याच वेळी तुम्ही त्यापासून स्वतंत्र होता .तुम्ही या विकाराना विरोध करीत नाही.आणि तेव्हा तुम्ही स्वतंत्र होता . कुठलाही शोध फक्त स्वातंत्र्यातच लागू शकेल .कुठल्याही प्रकारची शिस्त म्हणजे पारतंत्र्य आणि स्वाभाविकच त्यात शोध लागू शकणार नाही .हे सर्व लक्षात येईल तेव्हाच तुन्ही स्वतंत्र होता.सद्गुण तुम्हाला स्वातंत्र्य देतात .दुर्गुणी मनुष्य हा गोंधळलेला असतो . तो गोंधळातच असतो . गोंधळात तुम्ही काहीही कसे काय शोधू शकाल ?शिस्तीतून सद्गुण प्राप्त होत नाहीत .सद्गुण म्हणजे स्वातंत्र्य .स्वयंभू गुणसंपन्न नसलेल्या, स्वयंभू सत्य नसलेल्या,अशा कुठच्याही क्रियेतून सद्गुण म्हणजे  स्वातंत्र्य निर्माण होणार नाही.आपली अडचण अशी आहे कि शिस्तीबद्दल आपण खूप वाचले आहे.उथळपणे आपण कितीतरी शिस्त पालनाचा प्रयत्न केला आहे .एखाद्या विशिष्ट प्रहरी सकाळी उठणे,एखाद्या विशिष्ट स्थितीत बसणे, एखादी विशिष्ट मनाची क्रिया सातत्याने करणे, कशावर तरी मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे,इत्यादि इत्यादि . शिस्त शिस्त, सवय सवय,नियमन नियमन,अभ्यास अभ्यास,कारण या गोष्टी तुम्ही अनेक वर्षे केलेल्या आहेत .यातून शेवटी ईश्वर प्राप्ती होईल असे तुम्हाला सांगण्यात आलेले आहे .आपल्या विचारांचा हा पाया आहे .मी किंचित निर्दयपणे व ढोबळपणे असे सांगतो कि इतक्या सोप्या पद्धतीने ईश्वर प्राप्त होणार नाही.परमेश्वर ही बाजारात मिळणारी वस्तू नाही. कि मी हे देतो(करतो) तू मला हे दे .

आपल्यापैकी बरेच बाह्य परिस्थितीने, धार्मिक तत्त्वांनी, श्रद्धेने व स्वतःच्याच अंतर्वर्ती मानसिक कुठेतरी पोचण्याच्या, काही तरी मिळवण्याच्या इच्छेने, इतके प्रेरित(अकारित) झालेले असतात कि नवीनपणे या समस्येचा विचार करण्याला, शिस्तीच्या भाषेत न बोलण्याला, ते असमर्थ  असतात.प्रथम अापण शिस्तीतील गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे .शिस्तीमुळे मन कोते होते .मनाला मर्यादा पडतात.वासनेमुळे व विशिष्ट धारणेमुळे मन विशिष्ट  प्रक्रियांमध्ये दाबून बसविले जाते.वगैरे वगैरे आपण स्पष्टपणे पाहणे आवश्यक आहे .धारणायुक्त मन, आकारित मन, मग ही धारणा कितीही चांगली असली तरी, स्वतंत्रता येणे सद्गुणी होणे कठीण (अशक्य )आहे .म्हणून अशा व्यक्तीला सत्य कळणे कठीण आहे. कदाचित अशक्यही आहे.परमेश्वर, अनंत, सत्य, जे काही तुम्ही म्हणाल ते, स्वातंत्र्य असल्याशिवाय अस्तित्वात येणे अशक्य आहे .सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची भयोत्पन्न शिस्त जोपर्यंत आहे ,तोपर्यंत सत्य प्रगट होणे अशक्य आहे.जर तुम्ही त्याचा पाठलाग करीत असाल, जर तुम्ही हेतू पूर्तीची वासना धरीत असाल, त्यासाठी प्रयत्न करत असाल,तर तुम्ही स्वतंत्र नाही.तुम्ही या ध्येयाशी बांधलेले आहात .तुम्ही कदाचित भूतापासून स्वतंत्र व्हालही परंतु भविष्य तुम्हाला धरून ठेवीत असते.अर्थातच हे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्यातच कुठचाही शोध लागू शकतो.ती एखादी कल्पना असेल,ती एखादी भावना असेल, कुठल्याही प्रकारची आवश्यकतेवर आधारलेली शिस्त, स्वातंत्र्य नाकारते.शिस्त म्हणजे ध्येय डोळ्यासमोर ठेवून एखाद्या क्रियेप्रमाणे पुन्हा पुन्हा केलेली विशिष्ट  क्रिया होय . असा प्रयत्न बांधणारा असतो. असे मन कधीही स्वतंत्र होणार नाही .असे मन विशिष्ट चाकोरी मध्ये ग्रामोफोनच्या तबकडीवरील सुई प्रमाणे फिरत राहते .

अशाप्रकारे शिस्तीतून सवयीतून मशागती मधून मन त्याच्यासमोर जे ध्येय आहे ते नियमनातून अभ्यासातून विशिष्ट आकारमशागतीतून  मिळविते.असे मन स्वतंत्र नसते.म्हणूनच त्याला ते न मोजता येण्यासारखे समजणार नाही.मिळणार नाही.तुम्ही स्वतःला सामाजिक मताप्रमाणे, एखाद्या साधूप्रमाणे,शिस्त लावण्याचा प्रयत्न कां करीत असता? एखाद्या मताप्रमाणे(ते मत तुमच्या शेजाऱ्याचे असो किंवा एखाद्या साधूंचे असो त्याला विशेष महत्त्व नाही ) स्वतःला आकार देण्याचा हा धंदा तुम्ही कां बरे करीत असता?एखाद्या प्रक्रियेबद्दल जागृत असणे, होकार नकार दाबून टाकणे, वगेरे क्रिया तुम्ही का करीत असता?ही विशिष्ट आकार प्रक्रिया काय दर्शविते ? या सर्वांबद्दल आपण काय करीत असतो, याबद्दल  जागृत असणे म्हणजेच स्वातंत्र्याचा आरंभ होय .यातून सद्गुण निर्मिती होते .सद्गुण निर्मिती म्हणजे विशिष्ट गुणांची मशागत नव्हे.उदाहरणार्थ मी अधाशी राहणार नाही हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे केलेले प्रयत्न म्हणजे सद्गुण निर्मिती नव्हे.असा प्रयत्न म्हणजे निश्चितच सद्गुण नव्हे .जर तुम्ही अधाशी नसल्याबद्दल जागृत असाल तर तुम्ही सद्गुणी आहात काय?  तुम्ही निरीच्छ असल्याबद्दलचा अधाशी वगेरे नसल्याबद्दलचा अभिमान बाळगत असाल तर तुम्ही सद्गुणी आहात काय?आपण शिस्तीतून बरोबर हेच करण्याचा प्रयत्न करीत असतो .असे प्रयत्न म्हणजे सद्गुण नक्कीच नव्हे.

शिस्त प्रक्रियेमध्ये "मी"वर जोर दिला जातो .अभ्यास, नियमन, ध्यानधारणा, या सर्वामुळे "मी" म्हणजे कुणी तरी आहे यावर जोर दिला जातो ."मी"च्या जाणिवेला पुष्टी दिली जाते .जेव्हा आपण एखादे असल्याबद्दलचा अभ्यास करतो, म्हणजेच आपण त्या जाणिवेपासून स्वतंत्र नसतो.अधाशी नसल्याचा अभ्यास, म्हणजे मन एक वेगळा बुरखा पांघरते, तो बुरखा अधाशी नसल्याबद्दलचा असतो .त्याला ते अधाशी नाही असे म्हणत असते.ही सर्व प्रक्रिया आपण पाहू शकता .हेतू, ध्येयप्राप्तीची वासना, विशिष्ट आकाराबरहुकूम होण्याची धडपड, विशिष्ट आकारात सुरक्षित असण्याची वासना, हे सर्व म्हणजे ज्ञाताकडून ज्ञाताकडे झालेली वाटचाल होय.हे सर्व मनाच्या स्वकोंडीच्या प्रक्रियेमधील आहे .या सर्वांबद्दल जागृत असणे म्हणजे शहाणपणाची सुरुवात होय.शहाणपणा हा सद्गुणही नाही व दुर्गुणही नाही.  शहाणपणा(शुद्ध बुद्धी ) सद्गुण  म्हणून कुठल्या तरी एखाद्या आकारात बसविता येणार नाही.शुद्ध बुद्धीतून स्वातंत्र्य प्राप्त होते.हे स्वातंत्र्य म्हणजे अव्यवस्था किंवा अराजकता नव्हे.जर तुम्ही संपूर्ण प्रक्रिया संपूर्णतः पाहाल तर यात कुठेही विरोध तुम्हाला आढळून येणार नाही . विरोधाला विरोध करताना आपण विशिष्ट प्रकारची शिस्त प्रक्रिया पाळण्याचा प्रयत्न करीत असतो.जेव्हा आपण विरोध प्रक्रिया पाहात असतो, तेव्हा शिस्तीचा प्रश्नच उद्भवत नाही.कारण प्रतिक्षणी आपण विरोधाचे मार्ग समजत असतो.यासाठी विलक्षण तत्परता लागते.स्वतःवर अखंड जागृत पहारा ठेवावा लागतो .आश्चर्याची गोष्ट म्हणजे  जरी तुम्ही सर्वकाळ जागृत नसला तरी एकदा योग्य हेतू निर्मिती झाली कि संवेदनक्षमता, अंतर्संवेदनाक्षमता, सतत आपोआप छायाचित्रे घेत असते.ही छायाचित्रे जेव्हा तुम्ही शांत असाल त्या वेळी तुम्हाला दाखविली जातात. 

म्हणून हा शिस्तीचा प्रश्न नाही . शिस्तीने संवेदनक्षमता येणार नाही. तुम्ही एखाद्या मुलावर काहीतरी करण्यासाठी जोर लावू शकाल,त्याला एखाद्या कोपऱ्यात डांबून ठेवाल, बाह्यवर्ती तो शांत दिसत असेलही, परंतु अंतर्यामी तो अत्यंत प्रक्षुब्ध असण्याचा संभव आहे . तो खिडकीतून बाहेर पाहात असेल व काही ना काही करून पळण्याचा मार्गहि शोधीत असेल .आपण अजूनही हेच करीत आहोत .अशाप्रकारे कोण बरोबर आहे व कोण चूक आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकाल.शिस्त योग्य आहे कि अयोग्य हे तुम्हीच ठरविले पाहिजे.तयार उत्तराची अपेक्षा करणे किंवा माझ्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे ही आणखी एक पळवाट होय.

चुकीच्या मार्गाने आपण जाऊ म्हणून अापण घाबरलेले असतो.आपल्याला यशस्वी होण्याची वासना असते .हे सर्व तुम्ही पाहू शकता. शिस्तपालनाच्या वासनेचे भीती हे कारण आहे. अज्ञात,शिस्तीच्या जाळ्यात पकडता येणार नाही .उलट अज्ञातासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे .मन आकार रहित पाहिजे. मन निराकार पाहिजे.मन:शांती आवश्यक आहे .जेव्हा मन स्तब्ध असल्याबद्दल सावध असते तेव्हा ते प्रत्यक्षात स्तब्ध नसते.जेव्हा मन अधाशी नसल्याबद्दल स्वतःला ओळखत असते तेव्हा ते या नव्या पेहरावात असते .अशी स्थिती खरी शांती आणू शकत नाही .या प्रश्नात अंतर्भूत असलेली नियमन करणारा व नियमन करावयाचे ही समस्याही समजणे आवश्यक आहे.या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया नाही तर ती एकच प्रक्रिया आहे . नियमन करणारा व नियमन करावयाचे ही दोन्ही एकच आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel