इतक्यांत ओसरीवर एक मुलगा आला.
“काय रे भिका?” रघुनाथनें विचारलें.
“मी शेवया आणल्या आहेत,” भिका म्हणाला.
“आण आंत,” रघुनाथ म्हणाला.
भिका निघून गेला. तो रघुनाथचा मित्र होता. त्याला स्वामी, नामदेव सर्वांची माहिती होती. रघुनाथ सारें सांगायचा.
“वेणू, वाढ त्या शेवया,” रघुनाथ म्हणाला.
“या तुझ्या मित्रांना वाढतें. त्यांना भाकर नसावी आवडत बहुतकरून त्यांची पहिली अजून संपतच नाही,” असें म्हणून वेणूनें नामदेवाला आधी शेवाया वाढल्या.
“मला फार नको वाढू. सोसायच्या नाहीत,” स्वामी म्हणाले.
“असे आपलें मोठ्यांना म्हणावेच लागते,” वेणू म्हणाली.
सा-यांना हंसू आले.
“वेण्ये, असें बोलू नये,” आई चुलीजवळून म्हणाली.
“मी माझें तोंड शिवूनच टाकते,” ती म्हणाली.
“टाक शिवून,” रघुनाथ म्हणाला.
“हो, टाकतें ही शिवून,” वेणू म्हणाली.
“बोललीस. शिवून ना टाकीत होतीस?” रघुनाथनें चिडविले.
“तू अगदी चिडविणारा, रडविणारा आहेस,” वेणू म्हणाली.
“आणि गोष्टी कोण सांगतो, पुस्तके आणून कोण देतो?” त्यानें विचारलें
“मग तेव्हा तू चांगला असतोस,” वेणू म्हणाली.
“आपण सारींच कधी चांगली कधी वाईट असतों. कवी कृष्णपक्ष कधी शुक्लपक्ष,” स्वामी म्हणाले.
“कधी हंसतों कधी रडतों, नाही का?” वेणूनें विचारलें.
रघुनाथाच्या आईनें स्वत: भाकर वाढावयास आणली.
“माझ्या हातची एवढी घ्या,” असें म्हणून तिनें स्वामींना, नामदेवास व रघुनाथला चतकोर, चतकोर वाढली.
जेवणें झाली. ओसरींत घोंगडी टाकून स्वामी पडलें. जवळच नामदेवहि जरा झोंपला. रघुनाथ आंत आईजवळ बोलत होता.
सुख-दु:खाच्या गोष्टी ऐकत होता. घरांत काय आहे नाहीं विचारीत होता.
थोड्या वेळानें स्वामी उठले. त्यांनी चूळ भरली. ते आपल्या टकलीवर सूत कांतू लागले. वेणू पाहात होती.