''मोहन, रडू नकोस. शांत राहा. तू लवकर बरा होशील.'' ती म्हणाली.

''शांता, एकदम कशी आलीस? माझी हाक ऐकू आली?'' त्याने विचारले.

''देशाची हाक मला ऐकू आली. मुकुंदराव पेटवीत आहेत सारं रान. स्वातंत्र्यदिनी लाखो शेतकरी स्त्री-पुरुष, मुलंबाळं एकत्र जमणार. आर्थिक स्वातंत्र्याची घोषणा करणार. कामगार, विद्यार्थी सामील होणार. मी ते वर्तमानपत्रातून वाचलं व नाचले. शिवतरच्या भगिनींस बरोबर घेऊन मी झेंडा घेऊन पुढे जाईन असं मनात म्हटलं. आले धावून. म्हटलं मोहनला बरोबर घेऊन जावं.'' शांता म्हणाली.

''शांता, शिवतरला आपल्याला शिव्याशाप आहेत. मी तुझे डोळे पुसले म्हणून गावानं मला रडविलं व एक प्रकारे हाकलून दिलं.'' मोहन म्हणाला.

''माझ्यामुळे तुला त्रास-वनवास?'' ती म्हणाली.

''असं नको म्हणू. तुझ्यासाठी होणारा वनवास मला स्वर्गाहून सुख देणारा आहे. शांता, दुजाभावानं बोलू नकोस. बाकी दुःखं मी सहन करीन; हे दुःख मात्र सहन करणार नाही. मधे तुझं पत्र येत नसे. माझं हृदय फाटे. झोपडीत आधी येऊन पत्र पडलेलं आहे का पाहांवं; नाही म्हणून खिन्न व्हावं. तुझा फोटो मजजवळ होता. तेच अखंड पत्र. अनंत पत्र. ते बघत असे. हृदयाशी धरत असे. हे बघ, माझ्याजवळ आहे ते मुकं पत्र.''

मोहनने तो फोटो दाखवला. शांतेला गहिवरून आले. ती रडू लागली.

''मोहन, मला क्षमा कर.'' ती म्हणाली.

''शांता, दुजाभाव जेथे मेला तेथे क्षमेची भाषा कोणी बोलावी, कोणी ऐकावी? मला पडू दे. भेटलीस. चांगलं झालं, मला औषध मिळालं. तू डॉक्टरीण होणार आहेस. तुझं गोड दर्शन म्हणजे अमृत. दुसरं औषध नको. माझी शांता रोग्याजवळ गोड बोलेल आणि रोगी बरा होईल. देवाघरचं मोफत औषध. हृदयातील दिव्य दवा.'' मोहन म्हणाला.

शांतेने भाकर केली. मोहनच्या घरात तिने भाकर भाजली. मोहनने कढत कढत भाकरी खाल्ली.

''किती गोड भाकर ! शांता, तुझ्या हातांतही अमृत आहे, जसं तुझ्या दृष्टीत आहे.'' मोहन म्हणाला.

''आता लवकर बरा हो मोहन. माझ्या हातचं अमृत, माझ्या दृष्टीचं अमृत. माझ्या ओठाचं अमृत भरपूर पी व मजबरोबर झेंडा घेऊन चल.''ती म्हणाली.

''शांता, तू का येथे राहणार? तुझ्या हातचं गोड खाणं, तुझं प्रेमळ बघणं, तुझ्या ओठांचं गोड बोलणं आज दिलंस तेवढं पुरे. अमृताचा थेंब एक मिळाला तरी पुरे. त्यानं काम होतं. अमृत सारखं प्यावं लागत नाही. तसं असेल तर ते अमृत नव्हे. तू आलेल्या कामाला जा. देशाची हाक ऐकून आलीस. देशासाठी जा. मी पडून राहीन. दुरून गाणी ऐकेन. जयजयकार ऐकेन. मोहनच्या मोहात नको पडू. मोठं कर्तव्य हाका मारीत आहे. जा. कोटयवधी मोहन झोपडी-झोपडीत मरत आहेत. त्यांचे प्रश्न सोडवावयाचे आहेत. त्यांच्या प्रश्नांत या क्षुद्र मोहनचा प्रश्न येऊन जातो. शांता, जा. तू येथे बसलीस तर मला बरं नाही वाटणार. तुझा हात हातात घेतला म्हणजे मला आनंद नाही का होत? तू जवळ असलीस म्हणजे मला आनंद वाटणार का नाही? परंतु आज तो आनंद दूर राहू दे. माझी शांता किसानांत चैतन्य निर्मित आहे, मेलेल्यांना उठवीत आहे, हे ऐकून जो मला आनंद होईल त्याच्यासमोर हा झोपडीतला आनंद तुच्छ आहे. मला उच्च आनंद दे.'' मोहन म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel