मग रामदास थोडेसे बोलला. तो म्हणाला, ''बोलण्याची कला मी शिकलो नाही. तुमची संघटना पाहून मला आनंद होत आहे. मायाबहिणींचा उत्साह पाहून तर तुमच्या मोक्षाची वेळ जवळ आली, ग्रहण लवकरच सुटणार, असं मला वाटत होतं. आपण आणखी तयारी करू या. या तयारीबरोबर स्वावलंबी व्हावयास शिका. गावातील पैसा बाहेर जाणार नाही असं करा. घरीच कपडा तयार करा. फावल्या वेळात थोडं काता. घरची भाकर व घरचा कपडा, या दोन गोष्टींत आपण परावलंबी नाही राहता कामा. गावातील काही लोक सोनखेडीस जाऊन विणकाम शिकून या. गावात माग लावा. पतीनं सूत कातावं व वस्त्र पत्नीला द्यावं. पत्नीनं सूत कातावं व त्याचं वस्त्र पतीला द्यावं. बहिणीनं भावासाठी कातावं व भावानं बहिणीसाठी कातावं. ते प्रेमाचं वस्त्र जरा जाडंभरडं असलं तरी ते वापरण्यात किती आनंद वाटत असेल ! जणू ते प्रेमाचं चिलखत वाटेल. त्याप्रमाणेच तुम्ही गावातील अस्पृश्य बंधूंस जवळ घ्या. जुने खोटे धर्म दूर करा. प्रेमाचा धर्म शिका. सारे गरीब एक होणार नाहीत, तोपर्यंत प्रश्न कसा सुटणार? सावकार तुम्हाला छळतो. तुम्ही हरिजनांना छळून तेच पाप करता. माणसाला पशूहून नीच नका समजू. अस्पृश्य बंधू समाजाची सेवाच करत आहेत. असे आपण नीट वागू लागलो म्हणजेच क्रांती. ही क्रांती शतमुखी आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक सर्व प्रकारची क्रांती, सर्वप्रकारची गुलामगिरी नष्ट करावयाची आहे हे विसरू नका. तुम्ही माझं स्वागत केलंत, मी ऋणी आहे. मला ओवाळलंत, माझ्या कपाळी कुंकू लावलं. त्याचा अर्थ हा की, क्रांतीसाठी डोक्यावर लाठी बसून माझं डोकं लाल झालं पाहिजे. माझ्या पंचप्राणांनी मी क्रांतीला ओवाळलं पाहिजे, मला ते धैर्य येवो व सर्व श्रमणारी जनता एक दिवस सुखी होवो. दुसरं काय?''
दीनबंधू रामदासाचा असा हा सर्वत्र दौरा झाला. वातावरण चांगले तयार झाले. खेडयापाडयांतील विरोध मावळले. आडमुठये लोक जरा सरळ झाले. रामदासाच्या त्यागाचे ते बळ होते. ज्या चळवळीत संन्यास आहे, त्याग आहे, तीच चळवळ फलद्रूप होण्याचा संभव असतो.