पोवाडे शिवाजी महाराज

वीरमणि बाजीप्रभु देशपांडे

Author:संकलित

धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार ।

धन्य तो शूर । धर्माच्या कामीं जो जो मरणार ।

त्याच्या जयनाद जो जो होणार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥

चौक १

अफझुल्लाला ठार केल्यावर । झालं विजापूर ।

भीतिनें गार । शाहा मग झाला मोठा बेजार ।

फार मोठं झालं त्याला शेजार । जडला जणूं घोर त्याला आजार ॥

सारे अमीर करिती विचार । आतां जाणार ।

गांव विजापूर । लौकर सैतानाच्या कबजांत ।

होणार सारा घोर आकांत । साधावा कैसा त्याचा हो घात ॥

अफझुल्लाचा मुलगा फाझलखान । झाल हैराण ।

सुचेला त्याला आन । सूडानं घेरलं त्याच्या हृदयास ।

येईना झोंप, झाला कडु घांस । अंगाचं आटलं त्याच्या लइ मांस ॥

सदा झाला शिवराया काळ । लागली तळमळ ।

परि तो दुर्बळ । एकला काय शिवाला करणार ।

सिंहाला कोल्हं कसं हो धरणार ? । मुंगसाला साप काय करणार ?॥

चाल

एके दिवशीं अफझुल फाजलाच्या स्वप्नामधीं आला ॥

बापाला आपल्या पाहून फाजल दचकला ! ॥

अफझुल्ला तवा बोलला आपल्या लेकाला ॥

"ऊठ कारटया ! काय निजलास ? ।

गोड लागतो काय रे तुला घास ? ।

नेभळट पोरटया ! झालास । गनिमानं शीर कापून टांगलं किल्यास ॥

तंवा फौज घेऊन तयार लेका ! होतास ॥

ततून मूर्खा ! पळून जाऊन राखलं जीवास ॥

मरणाला भित्र्या ! भ्यालास । चल त्याचं मुंडकं आणून टांग वेशीस" ॥

असा झाला फाजलाला भास । विसरला देहभानास ।

ताडकन उठून तलवार लावली कमरेस ॥

खदखडा दार उघडून गांठलं वेशीस ॥ वेशीच्या वरच्या वाशास ।

टांगलेलं होतं लइ दीस । रामरायाचं मुंडकं; मग त्यास ।

तलवार मारुन बोलला तंवा कवटीस ॥ "झालं सरलं आतां तुझ दीस ।

तू पड आतां धरणीस । टांगीन इथं शिव्याचं मुंडक मी खास ॥

चाल

असं म्हणून फिरला माघारा । गेला झरझरा ।

आपल्या घराला । रात्र ती झाली ती कष्टमय फार ।

सूडाचा झाला त्याचा निर्धार । ऐकावा पुढचा सारा प्रकार ॥१॥

चौक २

दुसरे दिवशीं गेला दरबाराला । बोलला आदिलशाला ।

"गप्प काय बसला ? । आला सैतान विजापूरला ।

समजावा नाश सकल झाला । त्याचा काय बंदोबस्त केला ? ॥

पाचोला जसा वार्‍याला । रान वणव्याला । दिवटी सूर्याला ।

आदिलशहा तसा शिवाजीला । झाला काय सांगा राव ! मजला ।

पाहिजे आपला विचार कळला ॥ दरबारी थोर अमीर ।

भले झुंजार । पाठवूनि चूर । शत्रुचा करा आज सरकार ।

नाहींतर आपला नाश होणार । शाहिचं चांगलं दिवस सरणार" ॥

आदिलशाह घाबरुन गेला । बोलला फाझलाला ।

"शिद्दी जोहराला । घेऊन करा तुम्ही त्याला ठार ।

नंतर करुन मोठा दरबार । थाटानं देऊ तुम्हां तलवार" ॥

चाल

फाजलखान शिद्दी जोहार झाले तय्यार ॥

मेजवान्या त्यांना थाटाच्या झाल्या घरोघर ॥

त्यानीं फौज घेतली भरपूर । दारुगोळा केला तय्यार ।

किती घोडा होता गणतिला नाहीं हो पार ॥

घोडयांना घातले अलंकार । पायात्‍नं बांधले घुंगुर ।

डोक्याला लावले पिसार । मग वरती चढले खोगीर ।

त्यावर बसले रणशूर । बडे बडे होते अमीर ।

ते सारे झाले तय्यार । हातात नंगी तलवार ।

अशी फौज चालली गनिमाला कराया ठार ॥

जंवा जातां जातां तळ देती । तवा ऐका, काय काय करिती ।

मोठमोठे डेरे लावती । गांजाचा नाद हो अती ।

अक्षि पिऊन झिंगुन जाती । मग नाचरंग चालती ।

त्यांचा थाट सांगावा किती ! त्यांना दाणा वैरण किती ।

लागे त्याला नाही गणती । गरिबांना धाक घालिती,

त्यांच्या गंज्या काढुनी नेती । नाहींतर पेटवूनी देती ।

लोकांच्या घरोघर जाती, गाइवासरें धरुनी कांपिती ।

बायकांना ओढुन नेती । त्यांचीं घरं संम्दीं धुंडिती ।

पैसा अडका लुटून नेती । मग हातीं दिवटी घेऊन आगी लावती ! ॥

जवा लोक रडाया लागती । तवा सारे ’खो खो’ हांसती ! ॥

त्यांच्या तोंडात फेंकती माती । इरसाल शिव्या मग देती ।

जर कोणी अंगावर येती । तर त्यांना दोर्‍या बांधिती ।

आधीं त्यांचीं नाकं कांपिती । लोखंडी सळ्या मग घेती ।

लाल भडक त्यांना करिती । मग डोळ्यामध्नं खुपसती ।

मग हातपाय तोडती । असे हाल करुन मारिती ।

नाहींतर सुन्ता करुन भाई बनविती ॥

चाल

मराठी राज्याची कळी । नवी उमलली ।

तिच्यावर आली । टोळांची धाड, काय होणार ।

कळेना काय काय घडणार । दैवाचे खेळ कसे हो कळणार ! ॥२॥

चौक ३

ही वार्ता कळली शिवाला । सावध झाला ।

गेला पन्हाळयाला । करुन बंदोबस्त सगळा ।

किल्ल्यावर दारुगोळा चढला । तय्यार सारा लोक झाला ॥

नुकत्याच प्रतापगडाखालीं । झालेल्या भारी ।

लाल तलवारी । पुन्हा पन्हाळगडावरती दिसल्या ।

वीरांच्या हातामध्नं रमल्या । तहानेनं व्याकुळ लइ झाल्या ॥

सूर्याच्या किरणांनीं सारे । चमकले भाले ।

तय्यार झाले । चिरण्याला कंठनाळ सगळे ।

डोक्यावर जिरे टोप चढले । हातांत धनुर्बाण आले ॥

अन्नाचा पुरवठा केला । तय्यार झाला ।

तोंड देण्याला । यवनाला मराठयांचा गोपाळ ।

यवनाला मराठयांचा भूपाळ । यवनाला हिंदधर्माचा लाल ।

यवनाला हिंददेवीचा बाळ । काळाचा काळ्याकुट्ट कळिकाळ ॥

’शिवराय पन्हाळगडावर’ । ऐकून सुभेदार ।

शिद्दी जोहार । फाजलखानासकट तिकडं वळला ।

झटकन किल्ल्याखालीं आला । किल्ल्याला त्यांचा वेढा बसला ॥

चाल

नेताजी पालकर शूर । त्यानं केलं शिद्दीला जेर ॥

परि फौज होती भरपूर । म्हणून होता शिद्दीला जोर ॥

चौक्यांचा पहारा चौफेर । चहुंकडे ठेविले हेर ॥

करि नाच नंगी तलवार । रक्ताला झाली आतुर ॥

चाल

झाले चार महिने तरी होता शिद्दी जोहार ॥

वेढा काढुन जाईना; मग केला शिवानं विचार ॥

नेताजी, बाजी रणगाजी जमविले वीर ॥

मग त्याना बोलला शिवबा जें ऐकावं सारं ॥

"किती दिवस असें हे चालणार ? । दोन वर्सं वेढा बसणार ।

एक वर्स अन्न पुरणार । मग अन्नपाणि सरणार ।

तंवा उपासमार होणार ॥ यवनांच्या पाया पडणार ।

कां आतांच कांही करणार ? ॥" मग बोलले शूर सरदार ।

"कांहीं तोड आतांच काढून व्हावं हो पार" ॥

असा त्यांचा बेत जंवा झाला । तंवा राजा शिद्दीकडं गेला ।

ऐका जी काय बोलला । "तुमचं पडलं फार भय मला ।

द्यावं जीवदान हो मला । घ्यावें पदरीं दीन लेंकराला ।

शहाचा मी अपराध केला । म्हणून आतां पश्चाताप झाला ।

देतों मी त्याच्या मुलखाला । हा किल्ला ठेवा पण मला ।

हा दास शरण तुम्हांला" । असं बोलला सुभेदाराला ।

शिद्दीला आनंद झाला । मग बोलला शिवरायाला ।

"जीव दान आतां तुला दिला । पर किल्लाप पाहिजे आम्हांला ।

तो नाहीं मिळणार तुला" । जर दादा द्यावं चित्ताला ।

सांगीन आतां तुम्हांला । शिवराय फिरुन शिद्दीला काय बोलला ॥

"सुभेदार थोर तुम्ही झाला । अन् किल्ला नाहीं म्हणता कां मला ! ।

द्यावं आतां एवढं पोराला । द्यावं एवढं वचन लेंकराला ।

आज काय तो विचार तुम्ही करा । पुन्हां उद्यां येइन भेटीला ।

तवा काय तें सांगावं मला" । असं बोलून डाव करुन किल्ल्यावर गेला ! ॥

चाल

आनंद फार तंवा झाला । शिद्दी जोहारला ।

धरुन दाढीला । बोलला "अल्ला ! डाव केला ।

काफर खास आतां धरला" । पण त्याचा कावा कायरे कळला !! ॥३॥

चौक ४

समेटाचा बहाणा असा केला । गाफिल झाला ।

पहारा, ढिला पडला । दारुला आला ऊत अनिवार ।

झिंगून गेले अमीर सरदार । खरोखर वेडा शिद्दी जोहार ॥

जो हार सिद्धिचा झाला । रामीं रत झाला ।

तो कां जोहाराला । करील राव जी ! सांगा जोहार ।

जाईल काय त्याला शिव हार । ज्याला सारी हार जाणार हार ॥

जोहार बोलला आपणाला । "यंव रे उंदराला । पिंजर्‍यांत धरला; ।

घेऊन जातों विजापूरला । पठयानंच त्याला कैद केला ।

दुसर्‍यांना डाव नाहिं जमला" ॥ फाजलखान बोलला आपणाला ।

"सूड पुरा झाला ॥ कापुन शिवाजीला । वेशीला हा मर्द मुंडकं टांगणार ।

बापाचं देणं सारं फेडणार । मोठा मग मानकरी मी होणार ! ॥

चाल

आशेचा असा डोलारा । फाजलान मनांत उभा केला ।

विसरला देहभानाला । दारुनं झिंगुन गेला ।

इकडे विचार काय मग झाला । शिवाजीनं काय बेत केला ।

ऐकावं सांगतों तुम्हाला । हेरानं आणलं खबरेला ।

लगबगीनं बोलला राजाला । "महाराज ऐका वचनाला ।

आज पहारा ढिला लई झाला । जवा गेलो होतो फिरण्याला ।

झोंप आली होती पहार्‍याला । अर्धंमुर्धं होतं जागेला ।

त्यांचें बोलणें आलं कानाला । त्यांचं म्हणणं दिसलं हो मला ।

आज गनिम हातीं लागला । कां वेर्थ घ्यावं तसदीला ? ।

अन्‍ त्रास द्यावा आपल्या जीवाला ? । लई दिवस राच्‍च जागुन वेडा जीव झाला ॥

आतां पहारा सारा झोंपला । चौकीवाला जोरसे पेंगला॥

अशी बातमी घेउन आला । हा दास आपल्या चरणाला ।

पुढचं सांगणं नाहीं ठावं मला । तें आपलें ठावं आपणाला " ।

असं बोलून बातमी देऊन हेर तो गेला ॥ शिवाजीनं काय बेत केला ।

निवडक घेतला लोकांला । अन्‌ किल्ल्याखालीं चालला ।

दादा ! किल्ला सारा उतरला । चहूंकडं काळोख झाला ।

पर कळलं नाहीं कोणाला । रात्रीला घोर लागला ।

चहूंकडं काळोख झाला । जंवा कृष्ण जन्म बघा झाला ॥

तंवा भूल पडली पहार्‍याला । टोपलींत घालुन लेंकराला ।

वसुदेव वाडयांतून आला । तरी कळलं नाहीं कोणाला ! ।

यमुनेला उतार झाला । तवां पार पलीकड गेला ।

असं लहानगं बाळ घेऊन गोकुळांत गेला ॥

थेट तश्शी भूल पहार्‍याला । बघा पडली !

एक योग झाला । म्हणून कृष्ण म्हणावं शिवाला ।

शिव कृष्णरुप हो झाला । भेदभाव नाहींसा झाला ।

चौकीवाला घोरुं लागला । सारा पहारा गारद केला ।

शिवाजी पुढं मग गेला । जितका त्याला पहारा भेटला तितका गार केला ॥

रक्ताचा पाट चालला । पर कळलं नाहीं कोणाला ।

पिंजर्‍यांतून पक्षी उडाला । करा जागं आता शिद्दीला ।

बघ म्हणावं बेरकी उंदराला । करा जागं आतां फाजलाला ।

बघ म्हणावं आतां काफराला । हातावर तुरी देऊन तुमच्या हो गेला ॥

चाल

गर्वाचं घर सदा खालीं । असं लिहिलं भाळीं ।

सत्याचा वाली । सदा प्रभुराय झाला गोपाळ ।

पार्थालाच घातली कीर्तीनें माळ । खळाचा नंद बाळ हा काळ ॥४॥

चौक ५

दोन घटका गेल्यावर झाला । मोठा गलबला ।

जो तो म्हणे "अल्ला ! । गारद केला सारा पहारा ।

रक्तानं रस्ता सारा भरला । देखो सैतान पार झाला" ॥

तंवा आला शिद्दी जोहार । रक्ताचा पूर । पाहून झाला गार ।

चित्तावर आली दुःखाची खार । राग पर त्याचा झाला अनिवार ।

म्यानांतून ओढली तलवार ॥ फाजलखान झाला बेफाम ।

सुटला त्याला घाम । जिरला सारा जोम ।

म्हणे ’क्या हुवा अल्ला ! गेला ’ ! । अल्ला काय सांगणार तुजला ? ।

त्याचा तुला कावा नाहीं रे कळला ॥ मग जोडणी केली लवकर ।

चालले हो स्वार । बारा हजार । पाठलाग केला त्यांनीं जोरदार ।

फौजेवर होते दोन सरदार । फाजल आणि सिद्दी अजीज सुभेदार ॥

चाल

पुढं धावे सूर्य, पाठीमागें केतु असुर ॥

पुढं धावे चंद्र, मागं लागला जणूं राहु चोर ॥

पुंढ धर्म, मागं अधर्म धावतो स्वैर ॥

पुढं नीति, मागं अनीतीचा लागला विचार ॥

स्वातंत्र्य पुढें, मागं लागे दास्य चिरकाल ! ॥

चाल

रात्रिनं काळोख केला । दिसेना कांहीं कोणाला ।

चांदण्यांनीं नाच बंद केला । आभाळांतुन चांद निघाला ।

शिवाच्या डोईवर आला । त्यांनीं कां हो नाच बंद केला ।

असं म्हणतां ? सांगतों तुम्हांला । शिव घोडयावरती स्वार झाला ।

अन्‌ चालला दौड विशाळगडाला । त्याच्या भाळीं चंद्र शोभला ।

पाहवेना हें दैत्य राहूला । चंद्रला आतां गिळण्याला ।

शिवामागं राहू लागला । पाहवेना त्यांना हा घाला ।

म्हणुन त्यांनीं नाच बंद केला । ढगाच्या ओढलं पडद्याला ।

अन्‌ सांगायला गेल्या सूर्याला । काय बोलल्या ऐका सूर्याला ।

"असा असा प्रकार झाला । आमचा पती पृथ्वीवर गेला ।

त्याच्यामागं राहू लागला । त्याला सोडवायला हो चला" ।

इकडं काय प्रकार झाला । ऐका जी सांगतों तुम्हांला ।

भर रात्रीं घोडा फेकला । झाले चार तास हो त्याला ।

वारा मंद वाहूं लागला । पहांटेचा सुमार झाला ।

विशाळ गड दिसूं लागला । तीन कोस किल्ला राहिला ।

आनंद झाला शिवाला । काय बोलला ऐका लोकांला ।

अंबेनं कृपा करुन तारलं आम्हांला ॥ आतां राहिलं नाहीं भय मला ।

आवाज कसला पण झाला ? । ’टप्‌ टप्‌ टप्‌’ हं ! आला ! आला !

शत्रू पाठीवर आला । चला मारा टाचा घोडयाला ।

चला गांठलं पाहिजे किल्ल्याला" । प्रसंग जीवावर आला ।

पुन्हा घोडा दौड धांवला । घोडयांना फेंस बघा आला ।

फाजलखान पाठीवर आला । जीव सारा कासाविस झाला ।

पर शिवा नाहिं बघा भ्याला ! । पुढल्या चौकी सांगिन पुढचा प्रकार जो झाला ॥

चाल

आली आणीबाणीची वेळ । युद्ध जंजाळ ।

रक्तबंबाळ । झाल्यावर कोण कोण मरणार ।

झाल्यावर काय काय घडणार । आपणाला सांगा कसं हो कळणार ? ॥५॥

चौक ६

जवां तांबडं फुटलं पूर्वेला । गनिम शिवाजीला ।

येवून तवा भिडला । परि रात्र नाहिं शिवा डरला ।

तय्यार झुंजण्याला झाला । थोरांना जीव करेकचरा ॥

त्याला नव्हतं जीवाचं भय । होता निर्भय ।

वाटलं पर भय । दुसर्‍यांना शिवा प्राणाहून प्यार ।

राज्याचा तेवढा एक आधार । अंबेच्या कंठामधला प्रिय हार ॥

देशाच्या ऐकाजी काजीं । नित्य तो राजी ।

तोच रणगाजी । बाजी प्रभु देशपांडे सरदार ।

चित्ताला होता मोठा दिलदार । शौर्याचा मूर्तिमंत अवतार ॥

चाल

पाहुन असला घोर प्रसंग बाजी पुढं झाला ॥

स्वातंत्र्यवीर रणगाजी बोलला शिवाला ॥

"महाराज ! विनवि तुम्हांला । ऐकावं माझ्या शब्दाला ।

शत्रु हा हांकेवर आला । ही खिंड भली हो मला ।

इथं राहुन धरतो शत्रुला । चार लोक धरती हजाराला ।

द्या संधी येवढी दासाला । करामत दावतों तुम्हांला ।

तवर आपण किल्ल्याकडं चला । आपणासंग घ्याव फौजेला ।

पाचपन्नास ठेवावं मला । जीव चरणीं आपल्या वाहिला ।

जंवर जीव नाहिं रणिं गेला । तवर धोका नाहीं तुम्हांला ।

फेका दौड आता घोडयला । बोलण्यांत फार वेळ गेला ।

आपण आमचा देव दुजा नाहिं देव आम्हांला" ॥

ऐकून अशा बोलला । शिवाचा गळा दाटला ॥

चाल

भर आला त्याच्या हृदयाला, पाहून प्रेमचंद्राला ॥

पाण्याचा लोट खळखळला, उसळून बाहेर आला ॥

चाल

शिवाला आला कळवळा । काय बोलला ऐका ! बाजीला ॥

चाल

"लोक काय म्हणतिल मला,

देवून तोंडाला, एका बाजीला, निष्ठुर गेला ।

कशि दया नव्हती हो त्याला ॥

जसा जीव प्यारा हा मला, तसाच तुम्हांला;

सांगूं कसं बोला, जीव देण्याला ।

आग लागो माझ्या तोंडाला ॥

शत्रूंचा वणवा पेटला, जाळत आला, जाळूं दे मला,

मरण देहाला खास, मग त्याला ।

जपणूक कशाला बोला ?" ॥

ऐकोनि राजवचनाला, बाजीला शोक बहु झाला ॥

तो वीर फिरुन शिवाला, ऐकावं काय बोलला ॥

चाल

"हा जीव प्यारा हो मला, म्हणून देहाला टाकून धरणीला, जातो स्वर्गाला ॥

द्या संधि एवढी दासाला ॥ ज्याला मृत्यु लाभला रणीं,

धर्माकारणीं, त्याची हो जनीं, धन्य ही काया । द्या संधि येवढी दासा या ॥

चाल

विजापूरचा होतों नोकर । तंवा केलं पाप मी फार ।

पण आला योग लवकर । झाली भेट विशाळगडावर ।

आपण केला सारा मोह दूर । चरणांचा घेतला आधार ।

बेईमान होतों मी फार । आज डाग धुवून काढणार ।

आपण जावं आतां लौकर " । शिवबानं केलं उत्तर ।

"तुम्हांसाठीं जातों लौकर । जवां जाईन विशाळगडावर ।

पांच तोफा सोडीन सत्वर । मग समजा झालों मी पार ।

असं म्हणून चालले शिवराय होउन स्वार ॥

चाल

मग बाजी झाला तय्यार । रोखून खिंडार ।

नंगी तलवार । हातामधिं, झाला रुद्र-अवतार ।

सांगिन जी पुढं पुढचा प्रकार । सहाव्या चौकाचा झाला आकार ॥६॥

चौक ७

शिवबांची घोडी कल्याणी । सदा जयदानी ।

घोडयांमधिं राणी । खडकाळ डोंगरामधुनी ।

तशीच मैदानी जशी काय हरणी ।

टाण् टाण् करुनि धांवतांना पाहिली यवनांनीं ।

’इस्कु पकडो’ म्हणुनि । चाल केलि त्यांनी ॥

चौफेर घोडे सुटले । खिंडींतून आले ।

बाण सळसळले । सणणणण करुन अंगीं घुसले ।

घोडे धडधडा खालती पडले । घोडेस्वार थंडगार झाले ! ॥

बाण येती कुठून समजेना । डसती घोडयांना ।

धांवत्या सांपाना । जशा काय झडपा घालती हो घार ।

झाली निम्मी फौज त्यांची थंडगार । रागाने झाले लाल सुभेदार ॥

पाठलाग तसाच करण्याला । जोरानं आला ।

फाजल खिंडीला । परि त्यानं पाहिलं बाजी प्रभुला ।

तीस जण घेऊन राहिला तोंडाला । खिंडीचा रस्ता बंद झाला ॥

जसा राम दिसला रावणाला । कृष्ण कंसाला ।

भीम कीचकाला । बाजी प्रभु तसा फाजलाला ।

दिसला पर जोर त्याला चढला । बाणांचा त्याला सुगावा लागला ॥

बाजीच्या लहानग्या टोळीला । पाहुन फाजलाला ।

हर्ष फार झाला । कां हो ? त्यांचं सैन्य होतं अनिवार ।

इकडं पांच पन्नास बाजीचे स्वार । तिकडं फाजलाचे बारा हजार ! ॥

चाल

फाजलानं केला मग हल्ला । बाजीहि तय्यार झाला ! ।

रणरंग खिंडीला आला । कवटाळी वीर मरणाला ॥

चाल

आली झुंज हातघाईवर । झुलती तलवार ।

ऐकमेकां मार । देती; धुमाकुळ झाला अनिवार ।

शत्रुवर करती जोराचे वार । जिकडं तिकडं झाला एक प्रकार ॥

किती होते मिसळले नाद । देऊ कशी याद ?

उठता पडसाद । खिंडींतून दाद नाहिं कवणा ।

तय्यार सारे वीर मरणा । ठेवील कोण त्यांची गणना ॥

चाल

कोण राम राम बोलती । देवांना हांका मारती ।

कोण धायधाय रडताती । तळमळुन देहांतून कोण प्राण सोडती ॥

कोणाची नाकं ठेंचती । डोळ्याची बुबळं लोंबती ।

छातित्‍नं भाले खुपसती । जसे मासे जळीं चमकती ।

आकाशीं विजा चमकती । तलवारी तशा लखलखती ।

रक्ताचे पाट वाहती । डोक्यांच्या कपर्‍या ऊडती ।

कोणाचे हात तूटती । बेशुद्ध कैक रक्ताच्या पाटामधिं पडती ॥

निकराचे हल्ले चढविती । ’हर हर महादेव’ असें कैक बोलती ॥

’दीन दीन’ यवन बोलती । किती अर्धमेले बरळती ।

हाणा मारा कापांचा भरला नाद हो अती ॥

शिरकमळं अंबेच्या पायीं वीर वाहती ॥

दशदिशा दणाणुन जाती । तलवारी भाले चमकती ।

एकमेकां घासुन ठिणग्या लाल निघताती ॥

वर मुंडकी उंच उडताती । जणू अंबाबाई चेंडवांचा खेळ खेळती ॥

ऐका जी त्याच वेळेला । विजयश्री आली बघण्याला ।

तिनं हातीं धरलं माळेला । ’माळ घालूं आतां कवणाला’ ।

अशि चिंता पडली हो तिला । जगदंबा बोलली मृत्यूला ।

काय ऐका सांगतों तुम्हांला । "आली विजयदेवी वरण्याला ।

अशी वर्दी द्यावी बाजीला । आणि करावा थाट चांगला" ॥
"ठीक ! करतो" मृत्यु बोलला । आणि थाट कराया लागला ।

लाल रंग खिंडीला दिला । रक्तांचा सडा घातला ।

धडांचा कारंजा केला । मांसाचा गालिचा केला ।

हाडकांच्या नक्षी काढल्या । दातांच्या कवळ्या पसरल्या ।

मुंडक्यांच्या केल्या त्यानं माळा । अंबेची वर्दी बाजीला ।

जंवा कळली चेव तंवा आला । जसा वारा उडवी भुश्श्याला ।

तसा बाजी उडवी शत्रुला ॥ रक्ताच्या धारा अंगाला ।

त्याच्या लागल्या, नाहीं पर भ्याला ! । जसा पळस प्रफुल्लित झाला ! ।

त्यानं केलं जेर यवनाला । पर ताजी फौज मदतीला ।

फाजलाच्या आली जोर झाला । म्हणून पुन्हां आला बाजीवर हल्ला ॥

चाल

विजापुरचं आलं पायदळ । फिरुन परतलं ।

सारं घोडदळ । निकराचा हल्ला केला त्यांनीं फार ।

बाजी पर होता मोठा बाणेदार । हल्ला हटवायला झाला तय्यार ॥७॥

चौक ८

आयुष्य सरतं घडोघडीं । काळाजी उडी ।

आल्यावर मढी । पडती; कुडी खास एकदां पडणार ।

पळभर उशीर नाहिं खपणार । जर मरण खास तर प्राण्या !

कसा मरणार ? । जो मर्द मानव झाला । सोडी जीवाला ।

रणांगणिं; त्याला कीर्ति वरणार ॥ पुन्हां चढला बाजीला जोर ।

दिलाय त्यानं मार । केला थंडगार । यवन; तवा झाली होती दोन पार ।

भूमिला झाला मुडद्यांचा भार । अंगावर चालले होते तरी वार ।

जरि झाला शत्रुचा मोड । वाटेना तो गोड । काय अवघड ।

बाजीला झालं सांगतों तुम्हांला ॥ त्यानं पहिला मान फिरवून ।

किल्ला निरखून । नाहीं पर खूण दिसली हो त्याला ! ॥

तोफांचा जाळ दिसेना । म्हणून यातना । होत बघ नाना ।

वाटल त्याला झाला नाश कार्याचा । ज्यासाठीं देह खर्चिला ।

तोंच नाहीं झाला । पार मनीं लागला । घोर----शिवाचा ! ॥

ऐका हा नाद----झाला । कसला हो बोला ।

गोळीबार झाला ! । हाय गोळा आला । लागला वीराला ।

धाडकन पडला भूवर । बाजी रणवीर । जसा काय थोर वृक्ष उन्मळला ॥

चाल

’बाजी पडला ? हाय ! घात झाला’ शब्द हे झाले रणांगणावर ।

त्यानं खचला मावळ्यांचा धीर ।

जिकडं फुटली वाट तिकडं चालले सारे चौफेर ॥

जंवा पाहिलं बाजिन सारं । तंवा बोलला त्यांना रणवीर ।

"मेलों नाहिं मी, फिरा माघार । आणि चढवा हल्ला जोरदार ।

जर मराल स्वर्गाला जाल । जर जगाल सौख्य भोगाल !

जर पळाल, तर नरकाला जाल !! " ॥

चाल

ऐकून अशा शब्दाला, पुन्हां सारा उलटला भाला ॥

निकराचा केला मग हल्ला, हैराण शत्रु हो झाला ॥

मरणाचा विळखा बाजीला, हाय बसला कासाविस झाला ! ॥

चाल

त्याचं लक्ष होतं परि खिळलं विशाळगडावर ॥

बाजी पडला आतां मरणाच्या शय्येवर ॥

जणु भीष्म पहुडला रणीं रणशय्येवर ॥

जगदंबा आणि विजयश्री आल्या लौकर ॥

हातांत माळ घेऊन झाल्या तय्यार ॥

माळ घातली बाजीला, झालं दुःख परि फार ॥

त्याचि दृष्टि होती खिळलेली विशाळगडावर ॥

तोफांचा नाद कुठं गेला ? । बाजीचा गळा दाटला ।

बाजीला घोर लागला । जीव धरुन राहिला आशेला ॥

बाजीचा सरता काळ आला । कुठं गुंतली आस मग बोला ?

जंवर शिवबा पार नाहीं झाला । तंवर आशा राहिली जीवाला ॥

चाल

धूमधडाधडा धड-धडा । धडाडा ! असा तोफांचा नाद कानीं पडला ।

"झालों देवा धन्य !" बाजी बोलला । देहातुन जीव पार झाला ! ॥

धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार । धन्य तो शूर ।

धर्माच्या कामीं जो जो मरणार । त्याचा जयनाद जो जो होणार ।

शाहीर ’पांडुरंग’ गाणार ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to पोवाडे शिवाजी महाराज


सेना महाराज
संत अमृतराय महाराज
संत कान्होबा महाराजांचे अभंग
Shri Shivrai by Sane Guruji
पोवाडा 2
संत तुकडोजी महाराज
पोवाडा
बाजी प्रभू देशपांडे
श्री एकनाथ महाराज हरिपाठ
गजानन महाराज