बुद्ध ह्मणाले:- भिक्षू हो, प्राचीनकाळीं ह्या श्रावस्ति नगरींतच एक वैदेहिका नांवाची कुलीन स्त्री राहत होती. ती गोड बोलणारी आहे, नम्र आहे व ती फार शांत आहे, अशी तिची सर्व शहरांत ख्याति होती. भिक्षू हो, त्या वैदेहिकेची एक परम दक्ष आणि उद्योगी काली नांवाची दासी होती. एके  दिवशीं त्या दासीच्या मनांत अशी शंका आली कीं, ही माझी धनीण खरोखरच शांतवृत्तीची आहे, किंवा मी वेळच्यावेळीं कामें करीत आहें ह्मणून तिला रागावण्याला संधीच सांपडत नाहीं? ह्या शंकेच्या समाधानार्थ आपल्या मालकिणीची परिक्षा पाहण्याचा तिनें बेत केला. व ती एके दिवशीं जरा उशिरांच उठली. तेव्हां ती वैदेहिका तिला ह्मणाली, “काय ग काली आज इतका उशीर कां केलास ?” तेव्हां काली ह्मणाली, “बाईसाहेब सहज उशीर झाला.” वैदेहिकेनें कपाळाला आठ्या घालून व भृकुटी वर चढवून ह्मटलें, “कसली ही पापी दासी उशीरां उठते ह्मणजे काय?” कांहीं दिवस गेल्यावर काली दासी आणखी थोडासा उशीर करून उठली. त्या दिवशीं बाईसाहेबांनीं तिला बर्‍याच शिव्या दिल्या. आणखी कांहीं दिवस गेल्यावर बाईसाहेबांची पुन: एकदा परीक्षा पहावी ह्मणून कालीनें उठण्यास फारच उशीर केला. मग काय  विचारतां बाईसाहेबांचा क्रोधवन्हि एकदम भडकला. तिनें जवळ पडलेली लोखंडाचीं खीळ घेऊन ती कालीच्या डोक्यांत घातली. काली बिचारी घाबर्‍या घुबर्‍या आरडत ओरडत रस्त्यावर धांवली. तेथें शेजारी पाजारी गोळा झाले. व त्यांनीं कालीला काय झालें, तिच्या डोक्यांतून रक्त कां वाहतें वगैरे चौकशी करण्यास आरंभ केला. तेव्हां काली त्यांस ह्मणाली, “आपण ज्यांना मोठ्या शांत समजत होतां त्या आमच्या बाईसाहेबांचें हें कृत्य आहे.” ह्या कृत्यानें ही स्त्री साध्वी दिसत होती पण ती साध्वी नव्हे, ही मोठी क्रूर आहे, अशी वैदेहिकेची शहरभर अपकीर्ति पसरली.

“भिक्षू हो, त्या कुलीन स्त्रीप्रमाणेंच कांहीं भिक्षू जोंपर्यंत कटू शब्द ऐकण्याचा प्रसंग आला नाहीं, तोंपर्यंत मोठे शांत दिसतात. परंतु जेव्हां एकाद्या भिक्षूवर कटु शब्दांचा प्रहार होतो, तेव्हां तो खरोखरच शांत आहे कीं नाहीं हें जाणण्याची पाळी येते. ............... भिक्षू हो, कोणी तुह्माला वेळ पाहून बोलेल, कोणी अवेळीं बोलेल, कोणी तुमच्या हातून झालेला अपराध सांगेल, कोणी तुमच्यावर नसता आळ घालील, कोणी तुह्माला मृदु शब्दांनीं बोलेल, कोणी कठोर शब्दांनीं बोलेल, कोणी प्रेमभावानें बोलेल आणि कोणी द्वेषभावानें बोलेल. या सर्वांविषयीं आपलें मन विकृत होणार नाहीं अशी तुह्मी खबरदारी घेतली पाहिजे; तुमच्या तोंडांतून वाईट शब्द निघूं नयेत अशाबद्दलही तुह्मी सावध असलें पाहिजे; आणि ज्यानें आपल्यावर वाग्बाणांचा प्रहार केला असेल त्यावरच प्रेम करूं लागून तेथून सर्व जगाविषयीं प्रेमभाव उत्पन्न करण्यास तुह्मीं शिकलें पाहिजे. जरी दुष्ट चोरांनीं करवतीनें तुमचें डोकें कापलें, तरी देखील तुह्मीं रागावतां कामा नये. अशा प्रसंगी जो रागावेल तो माझा शिष्य होण्यास लायक नाहीं. त्या चोरांवर देखील तुह्मीं प्रेम करावें; व त्यांला निमित्त करून सर्व प्राणिमात्रांविषयीं तुमच्या अंत:करणांत प्रेमभाव उत्पन्न व्हावा.”

साधुसंतांच्या उदाहरणानें आणि उपदेशानेंहि आपल्या मनांतील क्रोधशल्य उपटून काढण्याचा प्रयत्न करावा. असें सांगितलें आहे. एकनाथ, तुकाराम इत्याति सत्पुरूषांनीं अनेक प्रकारें खलांनीं केलेला छळ सहन करून आपली शांतवृत्ति कायम ठेविली, हें उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर असतां एवढ्यातेवढ्यासाठीं मी दुसर्‍यावर रागावतों; व कोणी लहानसहान अपराध केला असतां त्याचा सूड उगविण्याची दुष्ट वासना उराशीं घट्ट धऱून बसतों, हें काय? ह्या कुबुध्दीचा मी त्याग न केला तर –

“ ऐसें भाग्य कंई लाहाता होईन। अवघें देखें जन ब्रह्मरूप।।”
मग तया सुखा अंत नाहीं पार। आनंदें सागर हेलावती।।”

अशा सुखाचा मी अनुभव घेऊं शकेन काय? अशा रीतीनें विचार करून मनांतील वैरभाव नष्ट कारावा व प्रेमभावना परिपूर्ण करावी. या भावनेनें तीन ध्यानें साध्य होतात. शिवाय आणखीहि बरेच फायदे ह्या भावनेमुळें होत असतात. शांतिदेवाचार्यांनीं ह्मटलें आहे:-  

प्रासादिकत्वमारोग्यं प्रामोद्यं चिरजीवितम्।
चक्रवर्तिसुखं स्फीतं क्षमी प्रप्रोति संसरन्।।


या संसारांत क्षमावान् मनुष्याला सौंदर्य, आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य आणि चक्रवर्तीराजासारखें सुख हीं प्राप्त होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel