“नाहीतर नामदेव तुला हात धरून नेईल. तोच जपून नेईल ने नामदेव. मी हे सारे आवरतो,” रघुनाथ म्हणाला.

“न्या मला. हळूच न्या. मी पडेन आणि तुम्ही पडायचे नाहीतर” असे म्हणून वेणूने हात पुढे केला. नामदेवाने तो बळकट पकडला.

“इतका घट्ट नको काही धरायला. तसा हात सुटणार नाही. जरा धरा तेवढ्या आधाराने मी येईन,” वेणू म्हणाली.

नामदेवाने वेणूला हात रूमाल दिला. वेणूने तोंड पुसले.

“मी जशी राणीच आहे. सारे मला आयते मिळते. आयते जेवायला, आयते हात पुसायला. सारे समोर होऊन उभे राहते. आंधळ्या वेणूला देण्यासाठी सारे हात पुढे होत आहेत. देवाने माझे डोळे नेले, आणि दुस-यांचे हात मला दिले,” वेणू म्हणाली.

“ह्या खिडकीतून सारे छान दिसते! पर्वती अगदी समोर आहे. ध्येय भगवान समोर आहे,” स्वामी म्हणाले.

“समोर आलेला तर मला दिसत नाही. परंतू भासतो आहे. ह्या बाजूला आहे ना? इकडून हवा येत आहे,” वेणू म्हणाली.

वेणू व स्वामी जरा झोपले होते. उठल्यावर स्वामी म्हणाले, “आपण त्या माणसास भेटू. काय ते ठरवू. म्हणजे रात्रीच्या गाडीने आम्ही जाऊ.’

“वेणू, तू घरात राहा. आम्ही जाऊन येतो,” रघुनाथ म्हणाला.

घरांत कोणी आले तर मला कळणारहि नाही,” वेणू म्हणाली.

“तू आतून कडी लावून घे,” रघुनाथ म्हणाला,

ते तिघे गेले. वेणू एकटीच खोलीत होती. त्या खिडकीतून पाहत होती. वा-यावर तिचे केस नाचत होते. तिला काही दिसते नव्हते. ती खोलीत चाचपडत हिंडत होती. काही दिसेना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel