''त्यात काय वाईट आहे? हजारो, लाखो जगतात तशी मी जगेन. त्या हजारांत वावरून त्यांना क्रांतीला तयार करीन. मग क्रांती होईल. लहान मुलांची काळजी घेणारी बालसंगोपनगृहं मग काढली जातील. कामाचे तास कमी होतील. शेती श्रमणार्‍यांची होईल.'' शांता म्हणाली.

''तू येथे राहू नकोस. येथे राहायचं असेल तर आता लग्न कर. शिकावयाचं असेल तर तुझी तू व्यवस्था बघ.'' रामरावांनी निक्षून सांगितले.

''बरं, बाबा.'' असे म्हणून शांता उठून गेली.

शांता आता सचिंत दिसे. भाऊजवळ तरी पैसे का मागावे? आणि त्याला तरी या बहिणीची कोठे असेल आठवण? श्रीमंताचे पैसेच वाईट. ते पैसे घेतले की मनुष्य दुष्ट होतो, निष्ठुर होतो. उगीच मी इतके दिवस ते मेलेलं अन्न खाल्लं. परंतु मी कोठे जाऊ, कशी शिकू? आयुर्वेद महाविद्यालयात जावं वाटतं. उपयोगी उपकारी विद्या. परंतु तेथेही खर्च येणारच.

त्या दिवशी शांता फिरत फिरत दूर गेली. गावाबाहेर एक विशाल वटवृक्ष  होता. त्याच्याखाली ती बसली. विचार करीत बसली. विचार करता करता तिचे डोळे घळघळू लागले. शांता आजपर्यंत रडली नव्हती. आज ती का रडत होती? कोणासाठी रडत होती?

जवळ मोहन उभा राहिला होता. 'तिचे अश्रू पुसावे' त्याच्या मनात आले. परंतु त्या ओबडधोबड राठ हातांनी का तो अश्रू पुसणार? खेडयातील मजुराजवळ कोठला हातरुमाल? जवळ हातरुमाल नाही म्हणून मोहनला अश्रू पुसता येईना, का त्याला संकोच वाटत होता ! मोहनला काय करावे कळेना.

शांतेने स्वतःच शेवटी डोळे पुसले. मोहनकडे तिने पाहिले. स्वतःच्या अश्रूंची तिला लाज वाटली. दुसर्‍याने आपले रडणे पाहिले याचे तिला वाईट का वाटले? ती आता गंभीर झाली, शांत झाली.

''शांता, रडत होतीस?'' मोहनने विचारले.

''कोण म्हणतं मी रडत होते?'' तिने विचारले.

''मी पाहिलं. समोर उभा तर होतो.'' तो म्हणाला.

''उभा होतास. मग अश्रू का पुसले नाहीस? या जगात अश्रू पाहणारे लोक आहेत. अश्रू पुसणार्‍यांची वाण आहे.'' ती म्हणाली.

''कशानं पुसणार?'' त्याने विचारले.

''ज्याला मनापासून दुसर्‍याचे अश्रू पुसावयाचे आहेत, त्याला कशानं पुसावेत असा प्रश्न पडत नाही मोहन.'' ती म्हणाली.

''शांता, माझ्या ताठर-दाठर हातानं का तुझे डोळे पुसू? डोळयांतून पाणी बंद झालं असतं आणि रक्त निघालं असतं. पाहा ते हात. ओरखाडे निघतील हे हात फिरवीन तर. शेतकर्‍याचे हात म्हणजे पॉलिश पेपर.'' तो थोडा हसून परंतु गांभीर्य राखून म्हणाला.

''मोहन, पॉलिश पेपर स्वतः खरखरीत असतो, परंतु दुसर्‍या खरखरीत वस्तूला गुळगुळीत बनवतो, सुंदर, सुकुमार बनवतो. तुझे हे खरखरीत हात लागून माझे डोळे अधिक सुंदर झाले असते. गोड झाले असते. डोळे कोणासमोर रडले नाहीत. तू माझ्या अश्रूंतून समोर मला दिसत होतास, तरी मी ते आवरले नाहीत. मनात म्हटलं की, अश्रू पुसणारा समोर आहे, मग कशाला ते आवरू? मोहन, तूही माझा नाहीस. तूही दूरचा.'' शांतेचे डोळे पुन्हा भरून आले.

मोहनने ते पुसले.

''आता नाही ना दूरचा?'' तो हळूच म्हणाला.

''असं दुसर्‍यानं सांगून-शिकवून काय उपयोग?'' ती म्हणाली.

''तूच तर म्हणत असतेस, वेळ असला म्हणजे माझ्याकडे येत जा. तुला शिकवीन. मी अडाणी आहे. शिकवशील तसं करीन.'' तो म्हणाला.

''मोहन, शांता तुला काय शिकवणार? तिचं शिकणं बंद झालं.'' ती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to क्रांती


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत