स्टेशन आले. तिकिट काढण्यांत आले. सायकली तेथे ठेवून दोघे मित्र स्वामींबरोबर गाडीपर्यंत गेले. बाहेरच तिघे उभे होते.

“तुम्ही देवपूरला मधून मधून जात जा,” रघुनाथ म्हणाला.

“रघुनाथच्या आईची चौकशी करीत जा. तेथे कष्ट व उपासमार सदैव आहे. हिंदुस्थानात सर्वत्रच आहे,” नामदेव म्हणाला.

“वेणूसारख्या मुली जर शहरांत शिकल्या असत्या, तर त्यांनी केवढी जागृति केली असती! कशी बोलते, जशी फुटाणा,” स्वामी म्हणाले.

“आता आपण परत केव्हा भेटू,” नामदेवाने विचारले.

“नाही. उगीच पंचवीस रुपये खर्च करावयाचे,” नामदेव म्हणाला.

“मग आता मार्च महिन्यांत भेट. सात महिने आहेत. पत्र पाठवा. आपली मनोमय भेट आहेच. मनाने मनाला पाहाणे, आत्म्याने आत्म्याला भेटणे हीच भेट मनुष्याला शोभते. ही पार्थिव डोळ्यातोंडाची भेट स्थूल आहे,” स्वामी म्हणाले.

“परंतु त्याशिवाय समाधान नाही हेहि खरे,” नामदेव म्हणाला.

घंटा झाली.

“पाच मिनिटे राहिली. पाच मिनिटे आणि तुम्ही जाणार. का नाही राहिलेत एक दिवस आणखी?” नामदेवाने विचारले.

“एक दिवस राहून का पोट भरले असते? तू वेडा आहेस हो नामदेव,” स्वामी म्हणाले.

“तुम्ही फार श्रम करू नका हेच पुन्हा पुन्हा सांगणे आहे,” नामदेव म्हणाला.

“तुम्ही उगीच मनाला फार लावून घेत जाऊ नका,” रघुनाथ म्हणाला.

“करा, सूचना करा,” स्वामी हसत म्हणाले.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel