नामदेव – मला गर्व आहे हें ज्याला समजून लागलें, त्याचा गर्व गेलाच समजा. तुझ्यामधील देव जागा होत आहे.
यशवंत - माझ्यामधील देव?
नामदेव – हो प्रत्येकाच्या जीवनांत चांगुलपणा आहे. तो चांगुलपणा म्हणजे देवाचेंच रुप.
यशवंत – नामदेव, तू किती सुंदर बोलतोस!
नामदेव – स्वामींनी हें शिकविलें. त्यांनी ही दृष्टी दिली.
यशवंत – ते खरोखर थोर पुरुष आहेत.
नामदेव – त्यांना शोभेसे आपण होऊं या. त्यांना ज्यामुळे दु:ख होईल, ते आपण सोडून देऊ. त्यांना सुख होईल ते करुं.
यशवंत – होय. मी तसा वागेन. नामदेव! तू माझा मित्र. तू माझा सोबती. घे,माझा हात हातांत घे.
नामदेवानें यशवंताचा हात हातांत घेतला. यशवंताचा हात थरथरत होता. कोणीहि बोलत नव्हतें. आजपर्यंत यशवंत एकटा होता. त्याला मित्र मिळाला. हृदयांतील श्रीमंती दाखविणारा मित्र मिळाला. हृदयांतील भावनांचे झरे त्याला दिसू लागले. बाह्य श्रीमंतीच्या दगडाखाली आजपर्यंत दडले गेलेले ते झरे झुळझुळ वाहाताना त्याला दिसू लागले. यशवंत विलासांतून विकासाकडे आला. विषांतून अमृताकडे आला. पशुत्वांतून माणुसकीकडे आला तो आजपर्यंत मढें होता, तो आंता जिवंत झाला; तो द्विज झाला. अंड्यांतून पक्षी बाहेर पडला. रुढीच्या चिखलांत व खोट्या कल्पनांत रुतलेला त्याचा आत्महंस वर उडाला. श्रीमंतीचे, ऐषआरामाचे, मानापानाचे, पोषाखाचे सारे पडदे फाडले गेलेले, टरटर फाडले गेले. बंधने दूर झाली. विशाल आकाश नवीन क्षितिजें, दिव्य ध्येये!
नामदेव – यशवंत चल, जेवावयाची घंटा होईल.
यशवंत – खाऊनखाऊन मी कंटाळलो आहे. आज तू नवीन खाद्य दिले. आहेस. मला जशी मस्ती चढली आहे. नामदेव – ये, आपण नाचू येतोस?
नामदेव – नको. आता उशीर झाला आहे आपण ध्येयाभोंवती नाचू ये. स्वामीच्याभोंवती नाचू ये. भारताच्याभोवती नाचूं ये.
दोघे मित्र परत आले. भोजनें झालीं. मुलें अभ्यास करीत होती. विगूल वाजलें व मुले झोंपी गेली. सारी मुलें झोंपली, परंतु यशवंत जागा होता. त्याला झोंप येईना. ‘स्वामीना दु:ख होईल ते करु नको. आपण स्वामीच्याभोंवती नाचू. भारतमातेच्याभोवंती नाचू नामदेवाचे शब्द त्याला आठवले. त्याच्या गादीवर विदेशी चादर होती, विदेशी रंग होता त्याच्या अंगांत विदेशी शर्ट होता. यशवंताला चैन पडेना. तो त्या अंथरुणावरुन उठला. त्यानें ते गुंडाळून ठेवलें. त्यानें सदरा काढला – आणि धोतर ? नकोत हे कपडे. आगलावे विदेशी कपडे! सा-या देशाला आग लावली या कपड्यांनी ! सा-या भारतीय संसाराची होळी केली या विदेशी वस्त्रांनी! आग, आग, आग!