“नव हिंद राष्ट्रझेंडया
प्रणामा घे या”
विश्वासच गाणे सांगत होता. त्याचा देह लहान होता. परंतु आवाज पहाडी होता. त्या वेळचे दृश्य गंभीर होतें. आज ज्ञान कृतार्थ होत होतें. ज्ञान स्वतंत्र होत होतें. शाळेंत शिकविला जाणारा इतिहास जिवंत होत होता. मुले आज स्वत:च इतिहास निर्मित होतीं.
शाळेची वेळ झाली. घंटा झाली. मुले वर्गांत गेलीं. हेडमास्तर चवताळले होते, संतापानें लाल झाले होते. त्यांनी विश्वासला बोलावून घेतलें. तो नम्रपणे येऊन उभा राहिला.
“तूं का रे लावलास शाळेवर झेंडा ?”
“हो.”
“कां लावलास ?”
“माझ्या मनांत आलें म्हणून. मला राहवेना म्हणून. आपल्या शाळेचा मला अभिमान वाटतो म्हणून. आपल्या शाळेवर झेंडा लावला अस वर्तमानपत्रांत येऊन दुस-या शाळातील मुलांना स्फूर्ति यावी म्हणून.”
“तुम्हां मुलांना काडीची अक्कल नाही. संस्था उभारण्यासाठीं आम्हांला शंभर ठिकाणीं भीक मागावी लागते. आणि तुम्ही एकदम काहीं तरी करतां व संकट आणता. शाळेच्या बाहेर दाखवा देशभक्ति. शाळेच वातावरण पवित्र असू दे.”
“झेंडा आला म्हणून का वातावरण अपवित्र झालं ? सर्व राष्ट्राला स्वातंत्र्य देऊं पाहणारा झेंडा, तो का अपवित्र ?”
“अरे, तूं झेंडा लावलास. परंतु आता समजा पोलिस आले शाळेच्या आवारांत. तर ते चांगलं का ? आपल्या घरांत पोलिस शिरले तर तें कुणाला आवडेल का ?”
“लोकमान्यांच्या वाडयांत पोलिस गेले म्हणून का तो वाडा अपवित्र झाला होता ? पोलिस आपल्या घरीं आले तर घर पवित्र झालं. चोरी पकडण्यासाठीं ते थोडेच येणार आहेत ? देशाच्या कामांत भाग घेतल्यामुळं पोलिस आले, तर त्यांत आनंद मानावा.”
“तुझ्याजवळ वाद करायला मला वेळ नाहीं. तुम्ही फाजील पोर आहांत. तूं अक्षम्य चूक केली आहेस. पुन्हां असं करूं नकोस. क्षमा माग व या शाळेला अकरा प्रदक्षिणा घाल.”
“मीं चूक केली नाहीं. मी क्षमा मागणार नाहीं. आणि शाळेवर झेंडा ठेवाला तर अकरा सोडून अकराशे प्रदक्षिणा मी घालीन. ते हिंदमातेचं स्वातंत्र्यमंदिरच मी मानीन.”
“झेंडा तर मीं कधींच काढला. पोलिसचौकी जवळ आहे. हे बघ. तूं कबूल करीत नसशील, तर तुझ्या घरीं मी चिठ्ठी पाठवून पालकांना बोलावून घेतो. तुझं नांव शाळेंतून कमी करतो. पाठवूं घरीं चिठ्ठी ? कीं क्षमा मागतोस व अकरा प्रदक्षिणा घालतोस ?”
वडिलांचं नांव निघताच विश्वास भांबावला. तो घाबरला. आईला रस्त्यांतून मारीत नेणारे वडील. ते मलाहि मारीत नेतील. मागें एकदां रस्त्यांत पायांतील वहाणेनेंच त्यांनी त्याला मारले होते. वडिलांची क्रोधी मुद्रा त्याच्या डोळयांसमोर उभी राहिली. त्याचे डोळे बावरले. तोंडावरचें तेज नरमलें, कोमेजलें. त्याची दृष्टि खाली झाली.