“तु्म्ही हरिजनच देशाची सेवा करीत आहात. कुंभार तुमच्यामुळे जगत आहे,” स्वामी म्हणाले.
“ए भाऊ जरा इकडे घऱांत ये रे,” एक म्हातारी हरिजनबाई म्हणाली.
“काय हवे बाई?” यशवंतानें विचारलें.
“या पोराला बघ रे. किती ताप आला आहे मुलाला,” म्हातारी बोलली.
स्वामी त्या झोंपडीत गेले. तो आजारी मुलगा जमिनीवर निजला होता.
फाटकी घोंगडी त्याच्या अंगात होती. ‘भुमातेच्या कुशींत तो होता. त्या मुलांच्या अंगांत सदरा नव्हता. त्याच्या पोटांत अन्न नव्हतें.
“रघुनाथ! माझी घोंगडी घेऊन ये. आणि आपण खादी आणली आहेना, त्यांत आयते शिवलेले शर्ट आहेत, त्यांतील एका लहानसा घेऊन ये. जा,” स्वामींनी सांगितलें.
“ याला खायला काय देता?” स्वामींनी विचारलें.
“रात्री घरोघर जाऊन भाकर मागून आणते. त्यांतील तुकडा त्याला देत. दुसरें काय देऊ?” ती म्हातारी म्हणाली.
रघुनाथ घोंगडी व शर्ट घेऊन आला.
‘ऊठ बरें बाळ जरा,” स्वामी गोड शब्दांनी त्या मुलाला म्हणाले.
मुलगा उठला, स्वामीनीं ती घोंगडी तेथें आंथरली. आपल्या अंगावरचा स्वच्छसा रुमाल त्या घोंगडीवर घातला. “ये, नीज आतां,” असें ते त्या मुलाला म्हणाले. बाळ निजला. स्वच्छ अंथरुणावर भारतमातेचा तो प्रिय पुत्र निजला.
“काहीं दिवस, निदान दोनतीन दिवस याला दूधच देत जा. तुकाराम मास्तर! मी पैसे देऊन ठेवीन. याला दूध तुम्ही देण्याची व्यवस्था करा,” स्वामी म्हणाले.
“गरिबाला कशाला दूध! दूध सोसणार नाही आम्हांला भाऊ आमच्या कोठ्याला त्याची सवय नाही,” म्हातारी म्हणाली.
“दूध चांगलें तापवून देत जा. तें बाधणार नाही हो आणि मी ह्या गोळ्या देऊन ठेवतों. या दुधाच्या घोटाबरोबर देत जा. दिवसांतून तीन गोळ्या जाऊ दें पोटांत. आतांच मी दोन देऊन ठेवतो. पाणी आहे का?” स्वामीनीं विचारले,
म्हातारीनें नारळाच्या करटींत पाणी आणले! नारळाच्या करटीचा पेला व मातीचा गडवा! सर्व गांवाची सेवा करणारा हरिजन बंधु, त्याची काय ही हीन, दीन स्थिती! ती करटी पाहून स्वामींचें हृदय दुभंग झालें. त्यांचे डोळे भरून आले. मुलें पाहात होती. महादेवाचें वैभव पाहात होती. स्मशानांत राहाणा-या खटवांगधारी शिवाचें दर्शन घेत होती.
गोळी कडू होती. बाळानें तोंड वाईट केलं. परंतु तेथें थोडीच मोसंब्याची फोड किंवा साखरेचा खडा होता! तेथे घरांत थोडेसे चिंचोके पडलेले होते. चिंचोके हा त्या मुलाचा मेवा होता. ही त्याची खडीसाखर ह्या त्याच्या मनुका, हें सर्वं कांही.
“मगन! येथें गावांत संत्रीमोसंबी मिळतात?” स्वामीनीं विचारलें.
“आपलाच मळा आहे ना मोसंब्यांचा,” मगन म्हणाला.
“मगन! तुझा मोसंब्यांचा मळा आहे, परंतु काय त्याचा उपयोग ? या देवांना त्याचा उपयोग होत नसेल तर काय त्याचा उपयोग? हा मुलगा बरा होईपर्यंत त्याच्याकडे मोसंबी पाठव. पाठवशील का? महात्माजीचा आजचा वाढदिवस! महात्माजींच्या आत्म्याला केवढें समाधान होईल!”