“कल्याण, आपण सारेच मुंबईला जाऊं. आम्हां सर्वांना बोलावणं आलं आहे. मोठा संप होणार असं दिसतं. युध्दांमुळं महागाई झाली आहे. कामगारांची महागाईभत्त्याची मागणी आहे. दडपशाही व्हायचा संभव आहे. परिस्थिति गंभीर होईल. आपण गेलं पाहिजे.” विश्वास म्हणाला.

“मुंबईला या वेळीं भरपूर काम आहे. काम असलं म्हणजे मला उत्साह वाटतो. आपणांला चाळीचाळींतून प्रचार करावा लागेल. कदाचित् धरपकडहि होईल. सभाबंदीचा कायदाहि जारी होईल.” बाळ बोलला.

“मुंबईला आपणां सर्वांसाठीं एक खोली घेण्यांत आली आहे. आपण तींत राहूं. संध्ये, तुला सर्वांचा स्वयंपाक करावा लागेल.” विश्वासनें सांगितलें.

“मी तयार आहें. त्यासाठीं तर आलें आहें. तुम्हांला तुमचं काम मिळालं म्हणून आनंद वाटत आहे; मलाहि माझं काम मिळाल्यामुळं आनंद होत आहे.” संध्या संतोषानें म्हणाली.

“दमून जाशील स्वयंपाक करून.” कल्याण म्हणाला.

“मला संवय आहे काम करायची, कल्याण. आमचं पूर्वीं केवढं कुटूंब होतं. नुसती एक वेळची कांद्याची भाजी चिरायची झाली, तर दहा शेर कांदे पुरत नसत. डोळयांतून पाण्याच्या धारा लागत.” ती म्हणाली.

“काम फार पडे म्हणून ना धारा ?” विश्वास हंसून बोलला.

“विश्वास, कांदे चिरतांना डोळयांना पाणी येतं एवढंहि नाहीं का माहीत तुला ? काम करतांना मी कधीं हटायची नाहीं. कामाला मी वाघ आहें !” संध्या ऐटीनें नि अभिमानानें म्हणाली.

तें सारें मित्रमंडळ मुंबईला आलें. परळच्या बाजूला एक खोली होती. तेथें बि-हाड थांटण्यांत आलें. कल्याण, विश्वास, बाळ सारे दिवसभर बाहेर असत. जेवायला तेवढे घरीं येत. रात्रीं कामगारांच्या चाळीचाळींतून प्रचारसभा सुरू झाल्या. त्या सभांतून कल्याण, विश्वास हेहि बोलत. घरीं यायला बारा वाजायचे. संपाची तयारी जोरानें सुरू झाली.

एके दिवशीं भाईजीहि मुंबईला आले. संघटना पाहायला आले. प्रचारतंत्र पाहायला आले. विश्वास, कल्याण, यांच्याबरोबर तेहि जात. ते फारसे बोलत नसत, बोललेलें ऐकत; दृश्यें बघत.

संध्येला घरींच राहावें लागे. इतक्यांचा स्वयंपाक करायचा असे. सभांना ती जाऊं शकत नसे. कामगार-मैदानावर प्रचंड सभा होऊं लागल्या. एके दिवशीं स्त्री-कामगारांचीहि खास सभा होती. परंतु संध्या घरींच भाक-या भाजीत होती. सभा संपल्यावर सारे घरीं आले. पानें वाढण्यांत आलीं.

“भाईजी, पोटभर जेवा.” कल्याण म्हणाला.

“मी उद्यांपासून घरींच राहीन.” ते म्हणाले.

“कां? “विश्वासनें विचारलें.

“संध्येशीं बोलत बसेन. तिला एकटीला कंटाळा येत असेल.”

“तिच्याशीं नुसतं बोलत बसाल, कीं स्वयंपाकांत मदत करूं लागाल ? संध्ये, भाईजी स्वयंपाक छान करतात.” विश्वास म्हणाला.

“माझ्याहून चांगला ?” संध्येनें विचारलें.

“तुझ्याहून चांगला कसा करीन ?” ते म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel