ते पाहा स्वामी खाली बसले. त्यांनी आपल्या पिशवींतून वही काढली. पेन्सिलीनें कांहींतरी ते लिहू लागले. काय बरें लिहीत आहेत? तो निंबध आहे का ती गोष्ट आहे? तो हिशोब आहे की कांहीं टांचणे, टिपणें आहेत? त्यांचे डोळे पाहा, भावनांनी पेटल्याप्रमाणे ते दिसत आहेत. हृदयांतील ज्वालामुखी डोळ्यांत येऊन उभा राहिला आहे. त्यांचे ओंठ थरथरत आहेत व लिहिताना बोटे कांपत आहेत. भावनांचा वेग शरिराला व हृदयाला सहन होत नाही वाटतें ? भावनांच्याबरोबर शब्दांना टिकाव धरवत नाहीं, म्हणून तर नाही ना तो वेग ओंठाच्या कंपांतून, बोटांच्या कंपांतून प्रकट होत ?
एक दिवस गान तेथे जन्माला आलें होतें. त्या कागदावर तेजस्वी व उदार भावनांचे एक गाणें लिहिण्यांत आलें होते. स्वामीजीनी तें गाणें म्हटलें. लिहून झाल्यावर त्यांना समाधान झालें. त्य गाण्यांतील चरण गुणगुणत ते शिवल्याभोंवती प्रदक्षिणा घालू लागले.
वेळ केव्हां संपला तें त्यांना कळलें नाहीं. संध्याकाळ होत आली. सूर्यास्ताचे कोमल संपला नदीच्या पाण्यावर पडले होते. निघून जाणारे किरण झाडांच्या पानांशी शेवटची खेळीमेळी करीत होते. स्वामीजींना एकदम आठवण आली. गांवांत सभा आहे. नगरभवनांत सभा आहे. ते एकदम उठले. त्यांनी आपली पिशवी भरली. अंगावर घोंगडी टाकली. झप् झप् पावलें टाकीत ते गांवाकडे निघाले. ‘नगरभवन’ कोठें आहे त्याची ते विचारपूस करू लागले.
शेवटीं एकदांचे नगरभवन आलें. नगरभवनाभोंवती बाग होती. अद्याप सभेस सुरुवात झाली नव्हती. मुसलमानांच्या झुंडी येत होत्या. तरुणांचे मेळावे ठायीं ठायीं उभे होतो. बागेंत मुलें फिरत होतीं. बागेंतील एका बाकावर स्वामी बसले. त्यांच्या तेजस्वी मूर्तींकडे सारे कुतूहलानें पाहात होते. पहाडासारखी धिप्पाड ती मूर्ति होती. परंतु पुन्हां किती शांत व गंभीर! पाहाणा-याच्या मनांत त्या मूर्तींबद्दल एकदम आदर व भक्ति उत्पन्न होत.
सभेचे अध्यक्ष आले. मंडळी सभागृहांत जाऊ लागली. स्वामीजीहि सभागृहात शिरले. तरुणांच्या घोळक्यांतच ते बसले. सभेस आरंभ झाला. नियुक्त वक्ते उभे राहिले व त्यांनी पैगंबरांविषयींची माहिती सांगितली. आपल्या धर्मस्थापकाबद्दलची माहिती एका हिंदूनें गोळा करून, आस्थापूर्वक मिळवून ती आपणास सांगावी याचे मुसलमानबंधूंस आश्चर्य वाटेलं. मुख्य वक्त्यांचे भाषण संपल्यावर अध्यक्षांनी दुस-या कोणास बोलावयाचे असल्यास परवानगी आहे असें सांगितलें.
कोणी उठतो का – श्रोते चौफेर पाहूं लागले. ते पाहा स्वामी उठले. सिंहाप्रमाणे खुर्चीजवळ गेले. त्या नव पुरुषाकडे सर्वांचे लक्ष वेधलें. हा मनुष्य कोण, कुठला, काय सांगणार? स्वामींची धीरगंभीर वामी सुरु झाली. अत्यंत शांतता होती. लोक शब्दनशब्द पिऊं लागले, हृदयांत साठवू लागे.
“मुसलमान बंधूनो ! आज मला किती आनंद होत आहे, त्याची कल्पना तुम्हाला होणार नाहीं. आपलें ध्येय परार्धांशाने कां होईना कोठेतरी प्रकट होत आहे हें पाहण्यांत धन्यता असते. आज हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे तंटे होत आहेत. अशा अविश्वासाच्या काळांत आजच्यासारखा प्रसंग पाहावयास मिळणें म्हणजे साहरा वाळवंटांत झुळझुळ वाहणारा झरा भेटण्यासारखे आहे. बंधूनो ! या भारतवर्षांचें एक महान ध्येय आहे. तें ध्येय कधींहि डोळ्याआड करू नका. परमेश्वराला भिन्न भिन्न संस्कृतीचे लोक या भारतात आणून, त्या सर्वांची एक महान् संस्कृति निर्माण करावयाची आहे. सर्व धर्मांचे व जातीचे लोक येथे आणून त्यांना गु्यागोविंदाने नांदविण्याचा एक महान प्रयोग भारतभाग्यविधाता करु पाहात आहे. समुद्रात हजारो प्रवाह येतात, म्हणून समुद्र पवित्र; त्याप्रमाणे भारतवर्षं हें पवित्र तीर्थ आहे. मानवीजीवनाचें विविधतेंतील ऐक्य पाहावयास जगांतील यात्रेकरु या भारतभूमींत येतील. भारतीय इतिहासांतील हें सोनेरी सूत्र विसरु नका.