“गोपाळराव ! आजपर्यंत आशेनें मी अनेक ठिकाणी राहिलों. एका वर्तमानपत्राच्या संस्थेत होतो. परंतु राष्ट्र बनवू पाहाणारी ती संस्था म्हणजे एक चिखलाचे डबकें होते. जातिभेद रोमारोमांत सर्वांच्या भिनलेले. कोणी ब्राह्मणाचे अभिमानी, कोणी ब्राह्मणेतरत्वाचे अभिमानी! जिकडं तिकड स्वार्थाचा बुजबुजाट. विशाल दृष्टी व उदार विचार या लोकांना सहन होत नाहीत. जो तो स्वत:ला कोंडून घेत आहे. त्या संपादक मंडळांतील सूत्रधारांशी माझे जमेना. ध्येयाला सोडण्याऐवजी मीं संस्थाच सोडली. माझ्या ध्येयाचा मी एक तरी पूजक नको का राहावयाला? अजून अस्पृश्यता सशास्त्र आहे, हेंच यांचें तुणतुणे! आज या विसाव्या शतकांत, साम्यवादाच्या काळांत अस्पुश्यतेचा शास्त्रार्थ सांगत बसणा-यांच्या बुद्धीची कीवं करावीशी वाटतें. या जडमूढ संस्थेचा मी त्याग केला. तेथून दुस-या एका मंडळांत गेलो. ते अस्पुश्यांना जवळ घेऊ पाहात होते. परंतु मुसलमान म्हणजे त्यांना जसें वावडे आखाडे काढा. कां, तर मुसलमानांस ठोकण्यासाठी! मला आखाडे पाहिजे आहेत. परंतु सेवेला शरीर बळकट असावें यासाठी ते हवे आहेत. वाईट कोणीहि करो, त्याला विरोध करण्यासाटी शक्ति कमवा. मग तो हिंदु असो, मुसलमान असो वा इंग्रज असो.
“गोपाळराव! संकुचितपणाच्या हवेंत माझा जीवा गुदमरतो. मी तेथून उडून जातों. निळ्यानिळ्या आकाशांत हिडणा-या पक्षाला तुमचे पिंजरे कसे रुचणार! आपले विचार जेथे जमेल तेथे पेरीत जावे. कोठेंहि आसक्ति ठेवू नये. आंतडे गुंतवू नये, असें मला वाटत असते. अमळनेरला आलों. काळवेळ आली. माझे हृदय मोकळें केलें. उद्यां दुसरीकडे. आज येथे, उद्यां तेथे,” स्वामी एकप्रकारच्या गूढ न निराशेनें बोलत होते.
“परंतु ह्याचा उपयोग कितीसा होणार? कोठें तरी तुम्ही मूळ धरून बसले पाहिजे. बंधनांत घालून घेतल्याशिवाय विकास नाही. वीज जर एके ठिकाणी जमिनींत नीट गाडून घेणार नाही, तर वृक्ष कसा होईल? बीं सारखे हवेंत उडत राहील, तर त्याला अंकुर फुटणार नाहींत. एका बीजाचें शेंकडो दाण्याचे कणीस होणार नाहीं. बीं एके ठिकाणीं स्वत:ला पुरून घेतें, परंतु शेंकडोंना जन्म देतें. आणि असें मध्येच कोठे तरी जाऊन बोलणें हें एक प्रकारें पाप आहे. जें आपण पेरू, त्याची जर आपण काळजी न घेतली, तर तें मरेल. जो अंकुर लावू, त्याला जर पुन्हा पुन्हां पाणी न घालू तर तो अंकुर करपेल ही भृणहत्या आहे, बालहत्या आहे. या मुलांच्या मनांत कांही विचार तुम्ही काल पेरलेत, हें का तुम्ही मरु देणार? मग ते पेरलेत तरी कशाला? लावलेल्या झाडाला वाढवावयाचें नसेल तर लावूच नये. जन्माला येणा-या बाळाची जर नीट काळजी घ्यावयाची नसेल तर बाळाला जन्मच देऊ नयें. स्वामीजी! मी स्पष्टपणे बोलतों याची क्षमा करा. मी आहे स्पष्टवक्ता,” गोपाळराव म्हणाले.
“मला मोकळेपणा आवडतो, मला तुमचा राग न येतां उलट तुमच्याबद्दल आदर वाटत आहे. मला बंधने आवडत नाहीत हें खरें,” स्वामी म्हणाले.
“म्हणजे तुम्हाला जबाबदारी नको हाच त्याचा अर्थ,” गोपाळराव म्हणाले.
“हो. एकप्रकारें तसें म्हटलें तरी चालेल,” स्वामी म्हणाले.