चौक १

दिल्लीपती बहु भ्याला ऐकुनी शिवाजीचा क्षत्रिय बाणा ।

बंड मोडाया पुंड धाडावा असा कोण रणपटु शाहाणा ॥ध्रु०॥

मामा शाहिस्ता म्हणे हम है तो शिवाजीकी क्या खातर जमा ।

रणांत लोळविन गर्दिस मिळविन तरिच घालिन पायजमा ॥

निवडक घोडा लाख शिपाई थोडी फौज द्या करुनी जमा ।

राज्य खालसा करीन साहसा असा माझा पहा तुर्जमा ॥

आटोकाट लष्कर अफाट घेऊनी खासा लवाजमा ।

विडा उचलुनी आला फांफडा डंका वाजवी लेहेजिमा ॥

चाल

सातशे हत्ती पुढे धाडी । पांच हजार उंट आघाडी ॥

तीन हजार बैलाची गाडी । दोन हजार छकडयाला घोडी ॥

दारु गोळा तोफखाना जाडी । बत्तीस कोटी खजीना काढी ॥

चाल दुसरी

या परि अफाट फौज आला उडवित ।

जिथे मुक्काम पडे तिथें लोक उर बडवित ।

दोन गांवें लांब दीड गांव जमिन आडवित ।

तीन महिने लागले दर्‍या डोंगर तुडवित ।

सारी फौज आणविली पुण्याजवळ भिडवित ।

किल्ल्यामागून फिरंगोजी नरसाळा नाइक गड लढवित ॥

मोडते

दोन महिन्यानें किल्ला मिळाला परंतु मेली बहु सेना ।

पुढें लढाई कशी करावी विचार पडला त्या खाना ॥१॥

चौक २

पाहून प्रसंग जसवंतसिंग बादशहानें मदतीस दिला ।

घालुनी पुण्याला वेढा धुतले हत्ती घोडे मुळा मुठा नदीला ॥

लाल महालामध्यें खुशाल जाउनी शाहिस्त्यानें तळ दिला ।

ठीक ठिकाणीं चौक्या ठेवूनी नाहीं मराठा फिरकूं दिला ॥

इकडे महाराज सिंहगडावरी पुसे विचार प्रतिनिधीला ।

कोण्या रीतीनें युद्ध करावें सरदार आणिले मसलतिला ॥

चाल

आला विडा उचलुनी खान । त्याचें फार दिसे अवसान ॥

बंद करुन रसद सामान ॥ आडचणींत धरावा जाण ॥

छापे घालून करावा हैराण । उडवावी दाणादाण ॥

चाल दुसरी

गेले विचारांत महाराज गुंग होऊन ।

बोलली भवानी स्वप्नीं मग येऊन ।

माझ्या बाळा शिवबा नको जाऊ भीऊन ।

जसा अफझुल वधिला रणीं साह्य होऊन, ।

त्यापरि दुष्टाला शासन मी देऊन ।

तुझ्या हातें धाडिते वचन ठेवि लीहून ।

महाराज देविचा अभय वर पाहुन ।

हर्षलें अंतरीं शकुन गांठ देऊन ॥

मोडते

खान घाताचा विचार करतां युक्ति चालवीतसे नाना ।

अजब युक्ति एक अतर्क्य सुचली भवनीची ही कृपा म्हणा ॥२॥

चौक ३

लाल महालांतुनी शिवाजीला एक पत्र धाडिलें खानानें ।

मर्कटासम तू करसी बंडाळी गडाच्या आश्रय स्थानानें ॥

रणीं मी पहा इंद्र मजपुढें का न येसी अवसानानें ।

डोंगरांत किती पळशी दडशी किती वदसी अभिमानानें ॥

शिवाजीनें दिले उत्तर तुजसम गर्व केला दशवदनानें ।

त्याला कसे माकडांनीं जिंकिले व्यर्थ फुगू नको गर्वानें ॥

चाल

मग युक्ती करुन मजेदार । वश केले हिंदु शिलेदार ॥

छावणींत लग्न टुमदार । वरातीचा ठरविला बहार ॥

सैन्य घेऊन दीड हजार । आले आपण पुण्याबाहेर ॥

चाल दुसरी

कात्रजच्या घाटांत युक्ति ठरविली बरी ।

ठेवून दिले तिथें दहा वीस कर्णे करी ।

ठाइ ठाइ झाडाला पोत बांधुन सत्वरीं ।

दहा वीस बैलांच्या शिंगालाही त्यापरी ।

फत्ते होतां कर्ण्याची किन्नरी झाल्यावरी ।

हे पोत पेटवुनी जावें तुम्ही लौकरी ।

येसाजी तानाजी पंचवीस गडी बरोबरी ।

शिवाजीनें शिरस्त्राण मंदिल वर भरजरी ।

चिलखत घालूनी झगा चढविला वरी ।

येका हातांत वाघनख तलवार दुसर्‍या करीं ॥

मोडते

मिरवणुकींतून आंत सरकले मध्य रात्रीच्या अवसाना ।

जिकडे तिकडे सामसुम रात्र चाहुल नाहीं कळली कुणा ॥३॥

चौक ४

लाल बागेच्या डेर्‍यांत जाउन तलवारीचा दिला रट्टा ।

आवाज ऐकुन सून खानाची पाहुन कांपे लटलटां ॥

खान हाच काय म्हणून पुसतां ती म्हणे त्याचा हा बेटा ।

कुठें शाहिस्ता सांग ओरडशील तरि मरशिल हा पहा पटा ॥

तिनें दावितां खान फिरविला तलवारीचा हात उलटा ।

त्याची बायको जागी होउनी करी विनंती शब्द मिठा ॥

चाल

जीवादान मागते येक । धर्माची समजा लेक ॥

मर्दासी नव्हे हें ठीक । देव साह्य करील आधीक ॥

आली दया केला विवेक । याला समरीं दाखवूं फेक ॥

चाल दुसरी

जीवदान देतो परी नका करुं गलबला ।

मज पोचवाया तुम्ही गोटाबाहेर चला ।

वाघनखं लाविली मग त्याच्या पोटाला ।

बायकोसहित त्याला वेशीबाहेर आणिला ।

जो शिवाजी तो तरी मीच पहा चांगला ।

तुज रणीं वधाया उशिर नाहीं रे मला ।

जीव नको असेल तर फिरुन पहा मासला ।

असें बोलून त्याचा हात हातीं घेतला ।

दोन बोटें छाटुनी मग सोडुनी दिला ॥

मोडते

जाऊन मिळाला आपुल्या लोकाला मग फुंकिला जय कर्णा ।

मागें खानानें शंख ठोकिला गनिम गया अबी क्या करना ॥४॥

चौक ५

संकेतापरी कात्रज घाटांत पोत लोकांनीं पाजळले ॥

शिंग कर्णे वाजवून एकंदर शीघ्र गडावरी उधळले ॥

इकडे खानाची फौज भयभित गडबड ऐकोनी खळबळले ।

हत्यारबंद होउनी शिपाई घाटाकडे अवघे वळले ॥

घाटावरती दिवटया झाडाला यवन पाहूनी जळफळले ।

बडा हार्दम शिवाजी बेटा तोबा तोबा आम्हा नाहीं कळलें ॥

चाल

मग दिला गडाला वेढा । आणा पकडुनी म्हणे शिव धेडा ॥

दम धरुनी शिवाजीनें थोडा । मारक्यांत येऊं दिला घोडा ॥

मग म्हणे तोफखाना सोडा । शत्रूची टाळकी फोडा ॥

चाल दुसरी

सरबत्ती तोफांची किल्ल्यावरुन झडविली ।

मोंगल सैन्याची दाणादाण उडविली ।

चराचरा कापुनी समूळ नदींत बुडविली ।

खान ऐकुनि म्याला मग छाती बडविली ।

आतां युद्ध नको म्हणे पुरी नरद नडविली ।

तात्काळ उठुनी दिल्लीची वाट मढविली ।

जीवावरचें बोटावर गेलें खूप लढविली ॥

मोडते

खान दिल्लीकडे पळुन गेला रडत रडत केविलवाणा ।

रामचंद्र म्हणे पुढें येईल जयपूरचा जयसिंग राणा ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel