''मी नाही चिमटे घेत. तेथे ढेकूणच आहेत.'' शांता म्हणाली.
''मी एकटा गेलो म्हणजे नाही चावत ते?'' त्याने प्रश्न केला.
''एकटे गेलेत म्हणजे एका आण्यात बसत असाल.'' ती म्हणाली.
''जास्त उंच जागेवर वाटते जास्त घाण?'' त्याने विचारले.
''मोठं तेवढं खोटं म्हणच आहे.'' शांता म्हणाली.
''येतेस की नाही? वेळ झाली.'' तो म्हणाला.
''मी कोणतं नेसू पातळ?'' तिने विचारले.
''नेस ती तुझी पहिली पासोडी.'' तो हसून म्हणाला.
''खादीमध्ये का मी एवढी लठ्ठ दिसत असे?'' तिने विचारले.
''अजून शंकाच का? आम्हाला हसता पुरेसे होई.'' तो म्हणाला.
''मग हे अस्मानी रंगाचं नेसू की गुलाबी नेसू.'' तिने विचारले.
''तुला नाही निवड करता येत?'' त्याने विचारले.
''आमचं सारं दुसर्यासाठी, दुसर्याच्या आनंदासाठी.'' ती म्हणाली.
''शांते, मी खरोखर तुला आवडतो का?'' त्याने तिचा हात धरून म्हटले.
''थिएटरात सांगेन.'' ती म्हणाली.
''चिमटे घेऊन ना?'' त्याने विचारले.
''दुसर्या कशानं?'' ती म्हणाली.
''खादीचा हा उपयोग आहे. जाडया खादीवरून चिमटा लागणार नाही, विंचवाची नांगी टोचणार नाही.'' तो म्हणाला.
''खादीचा एक तरी उपयोग आहे एकूण.'' ती हसत म्हणाली.
''चल लौकर गप्पाडे.'' तो म्हणाला.
दोघे गेली. बोलपट पाहण्यात रंगली. एका स्त्रीला तिचा प्रियकर, 'गरज सरो वैद्य मरो' या नात्याने एक क्षणात सोडून कसा जातो ते त्या बोलपटातच होते. असह्य स्त्री आत्महत्या करते.
शांतेचा हात त्याच्या हातून दूर झाला.
''काय ग शांता?'' त्याने विचारले.
''तुमचा हात गार आहे.'' ती म्हणाली.
''मग तुझ्या हाताची ऊब दे.'' तो म्हणाला.
''उसनी ऊब कितीशी पुरणार?''ती म्हणाली.
''शांता, तुला चिमटे बोचत नाहीत?'' त्याने विचारले.
''मला काही होत नाही.'' ती म्हणाली.
''तुला थंडी वाजते का?'' त्याने विचारले.
''होय. मला थंडी वाजते. घरी जाऊ दे मला.'' ती म्हणाली.
''एकटी जाशील?'' त्याने विचारले.
''हो.'' ती म्हणाली.