''त्यापलीकडे कंडारी गावी कोणी शिकवावयाचा वर्ग काढला तर जमीनदार म्हणू लागले, 'शिकायला जाल तर कामावर ठेवणार नाही.' रात्री दहा दहा वाजेपर्यंत घरी राबवू लागले, म्हणजे शिकायला जाता येऊ नये.'' गणपतने इतिहास सांगितला.
''ताई, आणखी दाखवा ना चित्रे.'' मोहन म्हणाला.
''हे बघा एक. हे चीनचे स्वातंत्र्यवीर. जेवण झाल्यावर यांनी हातांत पाटयापेन्सिली घेतल्या आहेत. बरोबर बंदूक असेल तर आजूबाजूस काय चालले आहे ते कळले पाहिजे. म्हणून चिनी शेतकरी बंदुकीबरोबर पाटीही घेतो.'' शांतेने सांगितले.
''स्वराज्य म्हणजे गंमत नाही.'' म्हातारा पांडू म्हणाला.
''होय, पांडबा. स्वराज्य म्हणजे दृढनिश्चय. अपार कष्ट. सारखा ध्यास.'' शांतेने सांगितले.
''मग आमचा घ्याल ना वर्ग ताई?'' शंकरने विचारले.
''होय, बायकांचा संपला की मग तुमचा.'' शांता म्हणाली.
''बायका पुढे, आम्ही मागं. शांताबाई बायकांची बाजू घेणार.'' मोहन हसून म्हणाला.
''आपण बायकांना कमी मानतो हीच चूक.'' शांता हसून म्हणाली.
''पण ताई, तुमची सुटी संपली म्हणजे मग काय?'' पांडूने विचारले.
''मग मोहन शिकवील. मोहन, तू येत जा ना जरा दिवसाही माझ्याकडे शिकायला.'' शांतेने सांगितले.
''जात जा रे. एकटा तर आहेस. बायको तर मिळत नाही.'' पांडू म्हणाला.
''बाप होता तर मोहनची त्यानं पुन्हा पुन्हा तीन लग्नं केली. परंतु नवी नवरी मरायची. 'मोहनला मुलगी देणं म्हणजे मरणाला देणं' असं म्हणतात लोक.'' गणपत बोलला.
''मोहन, तू हो आपला संन्यासी,'' शांता गंभीरपणे म्हणाली.
''तो का बामण आहे?'' शंकर हसून म्हणाला.
''जो केवळ जगाची सेवा करील तो संन्यासी.'' शांता गंभीरपणे म्हणाली.
''मोहन, ताईजवळ शीक. मग आमचा मास्तर हो. परंतु मारूबिरू नो हो छडी आम्हा म्हातार्यांना !'' पांडू म्हणाला.
''पण मोहन, तू भरभर नाही शिकलास तर मी तुला छडी मारीन, कान ओढीन; चालेल ना?'' शांतेने गंमतीने विचारले.
''बैल भराभर चालायला हवा म्हणून आम्ही आर टोचतोस की !'' मोहन म्हणाला.
''तू का बैल?'' गणपतने विचारले.