शिव छत्रपतीची कीर्ती । गाऊ दिनराती ।

येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥

बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा पाया घातला ।

मावळा जमविला । धन्य जगिं झाला ! ! ॥ध्रु०॥

चौक १

एके दिशीं शहाजी शिवबाला । बोलला, "चल बाळा । जाऊ दरबाराला ॥

जाऊ चल बादशाच्या भेटीला । थाटमाट मोठा बघ बाळा ! ।

बघुन होईल थंड तुझा डोळा । म्हणून ठरविला । बेत या वेळा" ॥

"चला, बाबा !" बाळ बोलला । पोशाख केला । गेला दरबाराला ।

पाहिला बादशहाचा मोठा दरबार । बसले होते कैक अमीर सरदार ।

शाहाचा होता मोठा परिवार ! ॥ हत्तींच्या सोंडांनी भले । कारंजे केले ।

तुषार उडविले । इंद्रधनुष्यांनीं कमान जिथं केली ! ।

अशी शोभा जिथं रंगली । आस भंगली । तिथंच, बघा आली ।

शिउला ओकारी !! ॥ सोन्याच्या फुलांचा सडा । कुबरे जिथं खडा ।

वाद्य झडझडा । झडति जिथं रंग आला नाचाला । जिथं प्राणीमात्र रंगला ।

तिथं शिवबाला कसा वीट आला । ठावं कोणाला !! ॥ तंव शहाजी बोले शहाला ।

"शिवबाळ आला । आपल्या भेटीला । कर रे बाळा ! कुर्निसात मानाचा । हा घ्यावा मुजरा

चाल

पोराचा । बंदा हुकमाचा । मुलगा हा आमुचा" ॥

शिवबाळ बोलला बापाला । "नमावं देवाला ।

नमावं तुम्हांला । नमणार नाहीं कधीं पण याला ।

अपमान झाला । राग मज आला ! ॥

हा ’बंदा’ नाहीं शाहाचा । बंदा रामाचा ।

पठया मानाचा । नमणार मान नाहीं कधीं याला ॥

राहवेना बाबा ! हो मला । जातो मी घरा । आतां या वेळा " ! ॥

चाल

असं म्हणून दरबारात्‍नं बाळ थेट चालला ! ॥

जसा छावा सिंहाचा नाहीं ठाव भीतिला ! ॥

रस्त्यानं त्याअ वेळेला । एक ब्राह्मण नेई गाईला ।

तिचं वासरुं होतं पाठीला । येक खाटिक सुरा घेऊन मागं लागला ॥

’जब करतो गाय’ बोलला । पाणी गाईच्या हो डोळ्याला ।

झाली कावरीबावरी त्या वेळा । हंबरडा फोडूं लागली, लागली कांपायाला !! ॥

हजारों लोक बाजूला । पर बघा कोण पुढं आला ? । शिवबाळ वेगानं आला ।

अन् खाटकाचा हात उडविला । सारा लोक थक्क जाहला ! ।

कुजबुजती एकमेकाला । "आतां काय होईल ठाव देवा ! कोणाला" !! ।

शिवबाळ घरीं परतला । पर् त्याचा निर्धार झाला ।

"हिंदवीराज्य" करण्याचा हिय्या घेतला !! ॥१॥

चौक २

हिंदवी राज्य करण्याला । पुणें प्रान्ताला ।

शिवबाळ गेला । मावळीं बारा आणलीं सारीं कबजाला ॥

ध्रुवबाळ याच्या जोडीला । एकटा शोभला । निश्चय केला ! ॥

मावळ्यांची दुःखं ओळखून । द्रव्य देऊन । समाधान करुन ।

जोडली मनं त्यांचीं आपल्या कार्याला ॥ जशीं वानरं रामचंद्राला ।

यादव कृष्णाला । तसा मावळा झाला । शिवबाळाला ! ॥

चाल

नरस प्रभु रोहिला खोर्‍याचे । देशपांडे होते त्या वेळा ॥

दादाजी मुलगा हो त्यांचा । दिलदार चित्ताचा झाला ॥

नरस प्रभु ऐंशी वर्साचा । पर सुरकुती नव्हती गालाला ॥

मिश कल्ले पांढरे जरी झाले । तरी लाली होती डोळ्याला ॥

दांत किती घट्ट हो सांगू ? । जणू वज्रपंक्ति तोंडाला ! ॥

हरबरे घट्ट मुलखाचे । करि चूर एका दणक्याला ! ॥

धार्मिक मोठया भक्तीचा । नित्य पूजी रोहिडेशाला ।

चाल

पर विजापुरचा अंकीत ॥ नरस प्रभु होता ॥

वसूल जमा देत ॥ रोहिडया खोर्‍याचा यवनी राजाला ! ॥

चाल

एके दिवशीं दृष्टादृष्ट झाली । नरस प्रभु आणि शिवबाची ।

दृष्टिला दृष्टि ती भिडली । गांठ पडली जीवाशिवांची ॥

चाल

मग बाळ चौदा वर्साच बोले नरसाला ॥

"होतो विजापूर गांवाला । खाटीक कांपी गाईला ।

मी उडवलं त्याच्या हाताला । भवानी आली सप्नाला ।

रोहिडेश आला सप्नाला । अन् मला बोलूं लागला ।

’रे बाळा ! येऊं दे चढती दौलत तुला ! ॥

तू राख गायधर्माला । सारा मावळा येईल धांवून तुझ्या मदतीला ॥

कर बाळा ! आपल्या राज्याला, । असा दृष्टांत हो जाहला ! ॥

आतां राखा लाज पोराची यावं मदतीला" ॥

नरस प्रभु आणि दादाजी देती वचनाला ! ॥

चाल

नरसाजी आणि दादाजी । मोठे रणगाजी ।

जोडले निज कापी । झाला आरंभ मोठया कार्याला ।

शिवसांब सहाय हो ज्याला । अडथळा त्याला । कसला नाहीं झाला ! ॥२॥

चौक ३

रोहिडयाच्या डोंगरावर । जमले रणवीर ।

करण्या निर्धार । बेडी आर्यांची दूर करण्याला ॥

धन्य धन्य दिवस तो झाला । धन्य तो मेळा ! ।

अजरामर झाला ! ॥ गुरु कोंडदेव दादाजी ।

बाल शिवाजी । नरस, दादाजी । मावळे जमविले कैक त्या वेळा ।

सांबाच्या देवळामधीं । आणिल काय विधी ! ।

वेळ तशी कधीं । सुदिन तो झाला ! ॥

रोहिडेश सांब साक्षिला । ठेवून त्या वेळा ।

मध्यरात्रीला । बोलला शिवबाळ सार्‍या लोकांला ॥

"का जमलों आपण या वेळा । आज या स्थळा । सांगतो तुम्हांला ! ॥

चाल

घरदार लुटलं संपूर्ण । हैराण झालों जुलमानं ॥

हरघडी गाईची मान ॥ किती तुटती नाहीं त्या मान ! ॥

जर राखल नाहीं घरदारा । धिःकार आमच्या जगण्याला ! ॥

जर राखलं नाहीं गाईला । थू ! थू !! रे आमच्या जगण्याला !! ।

हिंदवी राज्य करण्याचा । आज आम्ही निश्चय केला ॥

चाल

काय भिताय आपल्या मरणाला ! ।

आज नाहीं उद्यां तर घाव मरणाचा आला ! ॥

नर्कांतले किडे नर्कात करती मौजेला ! ॥

काय तुम्ही तसले हो झाला ? । छे !

माणूस म्हणती तुम्हांला । म्हणून सांबाच्या शिवा पिंडीला ।

अन्‌ घ्यावं आतां शपथेला ।" असं शिवाजी हो बोलला ।

रोहिडयाच्या डोंगरानं, पुन्हां पुन्हां तोच बोल त्यांना सांगितला !! ॥

सांबाच्या पिंडीच्या भोंवती जमला मावळा । अन् पिंडीवरती ठेवलं हाताला ।

अन्‌तिथं घेतलं शपथेला !! ॥ धन्य ! धन्य ! दिवस तो ! धन्य रोहिडा झाला !! ॥३॥

चौक ४

देवळांत जमलेले लोक । होते कित्येक ।

त्यांत पर एक । होता स्वजनांचा घात करणारा ! ॥

जणू फुलं फुलली हो छान । दरवळलं वासाचं रान ।

पर लपला आंत दुष्मान । भुजंगम काळा ॥

जणुं राजहंसाचा मेळा । रोहिडयावर जमला ।

एक पर बगळा । त्यांत होता ठाव नाहीं कोणाला !! ॥

सापाचा विळखा चंदनाला । टोळ हिरव्या हिरव्या पानाला ।

वरी वरी दिसतो एकरंग । भिन्न अंतरंग । नित्य पर संग दोघांचा झाला !! ॥

नांव त्याचं होतं बाळाजी । सासरा नरसाजी । मेहुणा दादाजी ।

ज्याचा, तो हा झाला काळ देशाला । त्यानं लिहिला खलिता शहाला ।

कां "बंडाचा झेंडा उभा झाला । शिवाजीनें नरस वश केला ।

कितिक मावळा । झेंडयाखालीं जमला ! ॥

रोहिडयाच्या डोंगरावर । ऐका, सरकार ! ।

असला हा घोर । काल रात्रीला बेत हो झाला !!" ॥

फितुरीचा संचार झाला । तिनं त्याला खिळखिळा केला ।

अभिमान गेला । घातकी बनला ! ॥

चाल

फितुरानें देश किती मिळाले हो मातीला ॥

किती पापी चांडाळ गेले घोर नरकाला ! ॥

नखं दीड वीत बोटाला । लाली लालबुंद डोळ्याला ।

ते सुळके दांत तोंडाला । दीड हात जीभ टाळ्याला ।

रक्ताचा टिळा डोक्याला । हाडकांचा सांगाडा-असा आकार झाला !! ॥

जिथं जिथं गेली तिथं तिथं नाश तिनं केला ॥

रायगडच्या किल्ल्यावर गेली, माचा कोसळला ! ॥

झांशीच्या बुरुजावर गेली, बुरुज ढांसळला ! ॥

फितुरीच्या जळवा देशाला । सारं रक्त खाऊन देश निस्त्राण केला !! ॥

असो ! आतां ऐका गोष्टीला । असं पत्र धाडलं शाहाला । अन्‌ बाळाजी घरीं परतला ।

मग बोलला काय बायकोला । सांगीन दादांनो ! आतां पुढच्या चौकाला ॥४॥

चौक ५

बाळाजी गेले बायकोला । "ऐक गडे ! बोला ॥

उदयकाळ आला । झाले गेले हाल गरीबीचे ।

मान येतील सुभेदारीचे । सोन्यामोत्यानं ग फुलवीन ।

असा योग छान । आला या काळा ॥

शिवाजीचा नाद लागला । तुझ्या ग बापाला ।

तुझ्या भावाला । मावळा जमविला ।

बेत त्यांनीं केला ! ॥ रोहिडेश सांब साक्षिला ।

बंडाचा झेंडा उभा केला । आर्याचं राज्य स्थापावं ।

शिवानं बोलावं । थेरडयानं ऐकावं । चाळा असा केला !! ॥

चाल

साठी बुद्धि नाठी ! हे बोल !

खरे झाले ! गेला ग तोल ।

आतां दरी दुःखाची खोल ! ॥

शिवाजीनं पुंडावा केला ।

नरस प्रभु सामीलहि झाला ।

खलिता मी शाहाला असा लिहिला ! ।

चाल

आतां बादशाहा खूष होईल । बढती देईल ।

सुभेदार करील । खास ग मजला ।

मग हिर्‍यामाणकानं फुलवीन । सोन्यामोत्यानं ग नटवीन ।

उमलेल हृदयाचं पान । असा योग छान ।

आला या काळा" ॥ ऐकून पतीचे बोल । सतीला खोल ।

मंचकीं घोळ दुःखाचा झाला ! ॥ कीं चवताळली वाघीण ।

काय फणफणली नागीण । पतीस पाहून ।

बोलली बोला ॥ "कधीं नाहीं उलट बोललं ।

वचन मोडलं । दुःख नाहीं दिलं कोणत्या वेळा ।

बाई ! केलं केवढं हें पाप । माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥

चाल

राहवेना आतां हो मजला । ऐकावं चार शब्दाला ।

बायकोचा शब्द जरी झाला । तरि हळू चित्तावर झेला ॥

चाल

लागला डाग वंशाला । डाग नांवाला ।

डाग अंगाला । बाई ! केलं केवढं हें पाप ।

माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥

चाल

कां जळली नाहीं लेखणी पत्र लिहितांना ॥

कां झडला नाहीं हो हात पत्र लिहितांना ! ॥

कां झडली नाहीं हो जीभ असं वदतांना ! ॥

म्हणतील ’फितूर’ तुम्हाला । घात देशाला ।

द्यात कीर्तीला । खास हा आर्या ॥

बाई ! मला वाटते लाज । अशांची आज ।

झाले मी भार्या !! ॥ यवनांनीं धूमाकूळ केला ।

भीती साध्वीला । भीती गाईला । फांस कंठाला ! ॥

देवतांच्या मूर्ति भंगल्या । अशा त्यांच्या लीला चालल्या ।

जो झटे मुक्त करण्याला । अशा जीवाला ।

दीन दुबळ्याला । त्याच शिवबाला । वैरी तुम्ही झाला ॥

चाल

आग लागो सोन्यामोत्याला । आणि असल्या उसन्या भोगाला" ।

चाल

पर रुचला नाहीं बोला त्याला । लालेलाल झाला ! ।

म्हणे बायकोला । "हट्‌ गे वेडे ! सांगूं नको कांहीं मजला ॥

नवर्‍याची लाज नाहीं तुला । आंवर जीभेला ।

लहान तोंडाला । मोठा घांस झाला !! " ॥५॥

चौक ६ वा

बादशाह खलिता वाचून । झाला रागानं ।

लाल, मग त्यानं । पाठवलं पत्र नरस प्रभुजीला ।

"तुम्ही घोर अपराध केला । शिवाजीच्या नादिं लागला ।

रोहिडयाच्या डोंगरावर । झाला विचार ।

आमचा कारभार । हाणुन पाडण्याला ! ॥

शिवाजी टवाळ एक पोर । तुम्ही पर थोर ।

विचार हा घोर । सुचला तुम्हाला कसा समजेना ।

होतील यातना नाना । बंडखोरांना ।

पाजी हरामांना । तुमच्या सारख्यांना ॥

या शरण आठ दिवसांत । मावळ्या सहित ।

नाहींतर घात । खास हो करिन तुमच्या जीवाला ।

करवून जप्त जहागीर । बेचिराख करिन घरदार ।

उडवीन तुमचं मग शीर, । यावं भेटीला" ॥

चाल

शहाच्या वाचलं पत्राला । नरस प्रभू घाबरुन गेला ! ॥

हाय खाल्ली त्याच वेळेला । पूजितो रोहिडेशाला ॥

अनुष्ठान करित सांबाला । सात दिवस उपास केला ॥

चाल

दादाजी प्रभु तंवा बोलला आपल्या बापाला ॥

"बाबा ! द्यावा धीर चित्ताला । कुणासाठीं करतां चिंतेला ? ॥

दोन दिवस जगणं तुम्हांला । मग कोणच्या करता चिंतेला ? ।

जहागीर राहावी पोराला । म्हणून करतां काय काळजीला ? ।

पर हा देह दिला धर्माला । जहागीर गेली तरी फिकीर नाहीं हो मला ! ॥

रोहिडेश वाली आम्हांला । तो दूर करील दुरिताला ।

असं बाबा ! असल्या प्रसंगीं वाटतंय मला" ॥

चाल

पर कशी बातमी कळली शाहाला । कळेना हो त्याला ।

वैरी कोण झाला । लागली चिंता हीच दादाला ॥

रोहिडेश सहाय हो त्याला । आला मदतीला । देव वश झाला ! ॥६॥

चोक ७

ती बातमी कळली शिवबाला । बाळ जरी झाला ।

धीर त्यानं केला । पत्र मग धाडलं नरस प्रभुजीला ।

काय चौदा वर्साच पोर । देई पर धीर ।

थोरामोठयाला ! ॥ "शाहाचा राग फार झाला ।

आपल्यावर आला । दुःखाचा घाला । कळली ही वार्ता आज आम्हांला ॥

रोहिडेश सांब मदतीला । सोडुं नका आपल्या धीराला ।

भार देवाला । भक्ताचा झाला ॥ ज्यानं दिलं सहाय्य ध्रुव बाळा ।

अंबरीषाला । पंडुकुमारांला । राखील तोच देव आम्हांला ! ॥

हिंदवी राज्य करण्याला । पुढं जो झाला ।

त्याच्या मदतीला । देव हो आला !!

चाल

नरसाजी ! आणि एक बोल । ऐकावा सांगतों तुम्हांला ॥

देहाची करुन हो ढाल । राखीन आधीं तुम्हांला ॥

देहाची करुनियां भिंत । आड करिन तुमच्या जीवाला ॥

माझ्या रक्ताचा हो कारंजा । भिजवील आधीं तुम्हांला ॥

माझ्या लालबुंद डोक्यानं । पूजीन तुमच्या पायांला ॥

पंच प्राणांच्या हो ज्योतीनं । ओंवाळीन आधीं तुम्हांला ॥

ही खूण द्यावी हृदयाला । लक्षांत ठेवा या बोला ।

चाल

जंवर माझा नाहीं जीव गेला ।

तंवर धक्का नाहीं कसला तो तुमच्या जीवाला ! ॥

लौकरच आतां मी येईन तुमच्या भेटिला" ॥

असं पत्र धाडलं नरसाला । इकडं काय प्रकार झाला ।

नरस प्रभू अनुष्ठान करित होते सांबाला ॥

पूजा बांधली रोहिडेशाला । गंधाचा वास पसरला ।

धूप देवाला हो घातला । इतक्यांत पत्र घेऊन एक जण आला ॥

त्यानं दिलं पत्र नरसाला । नरसप्रभू वाची पत्राला ।

शिवाजीचं पत्र पाहून नरस गहिंवरला ! ॥

"म्हणे, धन्य ! धन्य ! शिवबाळ आलं जन्माला !! ॥

अजून मिसरुड फुटलं नाहीं त्याला ! ॥

पद देतो धीर आम्हांला " ! असं बोलला आपलं आपणाला ।

मग डोळे घट्ट झांकून । करित ध्यानाला ! ॥

एकाग्र चित्तानं झाला । मग काय चमत्कार पाहिला ।

ऐकावं सांगतों तुम्हांला । पिंडित्‍नं त्याच वेळेला ।

’घुम्‌म्’ असा आवाज झाला ! ॥ दुभंगली पिंडी ते वेळा ।

अन् शिवाजीचं रुप घेऊन सांब प्रगटला ! ॥ असा चमत्कार पाहिला ।

मग डोळे उघडून पाहिलं बाहेर त्या वेळा ॥ शिवबाळ त्याला दिसला ! ।

आला नंदीचा हो कंटाळा । म्हणुन घोडयावर बसून जणु काय सांब भेटिला आला ! ॥

बघा इकडं दुसर्‍या बाजूला । हा कोण त्याच वेळीं आला ।

दादाजी पुढच्या बाजूला । अन्‌ बाळाजी मागच्या बाजूला ।

दादानं त्याला कैदा केला ! । पुढं काय प्रकार झाला । सांगीन पुढच्या चौकाला ॥७॥

चौक ८

दादाजी बोले शिवबाला । "वैरी हा झाला ।

बादशाहाला । बेत कळविला यानं हो सारा ।

म्हणून कैद केलं मी याला । आणि आणलं आज या वेळा ।

आतां हातीं घ्यावी तलवार । उडवावं शीर ।

देहाचा चूर । करुन बळि द्यावा ।

घारीगिधाडाला !! ॥ इवितिवी नाश होणार ।

आमचा खरोखर । करा परि ठार ।

दुष्ट हा आधीं घात करणारा । देहान्त प्रायश्चित्त याला ।

अशा पातक्याला योग्य या काळा ॥ बहिणीचा माझ्या पति जरी ।

असे हा तरी । पाप जो करी । दया माया कधीं दाऊं नये याला ॥

आज साप आम्हां चावला । उद्या डसेल कितिक दुसर्‍याला ॥

’आईबाप भाऊ सोयरे । कांटे जर झाले ।

उचलावे सारे’ । धर्म हें वदला "।

चाल

दादाचा सल्ला आवडेना बाळ शिवबाला ॥

मग बाळाजीला बोलला । "बाळाजी ! ऐका शब्दाला ।

कठिण काळ आला । धर्म गांजियला ।

फांस कंठाला ॥ निशिदिनीं लागला घोर भरतखंडाला ! ॥

गाय हंबरती हरघडी । रडती बापडी ॥

सुरी पर खडी । मानेवर आली ! ।

झाली मान धडावेगळी ! । जीभ लांब बघा लोंबली ! ।

बघा चालल्या गुळण्या रक्ताच्या जीवा अंतरली !! ॥

जर नसे रुचत हा बोल । घ्या ही तलवार ।

उडवा हें शीर । आधीं या वेळा । मग सुभेदार होऊन भोगा सोहळा !" ।

चाल

उपरति झाली चित्ताला । बाळाजीपंत गहिंवरला ॥

मिठी मारली घट्ट शिवबाला । पाण्याचा पूर डोळ्याला ॥

मग काय बोलला शिवबाला । "अर्पिला जीव चरणाला ॥

जरी दिलं इंद्रपद मजला । तरी नाहीं शिवणार त्याला ! ॥

आपल्या चरणाचा मी पायपोस । काय काम सांगावं मजला" ।

असा सारा प्रकार झाला ।

चाल

पुढं तोरणा किल्ला घेऊन । बाळाजीरावानं ।

बांधलं तोरण । हिंदवी-स्वराज्याचं त्या वेळा ॥

’पांडुरंग’

शाहीर झाला ॥ कीर्ति गाण्याला । आज या वेळा ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel