प्रश्न --तुम्हाला सत्यदर्शन झाले आहे ना? तुम्ही परमेश्वर म्हणजे काय ते  आम्हाला सांगू शकाल काय? 

उत्तर--मला सत्यदर्शन झाले आहे हे तुम्हाला कसे काय ठाऊक आहे?मला सत्यदर्शन झाले आहे हे ओळखण्यासाठी तुम्हालाही सत्यदर्शन झाले पाहिजे . हे केवळ हुषार उत्तर म्हणून दिलेले नाही . कुठलीही गोष्ट कळण्यासाठी तुम्ही त्यातलेच असले पाहिजेत .तुम्हाला स्वतःला सुद्धा अनुभव आला असला पाहिजे .आणि म्हणूनच मला सत्यदर्शन झाले आहे या तुमच्या विधानाला काहीही अर्थ रहात नाही. मला सत्यदर्शन झाले आहे किंवा नाही याचा संबंधच कुठे येतो ? ते झाले असेलही किंवा नसेलही .मला सत्यदर्शन झाले नसले म्हणून कुठे बिघडले ?मी सांगतो ते त्यामुळे खोटे ठरणार आहे काय ?जरी मी अत्यंत पूर्ण पुरुष असलो तरी मी जे बोलत असेन ते खोटे असेल तर त्याला काय  अर्थ आहे ?मी जे बोलत असेन ते जर सत्य नसेल तर तुम्ही का ऐकून घ्यावे ?मी जे काही बोलत आहे त्याच्याशी माझ्या सत्यदर्शनचा काहीही संबंध नाहीं .जो मनुष्य दुसर्‍याची त्याला सत्यदर्शन झाले आहे म्हणून पूजा करतो  तो खरोखर नेत्याची पंडितांची श्रेष्ठींची पूजा करीत आहे आणि म्हणूनच त्याला सत्य कधीही कळणार नाही .सत्य म्हणजे काय ?दर्शन कसले झाले आहे? दर्शन कोणाला झाले ?या गोष्टी अजिबात महत्वाच्या नाहीत .

सर्व परंपरा म्हणतात "पूर्ण पुरुषांच्या सहवासात रहा" परंतु पूर्ण पुरुष तुम्ही कसा काय ओळखणार ?समजा तुम्ही पूर्ण पुरुष ओळखला तरी फार फार तर तुम्ही त्याच्या  सहवासात राहाल.आजकाल हेही फार कठीण आहे .योग्य अर्थाने चांगले लोक फारच थोडे आहेत .चांगले लोक म्हणजे जे काहीही शोधीत नाहीत .काहीहि मिळविण्याचा प्रयत्न करत नाहीत. जे कशाच्याही पाठीमागे नाहीत. जे काहीही बनत नाहीत . (जे कशाच्या ना कशाच्या पाठीमागे आहेत ते केवळ लूट करीत आहेत .)आणि म्हणूनच कोणालाही अशी व्यक्ती शोधून काढणे अत्यंत कठीण आहे .

ज्यांना सत्यदर्शन झाले आहे त्यांना आपण भव्य दिव्य श्रेष्ठ समजतो.त्यांची सिंहासनावर स्थापना करतो .आशा करतो की ते आपल्याला काहीतरी देतील .ही अत्यंत चुकीची संबंधरूपता आहे .ज्याला सत्य दर्शन झाले आहे ,तो तुमच्या जवळ प्रेम नसेल,तर संबंध कसे काय ठेवणार?आपली खरी अडचण ही आहे .या सर्व चर्चेमध्ये आपण एकमेकांवर प्रेम करत नाही. आपण अत्यंत संशयी आहोत.तुम्हाला माझ्यापासून सत्य ज्ञान काहीतरी पाहिजे आहे .निदान तुम्हाला माझ्या सहवासात राहण्याची इच्छा आहे .या सर्व गोष्टी तुम्ही माझ्यावर प्रेम करीत नाही असे दर्शवितात .तुम्हाला काहीतरी हवे आहे आणि म्हणून तुम्ही लूट करण्यासाठी येथे आला आहात .जर आपण खरोखरच एकमेकांवर प्रेम करीत असू तर क्षणार्धात आपल्यामध्ये दळणवळण सुरू होईल.मग तुम्हाला सत्यदर्शन झाले आहे. मला नाही. तुम्ही श्रेष्ठ आहात. मी नाही .याचा काहीहि प्रश्नच उद्भवत नाही. आपली अंत:करणे शुष्क  झाली आहेत. म्हणून परमेश्वराला महत्त्व प्राप्त झाले आहे .तुम्हाला परमेश्वराला जाणून घ्यावयाचे आहे.कारण अंत:करणातील संगीत तुम्ही हरवून बसले आहात .म्हणून तुम्ही गवयाच्या पाठीमागे धावत आहात आणि त्याला विचारीत आहात की तो तुम्हाला संगीत  शिकवील काय?तो तुम्हाला शिकवू शकेल परंतू त्यातून तुम्ही सृजनशीलतेकडे जाणार नाही.गायन शास्त्र शिकून तुम्ही गायक होणार नाही .तुम्ही नृत्याचे पदन्यास शिकून घ्याल परंतु जर तुमच्या ह्रदयात सृजनशीलता नसेल तर तुम्ही त्याच त्याच हालचाली करणारे यंत्र होऊन बसाल. ध्येय अशी कुठची गोष्टच नाही .कारण ती फक्त प्राप्ती आहे .सौंदर्य ही प्राप्ती होऊ शकत नाही .कारण ते सत्य आहे ते फक्त आताच उद्या नाही .जर तुमच्याजवळ प्रेम असेल तर तुम्हाला सत्य समजेल.अज्ञात समजेल. परमेश्वर म्हणजे काय ते कळेल. ते तुम्हाला कुणीही सांगण्याची गरज नाही. ते तुम्हाला कोणीही सांगू शकणार नाही .आणि यातच प्रेमाचे सौंदर्य आहे .अंतिमता ही अंतिमतेतच असते .आपल्याजवळ प्रेम नाही म्हणून आपल्याला कोणीतरी गुरू पाहिजे की जो आपल्याला ते सत्य दाखविल.सत्य देईल.आपण जर खरोखरच प्रेम करू तर या जगाचे स्वरूप  किती बदलेल ते तुम्हाला माहीत आहे काय ?आपण खरोखर आनंदी व समृद्ध असले पाहिजे .वस्तू कुटुंब कल्पना ही आपली आनंद मिळविण्याची साधने असता कामा नयेत.आपण आनंदी असले पाहिजे .वस्तू लोक कल्पना यांचा पगडा आपल्यावर कधीच असता कामा नये .आपण प्रेम करीत नाही. आपण आनंदी नाही .मग आपण वस्तूंच्या कल्पनांच्या पाठीमागे लागतो .त्य़ात अधिक अधिक गुंतत जातो व मग इच्छा करतो की यापासून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे .या अनेक वस्तूतील एक म्हणजे परमेश्वर .

तुम्हाला सत्य म्हणजे  काय हे मी सांगावे अशी तुमची इच्छा आहे.जे अवर्णनीय आहे त्याचे वर्णन करता येईल का ?जे शब्दातीत आहे त्याला शब्दात पकडता येईल का?अगणिताचे गणित करता येईल का? वाऱ्याला मुठीत पकडता येईल का ? आणि जर तुम्ही पकडला तर तो वारा असेल का ?अगणित तुम्ही मोजले तर ते सत्य असेल काय ?निराकाराला तुम्ही आकार दिला तर ते सत्य असेल क़ाय ?अर्थातच कधीही नाही.ज्याक्षणी तुम्ही अवर्णनीयाचे वर्णन करता, त्याच क्षणी ते सत्य असण्याचे थांबते .ज्याक्षणी तुम्ही अज्ञाताचे ज्ञातात भाषांतर करता, त्या क्षणी ते अज्ञात  असण्याचे थांबते .आणि तरीही आपण हेच करण्यासाठी धडपडत असतो .आपल्याला ओळखायचे असते कारण तरच आपण टिकू शकू .आपली अशी विचारसरणी असते की तरच आपल्याला आनंद समाधान सातत्य लाभेल .आपल्याला सातत्याची तहान लागलेली असते .आपल्याला सत्यदर्शन पाहिजे कारण आपण आनंदी नाहीं.आपण दमले भागलेले आहोत आपण दुःखातिशयात झगडत आहोत  .आपण गंजून गेलेले आहोत.आपला दर्जा फारच उतरलेला आहे . आपण गोंधळलेले कंटाळलेले आहोत .ही साधी सरळ ज्ञात कथा समजून घेण्याऐवजी आपल्याला ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाण्याची हांव आहे. जे ज्ञात बनते ते सत्य नसते. म्हणून आपल्याला सत्य कधीही कळणार नाही.

कोण पूर्ण पुरुष आहे,  सत्य कसे आहे ,तिकडे लक्ष देण्याऐवजी, तुम्ही सर्व लक्ष जागृत असण्याकडे, तुम्ही जे काही आहे तिकडे का लावत नाही? असे कराल तेव्हाच तुम्हाला अज्ञात  सापडेल, जास्त बरोबर बोलायचे झाल्यास ते अज्ञात तुमच्याकडे येईल.जर तुम्हाला ज्ञात समजेल तर तुम्हाला यमनियमादिकानी जी आणलेली नाही अशी असामान्य  शांती लाभेल . त्यातच सृजनशील आनंदाचा उदय होईल .त्यातच सत्य प्रकट होईल .जो काही तरी बनत आहे धडपडत आहे त्याच्याकडे सत्य कधीही येणार नाही.जो फक्त केवळ आहे, त्याच्याकडेच सत्य येते .जो जे काही आहे ते पूर्ण समजून घेतो, तोच फक्त केवळ असतो. आणि मग तुम्हाला असे आढळून येईल की सत्य कुठेतरी लांब नाही.अज्ञात लांब नाही.जे काही आहे तेच सत्य आहे .ज्याप्रमाणे समस्येचे उत्तर समस्येतच असते त्याचप्रमाणे सत्य जे काही आहे ते त्यातच आहे .जर आपण जे काही आहे ते समजून घेऊ तर आपल्याला सत्य कळेल .

मंदपणा मूर्खत्व अधाशीपणा इच्छा भीती आशा आकांक्षा तृष्णा  वगैरे वगैरे  बद्दल जागृत असणे अत्यंत बिकट आहे .किंबहुना या सर्वांबद्दल पूर्ण जागृत असणे ही वस्तुस्थिती  म्हणजेच सत्य होय .सत्य तुम्हाला स्वतंत्र करते.तुमचे स्वतंत्र होण्याचे प्रयत्न नव्हे.अशा प्रकारे सत्य दूर नाही. जे आहे तेच सत्य आहे .आपण ते दूर ठेवतो कारण आपल्याला सातत्य आशा आहे .म्हणून आपण सत्य सातत्याचे साधन म्हणून वापरण्याचा प्रयत्न करतो .सत्यदर्शन इथे आता या क्षणी शक्य आहे.अंतिम कालातीत आत्ता आहे . आत्ता जो काल बंधनाच्या सापळ्यात सापडला आहे त्याला ते कळणार नाही . विचार कालमुक्त होण्यासाठी क्रिया लागते . प्रतिक्रिया नव्हे .परंतु मन हे आळशी आहे.आणि म्हणूनच ते सर्व प्रकारचे अडथळे निर्माण करते .खऱ्या प्रार्थनेने विचार ,कालापासून मुक्त होणे शक्य आहे .खरी प्रार्थना म्हणजे संपूर्ण क्रिया, सातत्यपूर्ण क्रिया नव्हे .मन जेव्हा भौतिक स्मरण नव्हे तर मानसिक स्मरण लक्षात घेईल, तेव्हा ही संपूर्ण क्रिया अस्तित्वात येईल .जोपर्यंत स्मरण कार्यरत आहे तोपर्यंत जे काही आहे ते मनाला कळणार नाही.पूर्णविरामातच अखंड ताजेपणा व नाविन्य आहे.तेच खरे नूतनीकरण जेव्हां एखाद्याचे सर्व अस्तित्व असामान्य सृजनशील व हेतूशून्य जागृत बनते .सातत्यात मृत्यू आहे नाश आहे .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel