यशवंताच्या मनांत हे विचार भरत. विश्वभारतींत जावयाचें तो ठरवू लागला. छात्रालयांतील मुलें त्या गोष्टीची चर्चा करू लागली. यशवंताने आपल्या वडील सावध भावाला हे सारें विचार कळविले. तो घरच्या पत्राची वाट पाहात होता आशेनें होता.
परंतु एके दिवशी अकस्मात् त्याचा भाऊ आला. तो गोपाळरावास भेटला. त्यांची बोलाचाली झाली.
“तुम्ही आमची मुलें बिघडवीत आहात. घरच्या मंडळीविरुद्ध बंड करावयास शिकवीत आहात,” भाऊ म्हणाला.
“आम्ही योग्य तें करावयास सांगत आहोंत. कोणावर सक्ति नाही, जुलूम नाही. मुलांना पटतें म्हणून ते करतात,” गोपाळराव म्हणाले.
“आमचा सत्यनाश होईल इकडे तुमचें लक्ष आहे का? यशवंतानें सारे विलायती कपडे जाळले. आणि आतां गोणपाटें नेसतो. आम्हांला शरम वाटते. कुळाचा नावलैकिक ठेवायला नको,” भाऊ रागानें म्हणाला.
विलायती वस्त्रे वापरणें म्हणजे का कुळाचा नांवलैकिक? तलम वापरावयाची असतील वस्त्रे तर तलमहि खादी मिळते,” गोपाळराव म्हणाले.
“आमच्या घरी कलेक्टर येतात. सरकारी अधिकारी येतात. त्यांनी घऱांत ही खादी पाहिली तर आम्हाला धोका नाही का? आमची जहागीर राहील का?” भाऊ म्हणाला.
“पूर्वजांनी स्वातंत्र्यार्थ पराक्रम करून जहागीर मिळविली. आतां ती स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुन्हा गमवा. गुलामगिरींत राहाणा-याला जहागीर काय करावयाची? तुम्हांला स्वाभिमान प्रिय आहे कीं, परकीयांचे जू प्रिय आहे? वरून पूर्वज रडत असतील, तुम्हाला शिव्याशाप देत असतील,” गोपाळराव त्वेषानें म्हणाले.
“तुमच्या शिव्याशाप ऐकायाला मी आलों नाही. मी माझा भाऊ घेऊन जातो. त्याला तेथे एक क्षणभरहि ठेवावयाची मला इच्छा नाहीं. ज्या हातांनी तरवार धऱावयाची, त्या हातांत तुम्ही झाडू द्यावेत काय? आमचे सगसोयरे आमच्या तोंडांत शेण घालतील. आमच्या दारांत हत्ती विक्रीसाठी यावयाचे व अधोलीनें पैसे मोजून आम्हीं. द्यावयाचे त्या कुळांतील मुलांनें घरोघऱ जाऊन खादी विकांवी काय?” भाऊ म्हणाला.
“यशवंत, बांधाबांधी कर, यांचे पैसे वगैरे चुकते कर. बघतोस काय? माझ्या इच्छेप्रमाणें वागायचें आहे की नाहीं? नसेल वागावयाचे तर दाही दिशा तुला मोकळ्या आहेत. पुन्हां काळें तोंड दाखवू नकोस,” भाऊ बोलत होता.
“येथे नका ठेवू. परंतु विश्वभारतींत जाऊ दे मला,” यशवंतानें विनविलें.
“आपले घर म्हणजे विश्वभारती. बिघडलास तेवढा पुरे. आणखी दूर नेलास तर आणखी बिघडायचास,” भाऊ म्हणाला.
यशवंताच्या डोळ्यांत पाणी आलें. तो स्वामींच्याकडे गेला. स्वामी विचारमग्न होते.
“स्वामीजी! मी काय करु? तुम्ही मार्ग दाखविलात आता मी कोठें जाऊ? घरच्या चिखलांत मी रूतून बसेन. माझा विकास थांबला, प्रगति थांबली, माझे पंख तुटले, शक्ति खुटली,” य़शवंत दीनवाणा झाला होता.