प्रश्न ---मृत्यूचा जीवनाशी संबंध कशा स्वरूपाचा आहे ?

उत्तर--मॄत्यू व जीवन यात खरोखरच विभागणी आहे काय?आपण मृत्यू हा जीवनापासून काहीतरी वेगळा आहे असे कां समजतो ?आपण मृत्यूला घाबरलेले कां असतो ?मृत्यूवर लिहिलेल्या ग्रंथांची संख्या इतकी प्रचंड कां आहे ?ही जीवन व मृत्यू यामध्ये सीमारेषा कां बरे आहे ?ही विभागणी खरोखरच आहे की काल्पनिक आहे ?का ती केवळ एक मनाची टूम आहे ?जेव्हा आपण जीवन असे म्हणतो तेव्हा"जगण्याची समरसता पूर्ण सातत्य प्रक्रिया"असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो .मी व माझे घर,मी व माझे आईवडिल, मी व माझी बायको, मी व माझा नवरा,मी व माझी मुले ,मी व माझी मालमत्ता,मी व माझे पूर्वीचे अनुभव ,हे सर्व म्हणजे जीवन असे आपण समजत नसतो काय़ ?जीवन म्हणजे सुप्त व प्रगट स्मरण सातत्य, निरनिराळे झगडे, विरोध, भांडणे ,घटना व अनुभव ,यात जगणे होय .या सर्वाला आपण जीवन म्हणतो.  मग याच्या विरुद्ध आपण मृत्यू उभा करतो .म्हणजेच या सर्वांना पूर्णविराम देणे होय.अशा प्रकारे विरुद्ध म्हणजे मृत्यू निर्माण करून, नंतर त्याला घाबरून, जीवनाचा मृत्यूशी असलेला संबंध सांधावयालाला सुरुवात करतो .जर आपण ही फट एखाद्या स्पष्टीकरणाने,मृत्योत्तर सातत्य आहे अशा श्रद्धेने, भरू शकलो तर आपल्याला समाधान प्राप्त होते.आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो किंवा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात विचार शिल्लक राहील असे समजतो .नंतर ज्ञात व अज्ञात यात संबंध प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करतो .जेव्हा आपण जीवन व मृत्यू यांचा संबंध काय असावा असे विचारतो तेव्हा आपण बरोबर हेच करीत नसतो काय ?जगणे व शेवट (मृत्यू)यातील फट कशी बुजविता येईल हाच आपला प्रयत्न नसतो काय ?हीच आपली मूलभूत वासना नसते काय?

शेवट म्हणजेच मृत्यू, जिवंत असताना कधीतरी जाणून घेता येईल काय ?जिवंत असताना आपण मृत्यू म्हणजे काय? हे जाणू शकलो तर समस्याच शिल्लक राहणार नाही.जिवंत असताना आपल्याला अज्ञाताचा अनुभव घेता येत नाही म्हणून आपण अज्ञाताला घाबरलेले असतो . आपण म्हणजेच ज्ञाताचा परिणाम आणि मृत्यू म्हणजे अज्ञात यांच्यातील  संबंध प्रस्थापित करण्याची आपली धडपड असते .भूत व मन ज्याबद्दल कल्पना करु शकत नाही असे काही तरी, ज्याला आपण  मृत्यू म्हणतो ,त्याच्यात व जीवनात संबंध असू शकेल काय ?प्रथम आपण मुळात यांची विभागणीच कां करतो ?आपले मन फक्त सातत्याच्या म्हणजेच ज्ञाताच्या क्षेत्रात संचार करू शकते .हेच त्याचे कारण नव्हे काय ?काही विशिष्ट सुखदुःखाच्या आठवणी, प्रेमाच्या ममतेच्या जिव्हाळय़ाचा आठवणी,काही निरनिराळे विशिष्ट अनुभव, यांचा विचार करणारा म्हणून कर्ता म्हणून एखादा स्वत:ला ओळखतो .त्याचप्रमाणे एखादा स्वतःला सतत असणारा म्हणून ओळखतो .हे सर्व नसेल तर मी म्हणून कुणी आहे याबद्दल एखाद्याजवळ काहीही संग्रह नसेल .जेव्हा मी म्हणून म्हणणाऱ्याचा शेवट होतो, त्यालाच आपण मृत्यू असे म्हणतो ,तेव्हा आपल्याला अज्ञाताची भीती वाटते .म्हणून आपल्याला अज्ञात ज्ञातात ओढून आणायचे असते .आपला सर्व प्रयत्न हा ज्ञाताला सातत्य देण्याचा असतो .आपल्याला आयुष्य समजून घ्यावयाचे नसते .  जीवनातच मृत्यूचा अंतर्भाव आहे.आपल्याला फक्त सातत्य तृष्णाच लागलेली असते.कधीही शेवट होऊ नये असे वाटते .आपल्याला जीवन व मृत्यू हे खर्‍या अर्थाने जाणून घ्यावयाचे नाहीत .तर फक्त शेवटा शिवाय सातत्य कसे टिकवावे हे माहित करून घ्यावयाचे असते.

जिथे सातत्य असते तिथे नाविन्य नसते .तिथे काहीही नवीन असू शकणार नाही हे उघड आहे .जेव्हा सातत्याचा शेवट होतो तेव्हाच नित्य नवेअसे ते असण्याचा संभव आहे .परंतु या शेवटालाच तर आपण घाबरत असतो.फक्त शेवटातच नाविन्य असू शकेल. सृजनता असू शकेल .हे आपल्याला कळत नाही .आपले अनुभव आपली स्मरणे आपली दुःखे आपली 

दुर्दैवें रोजच्या रोज वाहून नेण्यात नाविन्य असूच शकत नाही .जेव्हा आपण प्रत्येक दिवशी जे काही जुने आहे त्याला मरतो तेव्हाच रोज नाविन्य असणे शक्य आहे .जेथे सातत्य आहे तेथे नवीन काही असणे अशक्य आहे .नवीन म्हणजेच सृजनशील,अज्ञात, अंतिम,अनंत,परमेश्वर, किंवा तुम्ही जे काही म्हणाल ते.जो मनुष्य, जी सातत्य वस्तू, अज्ञाताचा अंतिमतेचा सत्याचा शोध घेते, त्याला ते कधीही सापडणार नाही. त्याला तो जे रेखाटन करतो तेच सापडू शकेल .तो जे रचतो ते सत्य नसते .फक्त शेवटात मृत्यूतच नवीन समजू शकेल .जो मनुष्य जीवन व मृत्यू ,जीवन व तो जे पलीकडचे समजतो ते,यातील फट सांधण्याचा प्रयत्न करीत असेल तो खोट्या फसव्या असत्य स्वरचित जगात राहत आहे .

आता जगत असतानाच मरणे म्हणजे शेवट होणे काहीही नसणे असे असणे शक्य आहे काय ?या जगात जगत असताना ,जिथे प्रत्येक गोष्ट जास्त जास्त किंवा कमी कमी बनत असते, जिथे प्रत्येक हालचाल म्हणजे  पायऱ्या चढणे मिळवणे होणे बनणे आहे, तिथे मृत्यू समजणे शक्य आहे काय ?मानसिक सुरक्षिततेसाठी आपण अंतर्यामी स्मरणा मार्फत गुंतत असतो. ज्या स्मरणाचा एखाद्याने संग्रह केला आहे, जणू काही त्याचे एक मोठे गोदाम तयार केले आहे,  आणि जो या गोदामात आनंद सुरक्षितता शोधत आहे, असे स्मरण नष्ट होणे शक्य आहे क़ाय ?या सर्वाला रामराम ठोकणे शक्य आहे काय ?म्हणजेच प्रतिदिनी मरणे व अशाप्रकारे उद्या पुन्हा नवीनच असणे ,उद्या पुनर्जन्म होण्याची शक्यता असणे, शक्य आहे काय?जो प्रतिदिनी मृत्यू पावतो व दुसऱ्या दिवशी पुन: जन्म घेतो म्हणजेच गेल्या दिवसाचे भौतिक स्मरण राहते परंतु मानसिक स्मरण बाळगत नाही असा एखादाच मृत्यू म्हणजे काय ते जिवंत असताना जाणू शकतो. फक्त त्या मरण्यातच, त्या शेवट होण्यातच, त्या सातत्य पूर्णविरामातच, नाविन्य आहे . अंतिमतेचे सृजन आहे .

++++++++++++++-++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel