''भाऊसाहेबांचे प्राण पेटवलेस. पाप्या, आता शांत करायला चल.'' कोणी काकुळतीने बोलला.

''चला, माझ्या खांद्यावर खादी आहेच. खादीचे रामनाम मजजवळ आहे. त्या बंगल्यातील ज्वाळा मला लागणार नाहीत. '' तो म्हणाला.

त्या दिवाणखान्यात दयाराम आला.

''भाऊ, हा बघ कोण आला आहे?'' शांतीने सांगितले. रामदासाने डोळे उघडले. तो एकदम उठला व त्याने दयारामला मिठी मारली. परंतु पुन्हा एकदम तो दूर झाला.

''दयाराम, फाड हे माझे कपडे व तुझ्या खांद्यावरील लाखो जीवांना शांती देणारी खादी माझ्या खांद्यावर घाल. मी जळत आहे.'' रामदास रडत म्हणाला. दयारामने त्याला खादीचे धोतर दिले, खादीचा सदरा दिला. रामदासाने खादी परिधान केली. तो शांत झाला. त्याचा काळवंडलेला मुखचंद्र हसला. ढग गेले. आग गेली. आनंद आला. प्रभू रामचंद्रांनी नुसते वानरांकडे पाहिले आणि वानरांच्या वेदना बंद झाल्या. बाणांचे व्रण भरून आले. त्याप्रमाणे खादीचा स्पर्श होताच रामदास पुलकित झाला. त्याच्या अंगावर जणू मूठभर मांस आले. तोंडावरची प्रेतकळा जाऊन गोड तेजकळा तेथे फुलली.

''तुम्ही सर्व येऊन जा. आम्हाला बसू दे.'' रामदास म्हणाला.

''भाऊ, मीसुध्दा जाऊ?'' शांतीने विचारले.

''तू थांब.'' रामदासाने सांगितले.

सारी मंडळी जीव खाली पडून गेली. पुन्हा उरलेले पाहुणे पलीकडे फोनो वाजवू लागले. पुन्हा कपबश्यांचे आवाज खुळखुळू लागले. लहान पाखरांना उंच हवेत फार वेळ उडवत नाही. तेथे पंख स्थिर ठेवून राहता येत नाही. लहान जीवांचे तसेच असते. सामान्य माणसे क्षणभर उंच वातावरणात जातात. जेथे वासनाविकारांची विरलता आहे, अशी स्वच्छ हवा, निर्लोभ, निर्मत्सर हवा त्यांना फार वेळ सहन होत नाही तेथे ते गुदमरू लागतात. ते झपाटयाने पुन्हा खाली येऊन नाचू-बागडू लागतात. चिखलात बुडया मारू लागतात.

परंतु दयाराम, रामदास व शांता ! ती तीन माणके होती. भारतमातेचे ते तीन भावी आधार होते.

''दयाराम, नेमका आज तू कसा आलास?'' रामदासने विचारले.

''अर्जुनासाठी गोपाळकृष्णाने गीता सांगितली, भाऊसाठी गीत म्हटले दयारामने.'' शांता म्हणाली.

''रामदास, तू संपत्तीचा मालक होत आहेस. परंतु ही संपत्ती दरिद्री नारायणाची, ही गोष्ट विसरू नकोस.'' दयाराम म्हणाला.

''नाही, विसरणार नाही.''रामदासने सांगितले.

''दयाराम, तुला खायला आणू?'' शांतीने विचारले.

''आण, मला भूक लागली आहे. '' दयाराम म्हणाला. त्याने फराळ केला. त्या भावंडांचा निरोप घेऊन तो निघून गेला.

''शांते, आपण दोघांनी गरिबांची सेवा करायचं ठरवू. माझं आज दत्तकविधान झालं. बाबांनी मला आज देऊन टाकलं, कोणाला दिलं? गोविंदरावांना? या इस्टेटीला? नाही. आज माझे देशदेवाला त्यांनी दान दिलं आणि शांते तुझंही दान होऊ दे. गरिबांचे संसार सुखी व सुंदर करण्यासाठी आपण आपली जीवने अर्पायची. ठरलं ना?'' रामदासाने विचारले.
''ठरलं, परंतु आपण कचरलो तर, घसरलो तर?'' तिने विचारले.

''सद्हेतूला परमेश्वर मरू देत नाही.'' रामदास डोळे मिटून म्हणाला.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel