२६. सुटका
रामदासकडे मायेकडून जेवण जात असे. प्रथम ती स्वतः नेऊन देत असे. रामदासजवळ कुशलावार्ता बोलू शकत असे. परंतु पुढे ते बदलले. माया रामदासच दृष्टीस पडू शकत नसे. शिपाई पुढे येई व डबा घेऊन नेऊन देई. माया बाहेर बसे. प्रद्योतसंबंधीची वार्ता रामदासला कळली नाही, 'वकील वगैरे काही नको', पुढे पाहू' रामदास म्हणे.
आंनदमोहन अलीकडे धनगावातलच होते. त्यांनी रमेशबाबू व अक्षयकुमार यांना निघून येण्याविषयी लिहीले. त्यांचे मायेला 'येत आहोत,' असे पत्र आले. दयाराम सोनखेडीहून आला होता. रमेशबाबूंशी त्याचा परिचय होता. मायेच्या विवाहाच्या वेळचा परिचय, दयाराम स्टेशनवर गेला. त्याने दोघांना मायेच्या खोलीत आणले. मायेला रडू आले. रमेशबाबूंनी तिला शांत केले. मायेने प्रद्योतची सर्व हकीगत घरी कळविलीच होती. आनंदमोहन यांनी प्रद्योत व माया यांची बोलणी, प्रद्योतच परिवर्तन सर्व काही बाहेरून पाहिले होते. त्यांनीही साद्यंत वृत्त अक्षयबाबूंस लिहिले होते. शेवटी सारे चांगले होईल असे भविष्य कळविले होते.
''माया, प्रद्योतला शेवटी तू मुक्त केलंस. वेडेपणातून मुक्त केलंस. आमचे उपाय हरले होते. परंतु तुझी पुण्याई उपयोगी पडली.'' अक्षयबाबू म्हणाले.
''माझी पुण्याई नाही अक्षयकाका. ही तुमची पुण्याई. स्वतःच्या मुलाची निराशा दिसत असूनही तुम्ही मला आग्रह केला नाही. माझ्या लग्नाला आशीर्वाद दिलात. 'तुझा संसार सुखाचा होवो' असं मोठया मनानं म्हटलंत. त्या आशीर्वादाच्या बळावर हे सारं होत आहे. त्या आशीर्वादानं ही संकटं आम्ही तरून जाऊ.'' माया म्हणाली.
इतक्यात आनंदमोहन तेथे आले. मित्रांनी त्यांचे स्वागत केले.
''माया, हे आनंदमोहन, माझे जुने मित्र. यांच्यामुळे हे सारं शेवटी गोड होणार आहे. यांची मदत.'' अक्षयकुमार म्हणाले.
''माया, माझ्या बहिणीशी शेवटी प्रद्योतचं लग्न लावून दे बरं का, तू नाही केलंस तर नाही. परंतु दुसरी बायको त्याला देशील की नाही? मृणालिनी चांगली आहे, तुला आवडेल.'' आनंदमोहन म्हणाले.
''कोण मृणालिनी? ती महापुराच्या वेळेला स्वयंसेविका झाली होती का?'' मायेने विचारले.
''हो. झाली होती. तिच्या मामाबरोबर ती गेली होती. तिचे मामा महापूर साहाय्यक समितीत होते.''
''मृणालिनी आहे माझ्या ओळखीची. प्रथम तिचं व माझं भांडण होई. ती बंगालची अभिमानी ! महाराष्ट्रीय लोकांना नावं ठेवी. परंतु पुढे मत पालटलं. ती व मी मैत्रिणी झालो. तिच्या मनात एका महाराष्ट्रीय मजुराच्या आलेल्या शर्टानं क्रांती केली. मृणालिनी सुंदर आहे. बाबा, तुमच्या मायेपेक्षा ती किती तरी सुंदर आहे. प्रद्योतला बंगालचा अभिमान, मृणालिनीलाही तसाच अभिमान. दोघांची जणू पत्रिका जुळली. परंतु प्रद्योतचं लग्न मृणालिनीशी होण्यापूर्वी मी तुम्हाला अट घालीन ती पार पाडली पाहिजे.'' माया म्हणाली.
''नोकरी सोडण्याशिवाय इतर कोणतीही अट घाल.'' आनंदमोहन म्हणाले.