“अनसतग्गोयं भिक्खवे संसारो पुब्बा कोटि न पञ्ञायति, अविज्जानीवरणानं सत्तानं तण्हासञ्ञोजनानं संधावतं संसरतं।”

(भिक्षूहो,हा संसार अनादि आहे.अविद्येनें आच्छादिलेल्या आणि तृष्णेनें बद्ध झालेल्या संसारचक्रांत सांपजलेल्या प्रण्यांची पूर्व स्थिति काय होती, हें कांहीं समजत नाहीं.) (संयुत्तनिकाय)

आर्य अष्टांगिक मार्ग जसा साधनमार्गांत दोन्ही अंत टाळून मध्यमवर्ती आहे, तसा हा प्रतीत्यसमुत्पाद तत्वज्ञानमतांत मध्यमवर्ती आहे. बुद्धाच्या वेळीं अस्तिवादी ह्मणजे आत्मा शाश्वत वस्तु आहे असें ह्मणणारे कांही तत्ववेत्ते होते. दुसरे नास्तिवादी ह्मणजे आत्मा अशी कांहींच वस्तु नाहीं असें ह्मणणारे होते. या दोहोंच्यामधील मत प्रतीत्यसमुत्पाद हें आहे. कारण त्याप्रमाणें आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत पदार्थ नसून कार्यकारण नियमानें बदलणारा आहे. इदं सति इदं होति इदं असति इदं न होति. कारण असेल तर कार्य होतें, कारण नसेल तर कार्य होत नाहीं.

बुद्धभगवान् कात्यायनाला ह्मणतात:-
“सब्बं अत्थीति खो कच्चान अयमेको अंतो। सब्बं नत्यीति अयं दुतियो अंतो। एते ते उभो अंते अनुपगम्म मज्झेन तथागतो धम्मं देसेति अविज्जापच्छया संखारा।।पे०।।”

हे कात्यायना सर्व आहे (आत्मा नित्य आहे) हा एक अंत. सर्व नाहीं (आत्मा मुळींच नाहीं) हा दुसरा अंत, ह्या दोन अंतांला न जातां तथागत मधल्या मार्गानेंच धर्मोपदेश करितो. (तो असा) अविद्येपासून संस्कार इत्यादि प्रतीत्यसमुत्पाद. (संयुत्तनिकाय)

अविद्येपासून संस्कारांची उत्पत्ति, अविद्येचा नाश झाला ह्मणजे संस्कारांचा नाश होतो इत्यादि नियम न बदलणारे आहेत; त्यांस ‘धर्मनियामता’ धर्मस्थिति, इत्यादि शब्दांनी संबोधिलें आहे. बुद्ध ह्मणतात:-

“उप्पादा वा तथागतानं अनुप्पादा वा तथा गतानं ठिताव सा धातु धम्मठ्ठितता धम्मनियामता इदप्पच्चयता। तं तथागतो अभिसंबुज्झति अभिसमेति। अभिसंबुज्झित्वा अभिसमेत्वा आचिक्खति, देसेति,....... पस्सथाति चाह।”

तथागत जन्मला काय किंवा न जन्मला काय, ही जी शक्ति, धर्मस्थिति, धर्मनियामता, कार्यकारणपरंपरा, ती आहेच आहे. तथागत तिला जाणतो, तिचा साक्षात्कार करून घेऊन लोकांना सांगतो, लोकांला तिचा उपदेश करितो आणि हिला तुह्मी आपल्या बुध्दीनें जाणा, असें ह्मणतो.(संयुत्तनिकाय)

हें जग शाश्वत आहे कीं अशाश्वत आहे, ह्या जगाचा अंत होणार आहे कीं नाहीं, शरीर आणि जीन एकच आहेत कीं भिन्न आहेत, प्राणी मेल्यावर उत्पन्न होतो कीं नाहीं, इत्यादि प्रश्र सोडवीत बसल्यानें प्रज्ञाप्राप्तीला मोठा अडथळा येण्याचा संभव आहे. कारण हे प्रश्र योग्य रीतीनें केलेले नाहींत (नो कल्लोपञ्हो); ह्मणून हे प्रश्र बाजूस ठेवून योग्यानं प्रतीत्य समुत्पादाचें यथार्थ ज्ञान करून घ्यावें आणि प्रज्ञा पूर्णत्वास न्यावी. कारण प्रज्ञेनेंच निर्वाणप्रप्ति होणार आहे.

सभ्यगृहस्थहो, याप्रमाणें अधिशीलशिक्षा, अधिचित्तशिक्षा, आणि अधिप्रज्ञाशिक्षा यांच्या द्वारें बौद्ध धर्माचा सारांश आपणापुढें ठेविला आहे. विषय मूळचा फार कठीण आहे. त्याला सौम्य स्वरूप देण्याचा होतां होईल तों प्रयत्न केला आहे. तो कितपत साधला आहे, हें कांहीं माझ्यानें सांगवत नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel