“कल्याण, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहावं असं वाटतं. परंतु हल्लीं तुमची सर्वांची धांवपळ आहे. तूं क्षणभरहि माझ्या वांटयाला येत नाहींस. तूं क्रान्तीच्या नादीं. मग तुझा एखादा सदरा घेऊन, पायजमा घेऊन त्याची मी उशी करतें. त्यावर डोकं ठेवतें हो,  कल्याण.”

“ये, ठेव माझ्या मांडीवर डोकं. संध्ये, तूं थकतेस. इतक्या सर्वांचा स्वयंपाक तुला करावा लागतो. खालून वर पाणी आणावं लागतं. मी तरी काय करूं ?”

“कल्याण, रंगा देतो हो पाणी आणून. मी एक जिना चढतें व जरा बसतें. मग वर येतें. मी जपतें प्रकृतीला. स्वयंपाक बसल्या बसल्या करतें. त्याचा कांहीं तितका त्रास नाहीं हो होत. तूं दोनचार वेळां दिवसांतून दिसलास, थोडा वेळ माझ्याजवळ बोललास, हंसलास, म्हणजे मग कांहीं वाटणार नाहीं. सारं नीट होईल.”

दोघें आतां स्वस्थ होतीं. संध्या डोळे मिटून कल्याणच्या मांडीवर डोकें ठेवून पडून राहिली होती. मध्येंच तिनें वर पाहिलें. तों कल्याणच्या डोळयांतील अश्रु त्याच्या गालांवर आले होते.

“रडूं नको तूं; आपण एकमेकांच्या हृदयांत कायमचीं आहोंत; रडूं नको. हंस.”

कल्याण हंसला. अश्रूंची फुलें झालीं. कल्याण संध्येला थोपटीत होता. आणि जिन्यांत विश्वास, बाळ वगैरेंचे शब्द ऐकूं आले.

“विश्वास आला. त्याचं अंथरूण साफ करायचं राहिलं.” संध्या एकदम उठून म्हणाली.

“मी करतों साफ.” कल्याण म्हणाला.

कल्याणनें तें अंथरूण झटकलें. उशी वगैरे नीट ठेवली. आणि विश्वास व बाळ आले. विश्वास अंथरुणावर पडला.

“काय म्हणाले रे डॉक्टर ?” कल्याणनें विचारलें.

“पूर्ण विश्रांति हवी असं म्हणाले.” बाळनें सांगितलें.

“कल्याण, तुमच्या प्रयत्नांत हा दुर्दैवी विश्वास भाग घेऊं शकत नाहीं. मला वाईट वाटत आहे.” तो म्हणाला.

“तूं शांत पडून राहा.” बाळ म्हणाला.

“शांत पडणं म्हणजे मरणं. संपूर्ण शांतता म्हणजे मरण ?” विश्वास म्हणाला.

बाळ व कल्याण बाहेर गेले. संध्या स्वयंपाकाला लागली. भाईजींकडून मनिऑर्डर आली. वेळेवर औषधाला पैसे आले.

“संध्ये, भाईजी म्हणजे एक देवाची देणगीच आपणांला मिळाली, नाहीं ? “विश्वास पडतां पडतां म्हणाला.

“विश्वास, देवाची देणगी ? देव कुठला आणलास हा ?”

“संस्काररूपानं अद्याप शिल्लक असलेला. संध्ये, आमच्या तोंडून देव शब्द येतो एखादे वेळेला. लहानपणापासून झालेले संस्कार, ऐकलेले शब्द, ते येतात सहज तोंडून. त्यासाठीं चिडवायला नको कांहीं एवढं ! “

“विश्वास, आज पडवळाची भाजी आहे.”

“तुम्हां कानडी लोकांना पडवळं फार आवडतात.”

“अरे, पडवळ हा शब्दसुध्दां कानडीच आहे.”

“हो कानडी ! कांहीं तरीच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel