त्या दिवशी रामदास बराच दूर जाऊन हिंडून आला होता. जेवून तो पडला. परंतु त्याच्या पायांची मनस्वी आग होत होती. माया सर्व आटोपून आली तो रामदासाचे डोळे उघडेच.
''नेहमीप्रमाणे अंगावर शाल घालायला आले होते. आज झोप नाही वाटतं येत?'' तिने विचारले.
''झोपेतच अंगावर शाल घालावी व जागेपणी घालू नये असा बंगाली कायदा आहे वाटतं?'' त्याने विचारले.
''बंगाली कायदा महाराष्ट्रात कोण चालू देणार?'' ती म्हणाली.
''माया, पायांना थोडं दूध चोळतेस का? सारखी आग होत आहे.'' तो म्हणाला.
''चोळते हो.'' असे म्हणत माया गेली. ती दूध घेऊन आली. रामदासाचा पाय मांडीवर घेऊन ती दूध चोळू लागली.
''किती पटापट जिरतं आहे दूध! पायांत नव्हतं वाटतं घातलंत? पायांत घातल्याशिवाय जात जाऊ नका म्हणून कितीदा सांगितलं. हट्टी आहात तुम्ही.'' ती म्हणाली.
''मग मार मला.'' तो म्हणाला.
''लहान असतात तर मारलं असतं.'' ती म्हणाली.
''होणार आहे लवकरच लहान-आणखी चार-पाच महिन्यांनी. मग तुझ्या पायांवर लोळेन, हातात खेळेन. या मोठया रामदासावर रागावलेली असलीस म्हणजे त्या छोटया रामदासाच्या गालांवर चापटया बसून ते लाल होतील.'' रामदास म्हणाला.
''काही तरी बोलता.'' ती म्हणाली.
''काही तरी नाही. अगदी खरं आहे. पती पत्नीवर रागावलेला असला तर तो लहान मुलाला देतो तडाखे. पत्नी पतीवर रागावलेली असली तर तीही त्याला मारते. लहान बाळ आई-बापांचा राग शांत करण्यासाठी स्वतःचं बलिदान करीत असतं.'' रामदास म्हणाला.
''माझ्या बाळाला कधीसुध्दा बोट लावणार नाही.'' माया म्हणाली.
''म्हणजे नेहमी मला घ्यायला लावणार वाटतं?'' तो म्हणाला.
''मी मारणार नाही, तुम्हालाही मारू देणार नाही.'' ती म्हणाली.
''माझा हक्क का हिरावून घेतेस? मुलावर रागवायचं नाही म्हणजे तुझ्यावरही रागवायचा हक्क गेला की काय?'' त्याने विचारले.
''आपण कधीही एकमेकांवर रागवायचं नाही. आज सकाळी दूध न पिता रागावूनच गेलात व भटकून आलात. निघालात तेव्हा पाय पकडून ठेवायला हवे होते.'' ती म्हणाली.
''रागवायचं नाही म्हणतेस, आणि आता तूच रागावली आहेस.'' तो म्हणाला.