संन्यासी ! परंतु मिनीने त्याला हात लावला. निःशंकपणे लावला. त्याचे तोंड तिने आपल्या पदराने पुसले. ते निर्मळ प्रशांत मुख मिटलेल्या कमळाप्रमाणे दिसत होते. तिने पाय चोळले. त्याचे हात आपल्या हातांत घेऊन तिने चोळले. ती त्या शरीरात उष्णता आणू पाहत होती. परंतु प्रयत्नाला यश येईना. ती जवळ बसून बघत राहिली, पित्याला विसरली, मोटार विसरली, आकाशातील तारा पकडण्यासाठी उडी मारायला विसरली. तिची गती पांगुळली. उल्लूपणा उडाला. ती एकदम निराळी झाली. मिनी मुकी होऊन तेथे बसली.
मिनी त्या संन्याशाच्या मुखाजवळ डोळे नेई व त्याचे डोळे उघडतात का पुनःपुन्हा पाही. तिने आपल्या कोमल करांनी त्याचे डोळे पुसले. तिने आपली बोटे हळुवारपणे त्याच्या डोळयांवरून फिरविली. त्या सुंदर नासिकेतून श्वासोच्छ्वास मात्र अधिक कढत झाला, अधिक जलद होऊ लागला. ती तो कढत वारा-स्वतःच्या जीवनातील ऊबदार वारा-त्याच्या जीवनात का ओतू पहात होती? नाकाशी घेऊन स्वतःचे प्राण त्याच्या जीवनात का संचरवीत होती?
तिने एकदम त्या भगव्या वस्त्रातील संन्याशाला धरून ठेवले. परंतु ती एकदम उठली. तिने त्याला प्रणाम केला व ती धावत निघाली. न थांबता ती मोटारीशी आली.
''मिने, किती ग अल्लड तू? किती घामाघूम झालीस? अशी काय दिसतेस? मिने, अशी का घाबरल्यासारखी उभी?'' पिता विचारू लागला.
''बाबा, थंडीत कोणी तरी रस्त्यात गारठून पडलं आहे. चला, आपली मोटार तेथे नेऊ. त्यांना आपल्या घरी नेऊ. कोणी तरी संन्याशी दिसतो. भगवी वस्त्रं अंगावर आहेत. ते थंडीनं गारठलेत की काही त्यांना चावलं? चला बाबा.'' असे म्हणून मीना मोटारीत बसली. ती मोटारीचे शिंग सारखे वाजवीत होती. तो संन्यासी जागा व्हावा असा तिचा हेतू.
परंतु संन्यासी समाधीतच होता. मोटार येऊन थबकली. श्रीनिवासरावांनी त्या संन्याशाला जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला जागृती येईना. त्याला उचलून मोटारीत ठेवले पाहिजे होते. परंतु त्या दोघांना उचलता येईल का?
''बाबा, आपण यांना उचलून गाडीत ठेवू या.'' मिनी म्हणाली.
''मिने, आपण त्यांना कसं उचलणार? तुला तर उशीसुध्दा त्या दिवशी उचलत नव्हती.'' श्रीनिवास म्हणाले.
''बाबा स्त्रियांच्या अंगात कधी कधी वाघिणीची-सिंहिणीची शक्ती येते. मी एकटीसुध्दा त्यांना फुलासारखी उचलून ठेवीन. हं, धरा तुम्ही, मी पायांकडून धरते. वेळ दवडण्यात अर्थ नाही. आपण घरी नेऊ व डॉक्टर आणू. उचला बाबा.''
असे म्हणत मिनीने ते पाय धरले. आपल्या छातीशी ते धुळीचे पाय तिने लावले. पित्याने सर्व शक्ती लावली. संकटात सामर्थ्य येते. भावनेची एक शक्ती असते. जडापेक्षा चैतन्याची शक्ती अनंत आहे. दोघांनी तो देह उचलून मोटारीत ठेवला. मोटारीत सरळ देह मावला नसता. पाय जरा दुमडून तो ठेवण्यात आला. ते धुळीने मळलेले भगवे कपडे मिनीने झाडले. संन्याशाचा दंड, कमंडलू व एक भगवी पिशवी गाडीत ठेवण्यात आली. मिनीने बाबांचे पांघरूण संन्याशाच्या अंगावर घातले.