“हेहि दिवस जातील. किसान-कामगारांत निर्भयपणा येत आहे. गुलामगिरी नष्ट झाल्याशिवाय राहात नाहीं.” कल्याण म्हणाला.

“जा ना तुम्ही घर पाहायला; मग ऊन होईल.” संध्या म्हणाली.

कल्याण व विश्वास गेले. भाईजी चुलीशीं लागले. थोडया वेळानें हरिणी आली. इन्जेक्शन द्यायचें होतें.

“काल त्या हाताला दिलं, आज संध्ये, ह्या हाताला.” हरिणी म्हणाली.

“तो हात अजून थोडा दुखतो आहे.” संध्या म्हणाली.

“जरा शेकव, बरं वाटेल.” हरिणीनें सुचविलें.

हरिणीनें इन्जेक्शन दिलें. संध्येला कळलेंसुध्दां नाहीं.

“हरणे, किती हलका तुझा हात ! तूं डॉक्टरी शीक.” संध्या म्हणाली.

“परंतु कोण शिकविणार ?” हरिणी दु:खानें म्हणाली.

“उद्यां तुझा निकाल ना ?”

“होय.”

“आज रात्रीं बारानंतर वर्तमानपत्रं जादा अंक काढतील. मुलं रस्त्यांतून हिंडूं लागतील.”

“आम्ही रात्रीं घेऊं वर्तमानपत्र.”

“भाईजी, मी कणीक देऊं का भिजवून ? ही भिजवायची आहे ना ?”

“तुला उशीर होईल. तूं जा आतां, हरणे.” ते म्हणाले.

परंतु हरिणीनें ऐकलें नाहीं. तिनें कणीक भिजवून ठेवली व मग ती गेली.

अकरा वाजले तरी कल्याण व विश्वास आले नाहींत. संध्या वाट पाहात होती.

“संध्ये, तूं जेवायला बसतेस का ?”

“नको. बरोबरच बसूं. बरोबर सारीं बसलों म्हणजे जेवण आनंदानं होतं. येतीलच ते आतां. कुठं तरी नक्की करून येणार, एरवीं नाहीं इतका उशीर लावला त्यांनीं.” ती म्हणाली.

रंगा आला. थोडया वेळानें घामाघुम होऊन विश्वास व कल्याणहि आले. ते जरा कपडे काढून चटईवर पडले. संध्या पंख्यानें कल्याणला वारा घालूं लागली.

“कल्याण, खूप हिंडलेत ना ?” तिनें प्रेमानें विचारलें.

“हो. आणि एक घर ठरवून आलों.” तो म्हणाला.

“मला वाटलंच होतं, कीं ठरवल्याशिवाय तुम्ही येणार नाहीं म्हणून.” संध्या म्हणाली.

सारीं जेवलीं. आणि बांधाबांध सुरू झाली.

“रात्रीं नेऊं सामान. घालूं खेपा.” कल्याण म्हणाला.

“दिवसा जरा संकोच वाटतो.” विश्वास म्हणाला.

“रात्रीं वेळहि शांत असते.” भाईजी म्हणाले.

“किती खेपा कराव्या लागतील ?” कल्याणनें विचारलें.

“तीन-चार खेपांत सारं सामान जाईल. विठ्ठल, लक्ष्मण, शिवराम, राजा वगैरे मुलंहि येतील. झपाटयानं काम होईल.”
विश्वास म्हणाला.

परंतु संध्येचें एकाएकीं पोट दुखूं लागलें.

“संध्ये, बरंच का दुखतं ?” कल्याणनें विचारलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel