त्या लहान संस्थेला शिष्ट लोक हसंत होते. आपापल्या क्षुद्र डबक्यांचा अभिमान धरणारे लोक हंसत होते. ध्येयाची जगांत टरच होत असते. परंतु ध्येयवादी पुरुष आशेनें व श्रद्धेने श्रमत असतो. प्रयत्न यशस्वी होवो वा अपयशी होवो, त्यांत भिण्यासारखे काय आहे? परंतु या जगात काहीहि फुकट जात नाही मनांतील विचार, उच्चारलेले शब्द, प्रत्यक्ष कर्म, सर्वांचा परिणाम जगावर घडतच असतो. ते परिणाम दिसोत वा न दिसोत. कोठेंतरी कोप-यात फुललेल्या फुलाचा सुंगंध वा-याबरोबर दशदिशांत जातच असतो त्या सुंगधाने वातावरण स्वच्छ व पवित्र राखण्यास मदत केलेलीच असते. त्या गोष्टीचे ज्ञान जगांतील वर्तमानपत्रांस असो वा नसो; जगातील अहंपूज्यांस असो वा नसो.
स्वामी शहरांत हिडत होते. दहा वाजता आगगाडीतून उतरल्यापासून ते भटकतच होते. त्यांना भूक लागली होती. परंतु कोणाकडे जाणार, कोठें उतरणार? त्या शहरांत कोणाशीहि त्यांची ओळख नव्हती. रस्त्यांतून हिंडता हिंडता त्यांच्या हातांत ती जाहिरात पडली. स्मामी जाहिरात वाचू लागले.
'आज सांयकाळी सहा वाजता नगरभवनांत विश्वधर्ममंडळाच्यावतीने महमद पैंगबर यांची पुण्यतिथि साजरी केली जाणार आहे. तरी सर्वांनी यावें अशी प्रार्थंना आहे.'
ती पवित्र पत्रिका वाचतांच त्यांचे तोंड फुललें. त्यांची भुकेनें काळवंडलेली मुद्रा टवटवीत दिसू लागली. आत्म्यांची भूक शांत झाली. प्रेमाच्या यात्रेकरुला प्रेमाचा प्रसाद मिळाला. ती पत्रिका स्वामीनी हृदयार्शी धरली. ती पत्रिका म्हणजे नवीन आशा होती, नवीन प्रभा होती, नवभारताची दिव्य पताका होती. ती पत्रिका घेऊन ते पुढे चालले, भटकत भटकत ते नदीतीरावर आले. गांव आतां दूर राहिला होता. तेथें एक लहानशी टेंकडी होती. त्या टेकडीवर महादेवाचें लहानसेंच पण सुंदर असें देवालय होते. देवालयाभोंवती झाडें लाविलेली होतीं. दाट छाया पडली होती. टेकडीच्या पायथ्याशी नदी होती. जणु भगवान शंकराचे महीम्नस्तोत्रच ती रात्रदिवस गात होती. गांवापासून दूर राहून त्या टेंकडीवरून भगवान् शंकर गांवाला आशीर्वाद पाठवीत होते. ते स्थळ पवित्र होतें. रमणीय होतें. एकप्रकारचा शांत व गंभीर एकांत तेथें होता.
स्वामींनी नदीमध्ये स्नान केलें. उन्हानें तप्त झालेला आपला देह त्या शीतल जलानें त्यांनी शांत केला. कितीतरी वेळे ते पाण्यांत होते. आईच्या प्रेमतरंगांशी खेळत होते, आईच्या कृपासमुद्रांत डुंबत होते. मधूनमधून पाणी पीत होते. शेवटी ते बाहेर आले. त्यांनी वस्त्रे धुतली. धुऊन उन्हात वाळत टाकलीं. देवाच्या अंगणांत शीतल छायेखाली घोंगडीवर ते बसले त्यांना थकवा आला होता. त्या घोंगडीवर शेवटी ते पडले. त्यांचा डोळा लागला. झाडांवरची पांखरें त्या श्रांत पांथाकडे पाहात होतीं. एक पांखरूं येऊन त्यांच्या अंगावरहि बसले. हळू बसलें व अलगत उडून गेलें.
परंतु स्वामीना झोंप कोढून येणार? भारतवर्ष झोंपलें असताना, हा प्रिय महाराष्ट्र झोंपला असताना, त्यांना झोंप कोठून येणार? ज्यांच्यावर सारी आशा , ते राष्ट्राचे तरुण झोंपलेले असताना, त्यांना कोठून सुखनिद्रा, अनेक विचार त्यांच्या हृदयांत उसळत होते. एकदम ते थबकत व दूर कोठेंतरी बघत. भारताच्या भव्य भविष्याचें दर्शन का त्यांना त्या वेळेस होई!